मोन्सेरातांवर आरोप करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही

0
151

>> भाजपकडे मुद्दे नाहीत ः कॉंग्रेस

कॉंग्रेसच्या प्रचारातील विकास आणि स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार या दोन मुद्यांना उत्तर देण्यासाठी भाजप नेते आणि उमेदवाराकडे योग्य मुद्दे नसल्याने त्यांनी मतदारांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी कॉंग्रेसच्या उमेदवारावरील न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याचा विषय पुढे केला जात आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केला केला.

भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांनी कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांचा २०१७ च्या पोट निवडणुकीसाठी पाठिंबा घेऊन आणि ग्रेटर पणजी पीडीएचे अध्यक्षपद बहाल करून शुद्धीकरण व सन्मान केला आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपला बाबूश मोन्सेरात यांच्यावर पुन्हा आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा दावा चोडणकर यांनी केला.

बाबूश मोन्सेरात यांच्यावर टांगती तलवार ठेवण्यासाठी यांच्यावरील गुन्हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राजकीय नेत्यावरील खटले प्राधान्यक्रमाने निकालात काढण्याचा निवाडा दिलेला असताना मोन्सेरात यांच्याविरोधातील खटले प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.

पणजी पोट निवडणुकीत भाजपला पराभव दिसू लागल्याने त्यांनी कॉंग्रेस उमेदवारांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजप सरकार मधील चार मंत्र्यांचे चारित्र्य शुद्ध नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

वीज घोटाळ्याचा आरोप असलेले पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो आणि भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांना स्व. मनोहर पर्रीकर यांनी शुद्धीकरण केलेल्या बाबूश मोन्सेरात यांच्यावर टिका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असेही चोडणकर यांनी सांगितले. पणजीत २५ वर्षे भाजपने वर्चस्व गाजविले. परंतु. पाणी, वीज, रस्ते अशा मूलभूत सुविधा योग्य प्रमाणात उपलब्ध करण्यात यश मिळाले नाही.