मोदी… नवा शिकंदर?

0
111

-ऍड. रमाकांत खलप
मनमोहनसिंग यांच्या काळात अवकाशात झेपावलेले मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करीत असतानाच नरेंद्रभाईंचे मोदीयान अमेरिकेला अवतरले. मंगळयानापेक्षाही मोदीयानाचे उड्डाण जास्त लक्षवेधी आणि डोळे दिपावणारे ठरले होतेच. जेमतेम सहा महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावाखाली गुजरातेत अखंड दहा वर्षे राज्य केलेल्या नरेंद्रभाई मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड घोषित केली होती. त्यावेळी भाजपा एक मोठा जुगार खेळतोय व त्यात त्याला यश मिळणार नाही अशीच अटकळ भाजपेतर पक्षांनीच नव्हे तर खुद्द भाजपामधील अनेक धुरिणांचीही होती.
सोरटी सोमनाथ ते अयोध्या अशी ‘लॉंग मार्च’ काढणार्‍या लालकृष्ण अडवाणींना तर मोदींमुळे भाजपा हरेल असंच स्वप्न दिवसरात्री पडायचं. बोलभांड सुषमा स्वराज आणि राज्यसभेतले भाजपाचे विरोधी पक्षनेते अरुण जेठली यांनाही अडवाणी नाहीतर आम्ही असेच वाटायचे. पण मोदी वस्ताद ठरले. त्यांनी निवडणुकांचं तंत्र बदललं. नेहमीची पक्षीय पद्धतीची निवडणूक त्यांनी अध्यक्षीय पद्धतीची करून टाकली. अमेरिकेत ज्याप्रमाणे पक्षापेक्षा अध्यक्षपदाचा उमेदवारच जास्त महत्त्वाचा ठरतो तद्वत प्रत्यक्ष पद्धतीने पंतप्रधानच निवडायचा आहे अशी नवी खेळी त्यांनी लढवली. भारतीय लोकशाहीला हे नवे नवल होते. ‘अब की बार मोदी सरकार’ या एका घोषणेने अवघा भारत त्यांनी रंगवून काढला. न बोलणार्‍या मनमोहनपेक्षा हा बोलघेवडा उमेदवार लोकांना भावला. ‘भ्रष्ट कॉंग्रेसला हाकलून लावा, भारत कॉंग्रेसमुक्त करा’ हा नारा लोकांनी डोक्यावर घेतला.
१९९० सालापासून मनमोहनसिंग यांनी जोपासलेल्या आर्थिक धोरणामुळे भारताचे रूपांतर जगातल्या आर्थिक महासत्तेत झाले होते. अमेरिकेनंतर चीन व तिसर्‍या क्रमांकावर भारत इथपर्यंत भारताची पत जगामध्ये वाढली होती. परंतु राष्ट्रकुल खेळांमध्ये झालेला भ्रष्टाचार, कोळसा खाण प्रकरण व टेलिफोन स्पेक्ट्रम (२ जी) प्रकरण व त्यांवर न्यायालयांनी ओढलेले ताशेरे, भारताच्या ऑडिटर जनरलनी दिलेले रिपोर्ट, अण्णा हजारे व केजरीवाल यांनी उभा केलेला लढा व बाबा रामदेव यांची काळ्या पैशांविरुद्धची मोहीम या सर्व प्रकरणांचा एकत्रित परिणाम म्हणून भारतीय जनता नव्या नेतृत्वाच्या शोधात होती.
दुसर्‍या युपीए सरकारच्या उत्तरार्धात राहुल गांधी विरुद्ध मनमोहनसिंग असा खरा-खोटा संघर्ष रंगवण्यात वर्तमानपत्रे आणि विविध चॅनलस् यशस्वी ठरली. मनमोहनसिंगांचे ‘मौन’ युपीएला आणि विशेषतः कॉंग्रेसला फार महागात पडले. ‘भ्रष्ट’ राजकारण्यांना तात्पुरते अभय देणारे बिल माध्यमांसमोर जाहीररीत्या फाडून टाकून राहुल गांधींनी अप्रत्यक्षरीत्या युपीएलाच फोडून टाकले. याच काळात सत्तेची दोन केंद्र निर्माण झाल्याची भावना बळावली. यूपीए १च्या कालावधीत आर्थिक सुधारणांचा वेगाने धावणारा वारू दुसर्‍या पर्वात एका पायावर लंगडू लागला. नवे धोरण जाहीर करण्यात दिरंगाई दिसू लागली. एवढेच नव्हे तर टॅक्स धोरणाची अंमलबजावणी गतकाळापासून करण्याच्या निर्णयाने मोठ्या उद्योजकांचा रोष मनमोहनसिंग सरकारने ओढवून घेतला.
