मोठ्या सरकारी इस्पितळांच्या रुग्णांना सकस अन्न पुरवणार

0
129
????????????????????????????????????

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती ः खास कंपनीची नियुक्ती

राज्यातील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्हा हॉस्पिटल तसेच सरकारच्या मोठ्या हॉस्पिटलमधील रुग्णांना सोडेक्सो या कंपनीच्या माध्यमातून स्वच्छ व सकस अन्न पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना बांबोळी येथे काल दिली.
बांबोळी येथील नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोडेक्सो कंपनीच्या माध्यमातून अन्न पुरवठा करण्याच्या योजनेचा शुभारंभ केल्यानंतर आरोग्य मंत्री राणे यांनी वरील माहिती दिली.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये सोडेक्सो या कंपनीच्या माध्यमातून स्वच्छ व सकस अन्न पुरवठा हॉस्पिटलमधील रुग्ण, डॉक्टर, विद्यार्थी यांना केला जात आहे. आता, नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुध्दा सोडेक्सोची अन्न सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
राज्यात वैद्यकीय पर्यटनाला प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. पेडणे येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्य १२० खाटांच्या हॉस्पिटलातून वैद्यकीय पर्यटनाला सुरुवात करण्यात येणार आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

बांबोळी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम येत्या ६ महिन्यात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयावर रुग्ण सेवेचा मोठा ताण येत आहे. त्यामुळे नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मोठे असल्याने सदर हॉस्पिटल चालविण्याबाबत वेगवेगळ्या पर्यायावर विचार विनिमय सुरू आहे. बांबोळी येथे कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील अर्थसाहाय्य मंजूर झाले आहे. कॅन्सर हॉस्पिटलसाठी मुंबईतील टाटा हॉस्पिटल व इतर हॉस्पिटलची मदत घेतली जाणार आहे. राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करताना खासगी वैद्यकीय क्षेत्राला विश्‍वासात घेतले जाणार आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य कायद्यात दुरुस्तीची गरज असून आरोग्य संचालनालयाला नोडल एजन्सी म्हणून कार्यरत करण्याची गरज आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

औद्योगिक कँटीन’ संकल्पनेचा प्रस्ताव

राज्यातील वेर्णा आणि कुंडई औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणार्‍या कामगारांना पोषक अन्न सुविधा उपलब्ध करण्यासाठी औद्योगिक कॅन्टीन ही वेगळी संकल्पना राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती उद्योग व आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना पोषक अन्न सुविधा मिळत नसल्याचे आढळून आले आहे. ज्याप्रमाणे रुग्णाला पोषक अन्न उपलब्ध झाले पाहिजे. त्याच धर्तीवर कामगारांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना पोषक अन्न उपलब्ध होणे आवश्यक आहे. परंतु, येथे कामगार वर्गाला पोषक अन्न सुविधा उपलब्ध होत नाही. कामगारांना अस्वच्छ वातावरणातील आहार घ्यावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील जास्त कामगारांची संख्या असलेल्या वेर्णा आणि कुंडई येथील औद्योगिक वसाहतीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पोषक अन्न सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. या अन्न सुविधेसाठी सोडेक्सो या खासगी कंपनीशी बोलणी केली जाणार आहेत, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणार्‍या कामगारांचा आढावा व सर्वेक्षण केल्यानंतर पुढील पाऊल उचलण्यात येणार आहे. गोवा राज्य औद्योगिक संघटना, जीसीसीआय या संस्थाकड़ून सुध्दा अशा प्रकारच्या आहार सुविधांचा पाठपुरावा केला जात आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.