मोदी मंत्र

0
99

न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतील एकूण समारंभ एखाद्या बड्या कॉन्सर्टसारखा होता आणि जोष, जल्लोषात कुठेही कमी नव्हती. स्वतः श्री. मोदी यांचे सत्तर मिनिटांचे भाषणही उत्स्फूर्त आणि तरीही सूत्रबद्ध होते. उपस्थित अठरा हजार प्रेक्षकांचा खास अमेरिकी शैलीत वाक्यावाक्याला मिळणारा प्रतिसाद मोदींचे भाषण अधिक खुलवून गेला. या सार्‍या जल्लोषी वातावरणातून मोदीं जे साध्य करू पाहात होते, ते अधिक महत्त्वाचे आहे. मोदींचे हे भाषण त्यांच्या ‘ब्रँड इंडिया’ निर्मितीच्या मोहिमेतील एक मैलाचा दगड म्हणून त्याची इतिहासात नोंद होईल. आपल्या भारतीयत्वाचा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या आणि विदेशस्थ भारतीयाच्या मनामध्ये निर्माण करणे आणि प्रत्येकाला राष्ट्रकार्यामध्ये सक्रिय सहभागी करून घेणे आणि त्याद्वारे राष्ट्रविकास ही एक सामूहिक चळवळ बनवणे असे एक मोठे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पंतप्रधान श्री. मोदींनी समोर ठेवलेले दिसते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्या प्रकारे तळागाळातील जनता स्वयंस्फूर्तीने सहभागी झाली, तशाच प्रकारे या राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये योगदान द्यावे अशी ही कल्पना मोदींनी आपल्या डोळ्यांपुढे ठेवली आहे. महात्मा गांधी हे या देशातील एक महान नेतृत्व होते. गांधीजींच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य कोणते, तर त्यांनी या देशाला सतत काही ना काही कृतिकार्यक्रम दिला आणि त्याद्वारे जनतेमधील राष्ट्रभावना सदैव जागती ठेवली. मोदींपुढे गांधीजींच्या नेतृत्वाचा हा आदर्श दिसतो. स्वतःची तसेच भारत आणि भारतीयांविषयीची नकारात्मक प्रतिमा पुसून टाकून महासत्ता होण्याच्या दिशेने दमदार वाटचाल करणारा एक देश अशी भारताची प्रतिमा उभी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न त्यांनी चालवला आहे. आपल्या योजनांना आजच्या आकर्षक पॅकेजिंगच्या युगाशी सुसंगत अशा आकर्षक व चटपटीत स्वरूपामध्ये लोकांपुढे, विशेषतः या देशामध्ये बहुसंख्येने असलेल्या युवकांपुढे ठेवण्याचा आणि त्यांच्या योग्य ब्रँडिंगचा हा प्रयत्न ही सकारात्मकता निर्माण करील हे मोदींना आपल्या स्वतःच्या निवडणूक प्रचार मोहिमेच्या यशातून उमगलेले आहे. त्यामुळेच आजवरचा सरकारी खाक्या मोडीत काढून सरकारी यंत्रणेला आपल्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी कार्यान्वित करणे आणि त्यासाठी निव्वळ आदेशापेक्षा स्वयंप्रेरणेवर भर देणे असे एखाद्या ‘मोटिव्हेशन लीडर’ सारखे काम मोदींनी आपल्या हाती घेतले आहे. देश विदेशातील भारतीयांना देशाच्या विकासकार्यामध्ये योगदान देण्याचे जे भावनिक आवाहन मोदींनी मॅडिसन स्क्वेअरमधील भाषणात केले, त्यातून सरकार आणि आम भारतीय यांचे नाते जोडण्याचे उद्दिष्ट स्पष्ट दिसते. हे जोडण्यासाठी काही माध्यमेही त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत. ‘माय गव्ह डॉट इन’ सारखे संकेतस्थळ असो, ‘प्रधानमंत्री जनधन योजना’ असो, ‘मेक इन इंडिया’ सारखी मोहीम असो, ‘गंगा शुद्धीकरण प्रकल्प’ असो, ‘स्वच्छ भारत अभियान’ असो, हे सगळे कार्यक्रम, उपक्रम हे सरकार आणि जनता यांना जवळ आणण्याच्या मोदींच्या प्रयत्नांचा भाग आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मोदींची एकंदर कार्यपद्धती पाहिली तर प्रसारमाध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोहोचण्यापेक्षा थेट जनतेपर्यंत पोहोचण्यावर त्यांनी भर दिलेला दिसतो. सोशल मीडियाची मदत त्यांनी त्यासाठी घेतली आहे आणि आजवर जनता आणि सरकार यांच्यातील दुवा राहिलेली पारंपरिक प्रसारमाध्यमे दूर ठेवण्याचा वा त्याद्वारे ती असंबद्ध (इरेलेव्हंट) करण्याचा हा जो मार्ग मोदींनी आणि त्यांच्या चेल्यांनी अवलंबिलेला आहे तो लोकशाहीसाठी घातक ठरू शकतो. जनतेशी थेट जोडणे जाण्याला कोणाचा आक्षेप नाही, परंतु त्यातून येणारी सकारात्मक टीकाटिप्पणी स्वीकारण्याची मोदी आणि त्यांच्या सरकारची तयारी आहे का? संवाद हा दुहेरी असायला हवा. तो केवळ एकतर्फी राहून कसे चालेल? सकारात्मक टीका ही चुका सुधारण्यासाठी आवश्यकच असते. पण चुका मान्य करण्याची तयारी तर हवी! सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर उल्लेखलेला एकंदर मोदी मंत्र सैद्धान्तिकदृष्ट्या अत्यंत आकर्षक आहे यात शंकाच नाही, परंतु तो प्रत्यक्षात कसा आणि किती उतरतो यावर मोदी आणि त्यांच्या सरकारचे यशापयश ठरणार आहे. सुरवात तर चांगली झाली आहे. बरे वाईट परिणाम दिसायला अर्थात थोडा वेळ लागेल!