मोन्सेरातसह कॅसिनो स्थलांतरासाठी आग्वादला पाहणी करणार ः लोबो

0
104

मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो जहाजे आग्वादनजीक स्थलांतरित करण्याबाबत पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यासमवेत पाहणी करणार आहे, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

पणजीचे आमदार मोन्सेरात यांच्याकडून मांडवी नदीतील कॅसिनो जहाजे स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे. आमदार मोन्सेरात यांनी निवडणुकीच्या काळात १०० दिवसांत कॅसिनो जहाजे स्थलांतरित करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

आमदार मोन्सेरात, बंदर कप्तान खात्याच्या तांत्रिक अधिकार्‍यांसमवेत आग्वादनजीकच्या जागेची पाहणी करणार आहेत. त्याठिकाणी कॅसिनो जहाजासाठी सुरक्षित जागा आढळून आल्यास तेथे स्थलांतरित करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. कॅसिनोमध्ये प्रवाशांना घेऊन जाणार्‍या फिडर बोटीच्या सुरक्षेवर जास्त लक्ष दिला जाणार आहे, असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

मोपा विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी गेमिंग झोन तयार करून तेथे कॅसिनोचे स्थलांतर केले जाऊ शकते. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वांना विश्वासात घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. मांडवी नदीतील कॅसिनोचे परवाने तडकाफडकी रद्द केले जाऊ शकत नाही. कॅसिनो जहाजांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे, असेही लोबो यांनी सांगितले.