मोदी सरकारचा आज अर्थसंकल्प

0
135

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा अखेरचा संपूर्ण अर्थसंकल्प वित्तमंत्री अरूण जेटली आज सादर करणार आहेत. देशवासियांना उत्कंठा लागून राहिलेल्या या अर्थसंकल्पात पुढील वर्षाच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून प्राप्ती करात दिलासा मिळणार्‍या निर्णयाची शक्यता व्यक्त होत आहे.

अर्थव्यवस्था अधिक सुदृढ करण्याच्या दृष्टीकोनातून काही निर्णय घेतले जाण्याचीही शक्यता आहे. त्यानुसार काही अत्यावश्यक इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होण्याचा अंदाज आहे. अर्थसंकल्पात जकात कर वाढविण्याची शक्यता प्रत्यक्षात आल्यास मोबाईल, लॅपटॉप यासारख्या वस्तूंचे भाव वाढण्याचीही शक्यता आहे.

गेल्या जुलैमध्ये सरकारने मोबाईलवरील मुलभूत जकात कर १० टक्के असा वाढविला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये तो १५ टक्के असा वाढविला होता. गृहोपयोगी वस्तुंवरील जकात कर २० टक्क्यांनी वाढविण्याची मागणी संबंधित उत्पादक संघटनेने केली होती.

दरम्यान, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन या संघटनेने या अर्थसंकल्पानंतर सोने स्वस्त होण्याचा अंदाज वर्तविला आहे. सोन्यावरील आयात शुल्कात वित्तमंत्री जेटली कपात करण्याची शक्यता असल्याने तसे झाल्यास सोने ६०० ते १२०० रु.नी स्वस्त होईल अशी अपेक्षा वरील संघटनेने व्यक्त केली आहे. या संघटनेचे उपाध्यक्ष सौरभ गाडगीळ यांच्या मते सोन्याच्या आयात शुल्कात २ ते ४ टक्क्यांनी कपात होऊ शकते.