मोदींच्या सकारात्मक प्रतिसादामुळे खाणी दोन-तीन महिन्यांत सुरू होणार

0
100

>> आमदार नीलेश काब्राल यांचा दावा

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाणप्रश्‍नी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व खाण प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी मोदी यांनी स्थापन केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या गटाशी मंगळवारी चर्चा केल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता गोव्यातील खाणप्रश्‍न येत्या दोन ते तीन महिन्यांत सुटण्याची शक्यता खाणपट्ट्यातील एक आमदार नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली. प्रधानमंत्री मोदी यांनी सदर प्रश्‍नावर सकारात्मक प्रतिसाद देत पुढील दोन ते तीन महिन्यांत तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे ते म्हणाले.

प्रधानमंत्री मोदी यांनी गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग येत्या दोन ते तीन महिन्यांत सुरू करण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्‍वासन पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले आहे, असे काब्राल यांनी स्पष्ट केले. पर्रीकर व मोदी यांच्यात झालेल्या सकारात्मक अशा चर्चेमुळे राज्यातील खाणी सुरू होण्यासाठीचा मार्ग सुकर झाला असल्याचे काब्राल म्हणाले.

नवी दिल्लीतील कायदा खाते योग्य अभ्यास करून या प्रकरणी तोडगा काढणार आहे. गोव्यातील खाण उद्योग सुरू व्हायला हवा याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्र्यांच्या गटाचेही एकमत झाले असल्याचे काब्राल यांनी स्पष्ट केले. गोव्यासाठी ही आनंदाची व जमेची बाजू असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय समितीला आणखी एक शिष्टमंडळ भेटणार
गोव्यातील खाणीचा प्रश्‍न धसास लावण्यासाठी गोव्यातील एक शिष्टमंडळ १५ दिवसांत पुन्हा एकदा केंद्रीय मंत्र्यांच्या गटाला भेटून बैठक घेणार आहे, अशी माहिती आमदार नीलेश काब्राल यांनी दिली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिष्टमंडळ काम करणार असल्याचे ते म्हणाले. महिन्यातून दोनदा होणार असलेल्या या बैठकीत खाणप्रश्‍नावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.