नरेंद्रभाईंनी या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. देशातले झाडून सारे भांडवलदार त्यांच्या मागे एकवटले. त्यांनी कुबेराच्या भांडाराची चावी मोदींच्या हाती सोपवली. सारी मिडिया मोदीमय झाली. जाहिरातबाजीचे उच्चतम तंत्र त्यांनी मोदींसाठी वापरले. रा. स्व. संघ, विश्‍व हिंदू परिषद इत्यादी संघटनांचे संघटनाचातुर्य मोदींचे युद्धतंत्र झाले. विदेशस्थ भारतीय एकवटले. जगातल्या बड्या नेत्यांच्या निवडणूक प्रचारासाठी प्रसिद्ध असलेल्या महागड्या कंपन्या मोदींशी करारबद्ध झाल्या आणि न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचं निवडणूक युद्ध भूमीवर, आकाशात, अवकाशात, पाण्यात, पाण्याखाली आणि इंटरनेटवरील फेसबुक, सोशल मिडियांच्या मार्फत लढवलं गेलं. यात कॉंग्रेस किंवा इतर पक्ष कुठेच नव्हते. शेपुट घालून त्यांनी आधीच पराभव मान्य केला होता. अशा एकतर्फी लढाईत विजय प्राप्त केलेले नरेंद्रभाई मोदी शिकंदराच्या थाटात सिंहासनाधिष्ठित झाले ही घटनाच जगाला स्तंभित करणारी होती.
एकेकाळचा चहा विकणारा पोर्‍या ही त्यांची छबी धूर्तपणे घुमवली गेली होती. आगेपीछे नातेवाईकांचा वा खुशमस्कर्‍यांचा गोतावळा नसलेला नेता, हे त्यांचे रूप सुंदररीत्या चितारले गेले होते. स्वीस व इतर बँकांत असलेली लाखो-करोडो रुपयांची संपत्ती मोदी सत्तेवर येताच आणतील अशी खात्रीच जनतेची पटली होती. पाकिस्तानची जिरवण्याची भाषा तर हे हरघडी करीत होते. चीनला तंबी देत होते. नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडणार होते आणि पाकधार्जिण्या अतिरेक्यांना कंठस्नान तेच घालतील असेच जनतेला पटवून देण्यात आले होते. गांधी-नेहरूंचा मिळमिळीत समाजवाद ते गाडून टाकणार व पटेलांसारखे पोलादी नेतृत्व देशालाच नव्हे तर जगालाही देणार, यासाठी जगातला सर्वात मोठा असा सरदार पटेलांचा पुतळा उभारण्यासाठी तर त्यांनी देशभरातून लोखंडही जमा केले होते. प्रत्येक हाताला काम, २४ तास वीज, सतत पाणीपुरवठा, प्रशस्त रस्ते व पूल, १०० नवी अत्याधुनिक शहरे, घरीदारी इंटरनेट, बुलेट ट्रेन, कितीतरी नवे विमानतळ आणि बंदरे अशा अत्यंत आशादायक अभ्यासाच्या जोरावर नरेंद्रभाई पंतप्रधानपदी आरूढ झाले होते. या सार्‍या पार्श्‍वभूमीवर त्यांनी अत्यंत दमदार आणि आत्मविश्‍वासपूर्वक अशी पावले पहिल्या दिवसापासून उचलली होती.
आठवावा तो शपथविधीचा दिमाखदार सोहळा. त्या सोहळ्यातली सार्क देशांच्या नेत्यांची उपस्थिती, नवाज शरीफशी घेतलेली गळाभेट व त्यापाठोपाठ नेपाळ, भूतान आदी देशांना दिलेल्या भेटी. शी जिनपिंग या चीनच्या नेत्याचं भारतातलं आगमन. त्यांना सुनावलेले खडे बोल. व त्यापाठोपाठ आता अमेरिका भेट. सारं काही स्वप्नवत वाटावं अशीच ही वाटचाल. नरेंद्रभाई मोदी हे खरेखुरे व्यापारी. जाहिरातीचं तंत्र आकंठ प्राशन केलेले मॅनेजमेंट तज्ज्ञ. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी आपला बिनबाह्याचा कोट उतरून ठेवल्याचं दिसत नाही. तोच जोष, तीच आक्रमकता, तेच भावनिक आव्हान व दरवेळी नवं नवलाईचं मार्केटिंग तंत्र या आधारावर नरेंद्रभाईंचं मोदीयान मंगळयानापेक्षाही वेगवान होऊन आता सार्‍या विश्‍वाला गवसणी घालतंय अशी भावना झाल्यास चुकीचं नव्हे.
