मोदींवरील टीका अनाठायी : भाजप

0
99

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौर्‍यावर कॉंग्रेस पक्षाने केलेली टीका अनाठायी आहे. भाजप या टीकेचा निषेध करीत आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केले.

कॉंग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौर्‍यावर टीका करून विदेश दौर्‍याचा विक्रम गिजीज बुकमध्ये नोंदविण्याची मागणी केली होती.
या टीकेला उत्तर देताना भाजपचे प्रवक्ते नाईक म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाला ५० वर्षांत देशाचा विकास साधण्यात अपयश आले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ चार वर्षांत सर्वांगीण विकास साधण्यात यश मिळविले आहे. या कार्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे नाव गिनीज बुकमध्ये अवश्य नोंदविले पाहिजे, असा दावा नाईक यांनी केला.

पंतप्रधान मोदी यांच्या विदेश दौर्‍यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांबरोबर राजकीय संबंध सुधारण्यास मदत झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला प्रतिष्ठा मिळू लागली आहे. विदेशी गुंतवणुकीत वाढ होत आहे. कॉंग्रेस पक्षाला दौर्‍यावर खर्च केलेला केवळ पैसा दिसत आहे, असा दावा भाजपचे प्रवक्ते नाईक यांनी केला.
कॉंग्रेस पक्षाने पंतप्रधान मोदी यांच्यावर केवळ टीकेसाठी टीका करू नये. तसेच लोकांमध्ये जाती, धर्माच्या नावावर फूट पाडून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही नाईक यांनी सांगितले. यावेळी प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांची उपस्थिती होती.