मोदी मंत्रिमंडळात उद्या होणार फेरबदल

0
153

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करणार असून या पार्श्‍वभूमीवर मंत्रिमंडळातील दोन ज्येष्ठ व चार कनिष्ठ मंत्र्यांनी राजिनामे दिले आहेत. यामुळे आता मोदी मंत्रिमंडळात बरेच नवे चेहरे समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. केंद्रातील सत्ताधारी आघाडीत अलीकडेच डेरेदाखल झालेल्या संयुक्त जनता दल तथा जेडीयूच्या दोन खासदारांची वर्णी यावेळी लागण्याची चर्चा आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी राष्ट्रपती भवनात सकाळी १० वा. होणार आहे. मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर होणारा हा तिसरा फेरबदल असेल.

विद्यमान मंत्रिमंडळातील राजीव प्रताप रूडी, संजीव कुमार बलियान, फग्गन सिंग कुलस्ते व महेंद्रनाथ पांडे या कनिष्ठ मंत्र्यांनी फेरबदला आधीच राजिनामे दिले आहेत. तर उमा भारती व कलराज मिश्रा या ज्येष्ठ मंत्र्यांनी राजिनाम्याची तयारी दर्शवली आहे. जलस्रोत मंत्री असलेल्या भारती यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की या विषयावर भाजपाध्यक्ष अमित शहा किंवा त्यांच्यावतीनेच अन्य कोणी भाष्य करू शकेल. त्यापुढे म्हणाल्या की, या संदर्भात चर्चा सुरू झाल्यानंतर पत्रकारांकडून आपल्याला गुरुवारपासून विचारणा सुरू झाली. मात्र आपण त्यांचा प्रश्‍न आपल्याला ऐकू आलेला नाही असे त्यांना सुनावले. याबाबतचा प्रश्‍न मी ऐकणार नाही किंवा त्याचे उत्तरही देणार आहे असे त्या म्हणाल्या.
हा निर्णय पंतप्रधान,
पक्ष व सरकारचा : रूडी
राजीव प्रताप रूडी यांनी सांगितले की हा पक्षाचा निर्णय आहे. त्यामागे एखादा डावपेच असल्याचा त्यांनी इन्कार केला. ‘हा निर्णय पंतप्रधान, सरकार आणि पक्षाचा आहे व आम्ही पक्षाचे सैनिक आहोत. यामागे कोणताही डावपेच नाही. पक्षासाठी काम करण्याची संधी मला मिळणार असल्याने पक्षाचा मी आभारी आहे. या सर्वांना हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे’.
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटी वेळी उभयतांनी मंत्रिमंडळातील फेर बदलांबाबत निश्‍चिती केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव, उपाध्य विनय सहस्रबुध्दे, प्रल्हाद पटेल, सुरेश अंगडी, सत्यपाल सिंग व प्रल्हाद जोशी यांचा संभाव्य नव्या मंत्र्यांत समावेश होण्याची शक्यता आहे. एनडीत नव्याने सामील झालेल्या जेडीयूच्या आरसीपी सिंग व संतोष कुमार यांच्या नावांचीही चर्चा आहे. अभा अद्रमुकने मोदी मंत्रिमंडळात सामील होण्याचे ठरविल्यास त्या पक्षालाही प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या पक्षाचे नेते थम्बीदुराई यांनी गुरुवारी अमित शहा यांची भेट घेतल्याने तशी चर्चा आहे. पी. वेणुगोपाल व व्ही. मैत्रेयन हे त्यांचे संभाव्य उमेदवार असतील. मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची पंतप्रधानांसह संख्या ७३ आहे. ही संख्या ८१च्या पुढे वाढवता येत नाही. लोकसभेच्या एकूण ५४५ सदस्य संख्येच्या १५ टक्क्यांच्या वर मंत्र्यांची संख्या घटना दुरुस्तीनुसार वाढवता येत नाही.