मोदी केअर योजनेसाठी दीर्घ प्रतीक्षा

0
78

>> कॅशलेस योजना ः कोट्यवधी कुटुंबांना लाभ

गुरुवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘मोदी केअर’ योजनेची घोषणा करताना वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असल्याचा दावा केला असला तरी ही योजना सुरू होण्यास तब्बल आठ महिने वाट पहावी लागणार आहे.

ही योजना कॅशलेस स्वरुपाची असून त्यासाठी गांधी जयंतीची मुहूर्त निवडण्यात आल्याने तोपर्यंत त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एका नियतकालिकाने आयोजित कार्यक्रमात जेटली यांनी या योजनेवर अधिक भाष्य केले.
राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेअंतर्गत येणार्‍या या मोदी केअर योजनेसाठी आवश्यकता भासल्यास निधीची मर्यादाही वाढविण्यात येणार आहे. या योजनेखाली देशातील ४० टक्के जनतेला म्हणजेच १० कोटी कुटुंबांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हायचे झाल्यास ५ लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांसाठी विमा कवच मिळणार आहे.

जेटली यांनी याविषयी सांगितले की, या योजनेखाली मध्यम व उच्चस्तरीय रुग्णालयात उपचारांसाठी खर्चाचा विमा मिळणार आहे. यात सर्व सरकारी रुग्णालये आणि काही निवडक खासगी इस्पितळे यांचा समावेश असेल. ही योजना विश्‍वासार्हता व विमा यांच्या मॉडेलवर आधारीत आहे. या योजनेवर आणखी अभ्यास सुरू असून नीती आयोग व केंद्रीय आरोग्य मंत्रालयात चर्चा सुरू आहे.
विमा मॉडेल तयार झाल्यानंतर विमाधारकांची संख्या जशी वाढत जाईल तसा त्यावरील हप्ता कमी होईल असे जेटली म्हणाले.