मैत्रीचा उगवता सूर्य

0
123

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान भेटीतून दोन्ही देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधांचे एक नवे पर्व सुरू होण्याची आशा जागली आहे. काल दोन्ही देशांत पाच करारही करण्यात आले. जपान आणि भारत यांचे संबंध पूर्वापार चालत आले आहेत आणि सहाव्या शतकात भारतातून जपानमध्ये पोहोचलेला बौद्ध धर्म हा दोन्ही देशांना जोडणारा बळकट सांस्कृतिक दुवा आहे. येथे आवर्जून नमूद करण्याजोगी बाब म्हणजे सोळाव्या शतकात जपानी गोव्याच्या पोर्तुगिजांशी संपर्कात होते. सोळाव्या शतकात जपानमध्ये ख्रिस्तीविरोधी छळसत्र सुरू झाले, तेव्हा अनेक जपानी ख्रिस्त्यांनी गोव्यात आसरा घेतला होता. गोव्यात खाण व्यवसाय रुजला तेव्हा ज्या देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाले, त्यामध्ये जपानही होता. जपानविषयी भारतीयांच्या मनामध्ये आदराची आणि आपुलकीची भावना सतत राहिली आहे, कारण नेताजी सुभाषचंद्रांच्या आझाद हिंद सेनेला ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी जपानने साह्य केले होते हे भारतीयांच्या मनावर पक्के बिंबलेले आहे. आधुनिक जपानमधील कार्यसंस्कृतीचीही छाप भारतीयांवर आहे. मारुती – सुझुकी असो किंवा सोनी, टोयोटा, होंडासारख्या जपानी कंपन्या असोत, त्यांच्या कार्यक्षमतेची आणि कार्यशैलीची मुद्रा भारतीयांच्या मनावर आहे. या सगळ्यामुळे जपानविषयी भारतीयांची भावना नेहमीच सकारात्मक राहिली आहे. चीनप्रमाणे जपानशी भौगोलिक विवाद नसल्याने भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये अडसर येण्याचे काही कारण नाही. अणुबॉम्बने हिरोशिमा आणि नागासाकीत केलेल्या विनाशात होरपळलेला जपान आण्विक विषयांवर संवेदनशील आहे आणि भारताशी त्यासंदर्भात काही मुद्द्यांवर तो आग्रही राहिला आहे इतकेच. बाकी, जपान आणि भारत यांच्यातील संबंध नेहमीच सकारात्मक राहिले आहेत. मोदींच्या जपान भेटीतूनच हे संबंध प्रस्थापित झाले आहेत असे म्हणणे गैर ठरेल. अगदी नेहरूंपासून मनमोहनसिंगपर्यंत झालेल्या उभयपक्षी प्रयत्नांची पार्श्वभूमी आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही. नेहरूंनी ४९ साली जपानला आपल्या कन्येच्या नावाचा ‘इंदिरा’ हत्ती भेट दिला होता. त्यानंतर आलेल्या सरकारांनीही जपानशी सौहार्दाचे संबंध नेहमीच जोपासले. मनमोहन सिंग सरकारच्या काळातही जपानशी मैत्रिपूर्ण चर्चा सुरू होती. दोन्ही देशांचे नेते एकमेकांना भेटत आले आहेत, परस्पर सहकार्याने पुढे जाण्याचा विचार करीत आले आहेत. पण तरीही मोदी यांच्या जपान भेटीकडे वेगळ्या अपेक्षांनी पाहिले जात आहे, कारण मोदींच्या जपान भेटीमागे केवळ जपानशी मैत्रिपूर्ण संबंध विकसित करणे एवढाच उद्देश नाही. त्या संबंधांचा प्रत्यक्ष व्यवहारात कसकसा उपयोग करता येईल त्यावर मोदींचा भर आहे. म्हणूनच तर खुद्द पंतप्रधान कार्यालयात जपानी कार्यक्षमता रुजवण्यापासून कौशल्यविकास, साधनसुविधा विकास, अणुऊर्जा, संरक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याची ठोस पावले उचलण्यावर मोदींनी भर दिलेला दिसतो. हे उभय संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यानच्या सांस्कृतिक धाग्यांवर त्यांनी भर दिला असल्याने ही चर्चा केवळ औपचारिक उरलेली नाही, तर त्यामध्ये अधिक भावनिक जवळीक निर्माण झाली आहे. भारत आणि जपान यांच्यातील हे भावबंध चीनच्या डोळ्यात खुपल्यावाचून राहणार नाहीत. चीन आणि जपान यांचे वाकडे आहे. सागरी हद्दीवरून आणि सेनकाकू बेटांवरून त्यांच्यात तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे भारत आणि जपान यांच्यातील परस्पर सहकार्याकडे चीन सावधगिरीनेच पाहतो आहे. पण चीन वा पाश्‍चात्त्य देशांचा दृष्टिकोन काहीही असो, भारत आणि जपान यांच्यातील नव्या मैत्रिपर्वाचा दोन्ही देशांना निश्‍चितच फायदा होणार आहे. भारतातील जपानी गुंतवणूक येत्या पाच वर्षांत दुप्पट होणार आहे. अणुकरार होऊ शकला, तर भारतीय अणुप्रकल्पांना महत्त्वाचे भाग जपानी कंपन्या पुरवू शकतील. जपानच्या बदललेल्या संरक्षण निर्यात नीतीचा लाभ अलीकडेच ४९ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीस मान्यता दिलेला भारतही मिळवू शकेल. आरोग्य, महिला विकास, ऊर्जा, साधनसुविधा आदी क्षेत्रांसंदर्भात जपानशी काल झालेल्या करारांतून नव्या आशा जागल्या आहेत. बुलेट ट्रेनचे आधुनिक तंत्रज्ञान भारताला मिळणार आहे. उगवत्या सूर्याचा देश असलेल्या जपानच्या साथीने भारतामध्ये प्रगतीचा नवा सूर्य उगवेल काय?