मोठ्या विजयासह गोव्याला ‘ब’ गटाचे जेतेपद

0
108

>> संतोष चषक पश्‍चिम विभाग पात्रता स्पर्धा; दादरा व नगर हवेलीवर लादले १४ गोल

डेन्सन फर्नांडिस आणि ऑलविन कार्दोजो यांनी हॅट्‌ट्रिकसह नोंदविलेल्या प्रत्येकी ४ गोलांच्या जोरावर गोव्याने धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या संतोष चषक पश्‍चिम विभाग पात्रता स्पर्धेतील सामन्यात काल दादरा व नगर हवेलीचा १४-० असा धुव्वा उडवित ‘ब’ गटाचे जेतेपद प्राप्त केले.

डेन्सन आणि ऑल्विन यांच्याव्यतिरिक्त ऍरेन सिल्वानेही शानदार हॅट्‌ट्रिक नोंदविली. तर रिभव सरदेसाई, स्टँडली फर्नांडिस आणि राखीव खेळाडू सॅमसन परेरा यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला.

ब गटातील या शेवटच्या लीग सामन्यात गोव्याचे प्रशिक्षक ऍन्थनी लेविनो यांनी राखीव खेळाडूंना संधी दिली. युवा खेळाडूंनी मिळालेल्या या संधीचे सोने करताना प्रारंभापासूनच आक्रकम खेळ करीत प्रतिस्पर्ध्यांवर हल्ले चढविले. सामन्याच्या प्रारंभीचव ४थ्या मिनिटाला ऍरन सिल्वाने गोव्याचे खाते खोलले. लगेच पुढच्या मिनिटाला ऑल्विन कार्दोजोने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील आपला पहिला गोल नोंेदविताना आघाडी २-० अशी केली. १७व्या मिनिटाला ऍरेन सिल्वाने स्वतःचा दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदविला. तर ऑल्विन कार्दोजोने स्वतःचा दुसरा गोल नोंदवित गोव्याला ४-० अशा आघाडीवर नेले. त्यानंतर स्टँडली फर्नांडिस, रिभव सरदेसाई आणि डेन्सन फर्नांडिस यांनी गोल प्रत्येकी १ गोल नोंदवित गोव्याला मध्यंतरापर्यंत ७-० अशा मजबूत आघाडीवर नेले.

दुसर्‍या सत्रातही गोव्याने खेळावर पूर्ण वर्चस्व राखले होते. डेन्सन फर्नांडिस, ऑलविन कार्दोजो आणि ऍरेन सिल्हा या त्यांच्या तीन खेळाडूंनी आपल्या हॅट्‌ट्रिक पूर्ण करीत संघाला १४-० अशा मोठ्या विजयासह ‘ब’ गटात अव्वल स्थानासह जेतेपद प्राप्त करून दिले.

विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना संघाचे प्रशिक्षक ऍन्थनी लेविनो यांनी निकालाबद्दल खूश असल्याचे सांगितले. मला माझ्या खेळाडूंचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगून या विजयामुळे आपल्या खेळाडूंचे मनोधर्य वाढण्यास मदत होणार असून मला अशा आहे की यापुढेही ही कामगिरी आम्ही अशीच चालू ठेवू, असे लेविनो यांनी सांगितले.

गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांनीही गोव्याच्या संघाचे अभिनंदन केले.

तत्पूर्वी झालेल्या सामन्यात राजस्थानने मध्य प्रदेशवर २-१ अशी मात करीत पूर्ण गुणांची कमाई केली. सामन्याच्या १४व्या मिनिटाला बिक्रम सरकारने मध्य प्रदेशला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. दुसर्‍या सत्रात दमदार पुनरागमन करताना संजय लांबाच्या गोलमुळे राजस्थानने १-१ अशी बरोबरी साधली. तर शिवम भाकेरने राजस्थानच्या २-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केला.