मोपाचे फुगे

0
201

गोव्याचा बहुचर्चित मोपा विमानतळ येत्या दोन – अडीच वर्षांत खुला होणार असल्याची घोषणा केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. हा विमानतळ एअर कार्गोचे म्हणजे हवाई मालवाहतुकीचे मोठे केंद्र बनवण्याचा विचारही प्रभूंनी बोलून दाखवलेला आहे. मोपा विमानतळ हे संपूर्ण पश्‍चिम किनारपट्टीसाठी मालवाहतुकीचे केंद्र बनेल, येथून गोव्यातील शेतमाल आणि फळफळावळीची निर्यात होईल, येथे मनोरंजन नगरी वसवल्यास पर्यटनाला चालना मिळेल वगैरे वगैरे रंगबिरंगी स्वप्नांचे फुगे प्रभूंनी यावेळी हवेत सोडले. या सार्‍या कल्पना आकर्षक आहेत यात शंका नाही, परंतु त्या व्यवहार्य आहेत का हा प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे. मोपा विमानतळ हे मालवाहतुकीचे केंद्र बनवायचे असेल तर त्यासाठी पूरक साधनसुविधा राज्यात आहेत का हा पहिला प्रश्न. गोव्याला विभागून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आता कुठे बहुपदरी होऊ घातला आहे. परंतु गोव्यातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता तो जोवर पूर्ण होईल तोवर वाहनांची संख्याही कैक पटींनी वाढलेली असेल. म्हणजेच नेहमीच्या वाहनांनाच हा मार्ग जेथे अपुरा पडेल, तेथे एअर कार्गोची अन्यत्र वाहतूक करणारी अवजड वाहने कुठून ये-जा करणार? गोव्याचे रस्ते हे आधीच मृत्यूचे सापळे बनलेले आहेत. अशा वेळी येथील रस्त्यांवरून अवजड वाहतुकीचे प्रमाण वाढवणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखे ठरेल. अशा प्रकारची हवाई मालवाहतूक जर मोपाला उतरवायची असेल तर त्यासाठी पूरक उद्योगधंदे आजूबाजूच्या प्रदेशामध्ये असावे लागतात. मोपाच्या संदर्भात तर तशी काहीही स्थिती नाही. मग हा माल येथे उतरवणार कोण आणि कशासाठी? रस्तामार्गे त्याची अन्यत्र वाहतूक करणे सोपे तर नसेलच, शिवाय खर्चिकही राहील. त्यामुळे अशा प्रकारचा द्रविडी प्राणायाम करायला किती उद्योजक तयार होतील हाही प्रश्न आहे. मोपा विमानतळाच्या परिसरात मनोरंजन नगरी उभारण्याचा प्रस्ताव आहे. ही प्रस्तावित मनोरंजन नगरी कॅसिनो नगरी नसेल अशी अपेक्षा आहे. मुळात या विमानतळाच्या जोडीने ज्या पंचतारांकित नगरीचा घाट घालण्यात आलेला आहे, त्याचा सर्वसामान्य पेडणेकरांशी काहीही संबंध नसेल. स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील या अपेक्षेने मोपासाठी लोकांनी जमिनी दिल्या आणि दक्षिण गोव्यातून विरोध होत असताना समस्त पेडणेवासीयांनीच नव्हे, तर उत्तर गोव्याच्या जनतेने निर्धाराने या विमानतळाला पाठिंबा दिला आहे. मात्र, त्याचा लाभ त्या जनतेला मिळायला हवा. मोपामुळे जी काही रोजगार निर्मिती होईल, ती स्थानिक तरुण तरुणींना उपलब्ध झाली पाहिजे. अन्यथा दाक्षिणात्य अधिकार्‍यांनी आपली मुले आणली, उत्तर भारतीयांनी आपले लोंढे उतरवले तर पारिजात फुलला दारी, फुले का पडती शेजारी? अशी आपली अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. मोपाशी संबंधित रोजगारांसाठी पूरक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या दृष्टीने आजवर विशेष प्रयत्न झालेले दिसत नाहीत. कौशल्य विकासाच्या घोषणा मात्र आजवर उदंड झाल्या. प्रभूंनीही तशी घोषणा केली, परंतु अडीच वर्षांत जर मोपा सुरू होणार असेल तर आतापावेतो अशा प्रकारच्या कौशल्य विकासाची व्यवस्था सुरू व्हायला हवी होती, ती कोठे आहे? मोपातून शेतीमाल आणि फळफळावळीची निर्यात होणार हे आणखी एक दिवास्वप्न. कोकणातील शेतकरी आणि बागायतदारांना आजवर हे दिवास्वप्न तेथील प्रत्येक नेता दाखवीत आला. प्रभू कोकणी माणूस आहेत, गोव्याचे जावई आहेत, त्यामुळे त्यांच्या मनात गोवा आणि कोकणाविषयी आस्था व प्रेम आहे, त्यामुळे त्यांचा उत्साह समजण्यासारखा आहे, परंतु या घोषणा प्रत्यक्षात आल्या पाहिजेत. मोपातून शेतमाल आणि फळफळावळीची निर्यात करायचे म्हटले तर गोवा तर आधीच भाजी आणि फळफळावळीबाबतीत परावलंबी आहे. विदेशांशी करारमदार करणार वगैरे केंद्र सरकार जरी सांगत असले तरी जेथे गोव्यात येणार्‍या पर्यटकांनाच विदेशांतून येणारा बेचव काजू गोव्याचा म्हणून बिनदिक्कत खपवला जातो, तेथे येथून निर्यात होणार काय? मासळीची निर्यात होणार म्हणावे तर आधीच गोव्याला येथील मासळी अपुरी पडत असल्याने कर्नाटक आणि आंध्रमधून गोव्याची गरज भागवली जाते आहे. गोव्यात भाज्या बाहेरून येतात, फळे बाहेरून येतात, फुले बाहेरून येतात, मासे बाहेरून येतात, मग निर्यात करणार कसली? म्हणजेच मोपा मालवाहतुकीचे केंद्र बनणार असेल तर त्याचा फायदा गोव्यापेक्षा शेजारील कर्नाटकला अधिक असेल. मोपा व्हायला हवा याबद्दल दुमतच नाही, परंतु त्याच्या बहाण्याने भलतीसलती दिवास्वप्ने गोवेकरांना दाखवून दिशाभूल केली जाऊ नये. त्या घोषणांची व्यवहार्यता आधी तपासली गेली पाहिजे. या विमानतळावरून होणार्‍या नागरी विमानवाहतुकीचा लाभ गोवेकरांना मिळाला पाहिजे. ‘उडाण’ योजनेंतर्गत देशांतर्गत विविध छोटे विमानतळ येथून थेट जोडले जावेत. विदेशस्थ गोमंतकीयांसाठी थेट विमानवाहतूक सुरू व्हावी. व्यवहार्यता न तपासता उगाच भलत्या स्वप्नांची विमाने उडवू नयेत!