आजवर संयुक्त राष्ट्रसंघात आपला दमदार ठसा उमटवणारे का कमी नेते झालेत. तरुण राजीव गांधींचं स्वागत याच राष्ट्रसंघानं केलं होतं. ख्रुश्‍चेेवचा बूट दाखवून धमकावण्याचा प्रकारही राष्ट्रसंघाने पचवला होता. आराफात आणि लिबियाचे मुअम्मद गदाफी यांची अरेरावीची भाषा त्या सभेने ऐकली होती. परवा इस्रायलचे नेतान्याहू यांचे इस्लामी आतंकवादावरचे उत्कृष्ट भाषणही ऐकले होते. तिथेच आपल्या मोदींचेही भाषण आपला ठसा उमटवून गेले. मेडिसन स्क्वेअरमधील सभा तर दृष्ट लागण्यासारखी झाली. त्यानंतरची ‘केम छोे मि. प्राईम मिनिस्टर’ या ओबामांच्या संबोधनाने सुरू झालेली ओबामा-मोदी भेट, तिथल्या उद्योजकांबरोबर झालेले वार्तालाप, ‘मेक इन इंडिया’चा नारा, विदेशस्थ भारतीयांना सुखावणारा आजीवन व्हिसा अशा एक ना अनेक घटनांचा उहापोह पुढे अनेक वर्षं होत राहणार आहे.
या गृहस्थाने भारतीयांची मान अभिमानाने ताठ केलेली आहे याबद्दल दुमत असूच शकणार नाही. व या सार्‍यावर वरताण करणारं त्यांचं स्वच्छ भारत अभियान व त्यासाठी महात्मा गांधींचा खुबीने केलेला उपयोगही अचंबित करणारा आहे. या सार्‍या धावपळीत बिचारे सरदार पटेल अडगळीत पडले किंवा टाकले गेले काय असं वाटू लागलंय. कालपरवापर्यंत त्यांचा अतिभव्य असा पुतळा उभारू म्हणणारे नरेंद्रभाई गांधींचा उल्लेख चुकूनही करत नव्हते. तेच मोदी वॉशिंग्टनमध्ये गांधींसमोर नतमस्तक झालेले जगाने पाहिले. परत येताच त्यांनी हाती झाडू घेऊनच महात्मा गांधींना २ ऑक्टोबरला अभिवादन केले. ‘ईश्‍वर अल्ला तेरो नाम, सबको सम्मती दे भगवान’ हे गांधींजींचं तत्त्वज्ञान इतक्या लवकर कोणाला सम्मती देईल असं वाटलं नव्हतं, ते मोदींनी प्रत्यक्षात उतरवलं. आपल्याबरोबर भाजपाला व संघालाही ते आता फरफटत नेऊ लागले आहेत काय? असं वाटू लागलंय. राममंदिराचा विसर तर कधीच पडलाय, परंतु मोदीत्व म्हणजेच हिंदुत्व असा नवा विचार तर जन्माला आला नसेल ना? अतिरेकी धर्मांधपणा कसा अंगाशी येऊ शकतो याचे उदाहरण बोको हराम, आयएसआयएस, अल् कायदा व तत्सम अतिरेकी संघटनांनी मुस्लीम राष्ट्रांना दाखवून दिले आहेच. नरेंद्रभाईंचं मोदीत्व हेच अधोरेखित करतंय असं वाटू लागलंय. काश्मीरप्रश्‍न युद्धाने सुटणार नाही हे मोदींनी लक्षात घेतलंय आणि मॅकमोहन रेषा खुद्द ब्रिटिश काळातही मान्य झालेली नव्हती. त्यामुळेच चीनबरोबरचा बखेडा आजवर चालत आलाय. तशातच एक अतिबलाढ्य देश म्हणून चीन जगाच्या पाठीवर अवतरलाय. दीर्घ वाटाघाटीतूनच चीनबरोबरचा हा तंटा सुटणार आहे. मागील सरकारांना विशेषतः नेहरूंना दोष देऊन हा प्रश्‍न सुटणारा नाही याची जाणीवही नरेंद्र मोदींना आहे असंच त्यांच्या वक्तव्यांवरून वाटतंय. नव्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग नरेंद्र मोदींनी प्रचाराच्या काळात करून घेतला होताच. त्या तंत्रज्ञानाची कास ते धरताहेत त्यात त्यांचा धोरणीपणाही दिसून येतो. तरुण राजीव गांधीनीही नव्या युगाच्या तंत्रज्ञानाची कास धरली होती. त्यातूनच आयटीमधली प्रगती भारताने गाठली हेही त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मानावेच लागेल.
