मॉरिसला संधी

0
94

>> केपटाऊन कसोटीसाठी आफ्रिका संघ जाहीर

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील केपटाऊन येथे होणार्‍या पहिल्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने आपला १५ सदस्यीय संघ काल शुक्रवारी जाहीर केला. वेगवान गोलंदाज दुआने ऑलिव्हर याला या संघात जागा मिळाली नसून त्याच्या जागी अष्टपैलू ख्रिस मॉरिस याचे पुनरागमन झाले आहे. तंदुरुस्तीच्या अभावी झिंबाब्वेविरुद्धच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला मुकलेल्या डेल स्टेन व फाफ ड्युप्लेसिस यांनोदखील स्थान मिळाले आहे. झिंबाब्वेविरुद्धच्या कसोटीत स्नायू दुखावलेल्या क्विंटन डी कॉक याच्या जागी अतिरिक्त यष्टिरक्षकाची निवड करण्यात आलेली नसून पहिल्या कसोटीपूर्वी तो तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे.

जुलै महिन्यात इंग्लंडच्या दौर्‍यात पाठदुखीने डोके वर काढल्यानंतर मॉरिस याने तेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या रॅम स्लॅम टी-२० स्पर्धेत खेळून त्याने स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध केली. अंतिम सामन्यात १३ धावांत ४ बळी घेत त्याने आपली फ्रेंचायझी टायटन्सला स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देत दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थानेदेखील मिळविले.
दक्षिण आफ्रिका संघ ः फाफ ड्युप्लेसिस, हाशिम आमला, तेंबा बवुमा, क्विंटन डी कॉक, थ्युनिस डी ब्रुईन, एबी डीव्हिलियर्स, डीन एल्गार, केशव महाराज, ऐडन मारक्रम, मॉर्ने मॉर्कल, ख्रिस मॉरिस, आंदिले फेलुकवायो, व्हर्नोन फिलेंडर, कगिसो रबाडा व डेल स्टेन.