मेव्हरिक्सकडून खेळणार मणिका

0
119

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मणिका बत्रा आरपीएसजी मेव्हरिक्स कोलकाताकडून तर स्टार खेळाडू अचंता शरथ कमल पदार्पणवीर चेन्नई लायन्स संघाकडून अल्टिमेट टेबल टेनिस लीग स्पर्धेच्या तिसर्‍या मोसमात खेळणार आहे. २५ जुलैपासून दिल्लीत या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मेव्हरिक्स कोलकाताने सानिल शेट्टी व १८ वर्षांखालील मुलांच्या जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावरील मनुष शहा यालादेखील आपल्या संघात सामावून घेतले आहे. दबंग दिल्ली टीटीसीने २५ वर्षीय साथियान गणशेखरन याला संघात राखल्याने खेळाडूंच्या ड्राफ्टच्या पहिल्या फेरीत त्यांना खेळाडू निवडण्याची संधी मिळाली नाही. नवीन फ्रेंचायझी यू मुंबाने हॉंगकॉंगच्या दो होई केमला तर पुणेरी पलटणने अनुभवी हरमीत देसाईला आपल्या चमूत घेतले. जर्मनीची पेट्रिसिया सोलजा व पोर्तुगालचा तियागो अपोलोनिना ही दुकली चेन्नई लायन्स संघाकडून खेळेल. अल्टिमेट टेबल टेनिस लीग स्पर्धेला भारतीय टेबल टेनिस महासंघाव्यतिरिक्त बुंदेसलिगाकडूनही पाठिंबा मिळाला असून त्यांनी ‘युटीटीएल’चे वेळापत्रक पाहून आपल्या तारखा निश्‍चित केल्या आहेत. मागील वर्षीय एका लढतीत सात सामन्यांचा समावेश होता. यंदामात्र केवळ पाच सामने होतील तसेच स्पर्धेतील सामने तीन वेगवेगळ्या ठिकांणांऐवजी एकाच ठिकाणी म्हणजे दिल्लीतच होणार आहेत.

संघ ः चेन्नई लायन्स ः शरथ कमल, पेट्रिसिया सोलजा, तियागो अपोलोनिया, मधुरिका पाटकर, यशिनी शिवशंकर, अनिर्बन घोष.
दबंग दिल्ली टीटीसी ः साथियान गणशेखरन, बर्नाडेट झोक, जॉन पार्सन, पार्थ वीरमणी, नैना, कृतविका सिन्हा रॉय.
गोवा चॅलेंजर्स ः चेंग आय चिंग, अर्चना कामत, अँथनी अमलराज, सिद्धेश पांडे, श्रुती अमृते, अल्वारो रोबल्स.
पुणेरी पलटण टीटीसी ः चॉंग चियान युआन, हरमीत देसाई, अयहिका मुखर्जी, सेलेना सेल्वाकुमार, रोनित भांजा व सबिन विंटर.
आरपीएसजी मेव्हरिक्स कोलकाता ः मणिका बत्रा, बेनडिक्ट डुडा, मालटिडा एकहोल्म, मनुष शहा, प्राप्ती सेन व सानिल शेट्टी.
यू मुंबा ः दो होई केम, मानव ठक्कर, सुतिर्था मुखर्जी, किरिल गेरासिमेंको, जीत चंद्रा व मौमिता दत्ता.