प्रगतीचा कळस पूर्वसुरींनी उभारलेल्या बुनियादीवरच होणार आहे. ही प्रगती चौफेर असायला हवी. फक्त पुंजीवादाची कास धरून हे घडणार आहे का? पाच वर्षांपूर्वी अमेरिकेचे अर्थकारण पार कोसळले. त्यांच्या शेकडो बँका बुडाल्या. आपल्याबरोबर अमेरिकेने युरोपलाही रसातळाला नेले. अशा वेळी आपले अर्थकारण, आपल्या बँका अभंग राहिल्या. गांधी-नेहरूंच्या समाजवादी अर्थशास्त्रामुळे हे घडले असे उद्गार अनेक अर्थतज्ज्ञांनी काढले. रशियाचा खेळखंडोबा झाला तेव्हाही आम्ही दिमाखाने उभे राहिलो. मिश्रअर्थकारणाचा भारताचा प्रयोग फसलेला नाही हेच आजवर सिद्ध झालंय. योजना आयोग मोदींनी मोडीत काढलाय, पण त्याऐवजी नमके नवे ते काय करणार आहेत याची खबरबात नाही आहे. ‘आम्ही स्वस्ताई आणू’ असं म्हणणं निवडणुका जिंकण्यापुरतंच असतं हे तर आता कळून चुकलंय. पुढं काय वाढून ठेवलंय याची वाट जनता पाहातेय. विदेशस्थित भारतीयांच्या भारतात परतीच्या वाटा गोठल्यात. त्यानी परदेशांचं नागरिकत्व स्वीकारलंय. हा देश भिकारडा अशी बोळवण कालपर्यंत ते करीत असत. इथले अनेकजण पोर्तुगाल, कॅनडा, युरोप, अमेरिकेला जाण्यासाठी त्या-त्या देशींच्या वकिलातींपुढे रांगा लावून बसलेले आहेत. त्यांचं भारतप्रेम हे सासुरवाशिण झालेल्या सुनबाईच्या माहेरप्रेमासारखं असतं. माहेर तुटलेलेले हे भारतीय नरेंद्रभाईंना पाहून गहिवरले असल्यास नवल नाही. नरेंद्रभाईंनीही त्यांच्या ताटात कायम व्हिसारूपी ओवाळणी टाकलेली आहे. आपला पैसा वा ज्ञान-तंत्रज्ञानाचा फायदा ते आपल्या माहेराला करून देतील का हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे.
नरेंद्रभाईंच्या कारभारातून त्यांचं एकछत्री वागणं मात्र प्रकर्षानं पुढं येतंय. त्यांनी आपल्या सहकार्‍यांची बोलतीच बंद केली आहे. प्रसारमाध्यमांशी तर ते बोलतच नाहीत. आपण जनतेशीच प्रत्यक्ष बोलतोय असा त्यांचा दावा आहे. यासाठी ते सोशल मिडियांचा आधार घेत आहेत. परंतु हे दुधारी शस्त्र आहे. परवा गोव्यात नागपूरचे पत्रकार सुरेश द्वादशीवार येऊन गेले. मोदींच्या सरकारातल्या अनेक मंत्र्यांच्या त्यांनी आजवर अनेक मुलाखती घेतल्या आहेत. पत्रकारांशी सदैव जवळीक असणारे हे मंत्री आता मौनीबाबा झालेत. द्वादशीवारांनी सुषमा स्वराज यांचा एक किस्सा सांगितला तो महत्त्वाचा. हल्लीच ते दिल्लीत जाऊन सुषमा स्वराजना भेटून आले. तुम्ही आता बोलत का नाही असं त्यांनी सुषमा स्वराजना विचारलं तर त्या उद्गारल्या, ‘‘आता मी कसं बोलू शकते? माझा त्यानी पेपरवेट केलाय.’’ द्वादशीवारानी म्हणे हे संभाषण छापून प्रसिद्ध केलेय. मोदींसाठी ही धोक्याची घंटा आहे. देशासाठी तर आहेच आहे. नरेंद्रभाय, कॉंग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षप्रणालींना कनवटीला खोचून मध्यमार्गाद्वारे मुसंडी मारण्याची धमक तुमच्यामध्ये दिसते आहे. भारताला सर्वसमावेशक असे नवे अर्थकारण व नवे समाजधोरण देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहात का? त्यासाठी तुमचा मूळ पक्ष व मूळ संघटना आपण ‘इर्रेलवंट’ करू पाहत आहात का? नव्या दमाचा नवा शिकंदर म्हणून अवतार घेतला आहे का?