मोठ्या आतड्याचा व गुद भागाचा कर्करोग

0
571

कोलोरेक्टल कर्करोगाच्या अवस्था व निदानाचे घटक व प्रसार ह्या गोष्टी आपण ह्या व पुढील लेखात सविस्तर पाहणार आहोत. ह्या कर्करोगाचे निदान हे त्या गाठी आतड्यामध्ये किती खोलवर रुतल्या आहेत त्यावर व स्थानिक लसिका ग्रंथीमध्ये रोगाचा किती प्रसार झाला आहे, तसेच दूरवरच्या भागांमध्ये व्याधी किती पसरला आहे… ह्यावर ठरवले जाते.
आता ह्या लेखात प्रथम आपण कोलोरेक्टल कर्करोगाच्या अवस्था जाणून घेऊ-
१) स्टेज शून्य
ह्यात कर्करोग हा अत्यंत सूक्ष्म अवस्थेत असतो. कर्करोगाच्या पेशी ह्या मोठे आतडे व गुद भागात फक्त तिथल्या श्लेष्मल कलेपर्यंतच सीमित असतात.
२) स्टेज पहिली
ह्यात कर्करोग हा श्लेष्मल कलेत पसरून तो आंत्र व गुदाच्या मान्सपेशींपर्यंत पसरतो. पण अन्य भागात व लसिका ग्रंथीमध्ये पसरत नाही.
३) स्टेज दुसरी
ह्यात कर्करोग हा आंत्र व गुद भागाच्या भिंतीमध्ये पोहोचतो पण जवळच्या पेशी व लसिका ग्रंथीमध्ये त्याचा प्रसार होत नाही.
४) स्टेज दुसरी-‘ब’
ह्या अवस्थेत कर्करोग हा वाढून गुद व आन्त्राच्या मांसपेशींपासून ते उदर आवरणापर्यंत अर्थात उदरातील आवरण ज्याला व्हिसरल पेरिटोनियम म्हणतात तिथपर्यंत पोहोचलेले असते पण जवळच्या लसिका ग्रंथी व अन्य भागात तो पसरत नाही.
५) स्टेज दुसरी-‘क’
ह्या अवस्थेत गाठ ही आंत्र व गुदाच्या भिंतीमध्ये पसरते तसेच त्या भागातील अन्य पेशीमध्ये देखील तिचा प्रसार होतो. पण स्थानिक लसिका ग्रंथी व अन्य भागात मात्र त्याचा प्रसार होत नाही.
६) स्टेज तिसरी
ह्या अवस्थेत कर्करोगाची वाढ ही आन्त्राचा आतील स्तर व मासपेशींपर्यंत पसरतो. तसेच तो १-३ लसिका ग्रंथींमध्ये देखील प्रसार पावतो. किंवा ह्याचा प्रसार आन्त्राच्या सभोवताली पसरलेल्या गाठीमध्येदेखील होतो ज्या दिसायला अगदी लसिका ग्रंथींप्रमाणे भासतात पण अन्य भागांमध्ये पसरत नाही.
७) स्टेज तिसरी -‘ब’
ह्या अवस्थेत कर्करोग हा आंत्र भिंती किवा आजूबाजूच्या अवयव व १-३ लसिका ग्रंथी किवा गाठीचा भाग जो आजूबाजूच्या पेशीमध्ये पसरला आहे त्यात प्रसार पावतो. पण अन्य अवयवात प्रसार झालेला नसतो.
८) स्टेज तिसरी-‘क’
ह्या अवस्थेत कर्करोग हा आंत्र व गुद भागात व तिथल्या स्थानिक प्रदेशात खूप खोलवर पसरतो. तसेच ४ किवा अधिक लसिका ग्रंथींमध्येदेखील तो पसरतो पण अन्य भागातील अवयवात मात्र पसरत नाही.
९) स्टेज चौथी
ह्या अवस्थेत कर्करोग हा दूरवरच्या एखाद्या अवयवात पसरतो जसे आंत्र किवा फुफ्फुस इत्यादी.
१०) स्टेज चौथी-‘ब’
ह्या अवस्थेत कर्करोग हा शरीराच्या एकापेक्षा अधिक भागात प्रसार पावतो.
११) स्टेज चौथी-‘क’
ह्या अवस्थेत कर्करोग हा उदर आवरण, तसेच अन्य भागातील अवयवात पसरतो.
जोपर्यंत कोलोरेक्टल कर्करोग हा आपले स्थान सोडून अन्य भागात पसरतो तिथे तो मोठ्या प्रमाणात प्रसार पावत नाही, तोपर्यंत शस्त्रक्रिया केल्याशिवाय, तो भाग काढल्याशिवाय व त्या भागाची नीट तपासणी केल्याशिवाय रोगाची नेमकी अवस्था सांगणे कठीण असते.