मॉर्कलने केली निवृत्तीची घोषणा

0
102

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्कल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांची मालिका आपली शेवटची मालिका असेल, असे मॉर्कलने काल सोमवारी पत्रकारपरिषदेत सांगितले. भारताविरुद्धची मालिका सुरु असताना मॉर्कलच्या चर्चांना उधाण आले होते. ‘कोल्पाक’ करार करून मॉर्कल आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा निरोप घेणार असे वृत्त देखील प्रसिद्ध झाले होते. परंतु, १५ जानेवारी रोजी मॉर्कलने याचे खंडन केले होते. यावेळी मात्र मॉर्कलने स्वतः घोषणा केली. ३ एप्रिल रोजी संपणारी जोहोन्सबर्ग कसोटी मॉर्कलची शेवटची असेल.

२०१६ साली मॉर्कलला पाठीची गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला जवळपास वर्षभर स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. न्यूझीलंड, श्रीलंका व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांमध्ये त्याला खेळता आले नव्हते. मागील वर्षी मार्च महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेद्वारे त्याने पुनरागमन करताना प्रभावी कामगिरी केली होती. २०१५च्या विश्‍वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी घेतल्यानंतर मॉर्कलचा मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी क्वचितच उपयोग करण्यात आला. २०१६च्या टी-२० विश्‍वचषकातही त्याला स्थान देण्यात आले नव्हते. मागील वर्षीच्या आयपीएलमध्येदेखील तो खेळला नाही व यंदाच्या लिलावात त्याला खरेदीदार मिळाला नाही. २०१९च्या विश्‍वचषकासाठी संघातील जागेची निश्‍चिती नसल्याने मॉर्कलने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.