मेरी कोम फायनलमध्ये

0
105
India's Mary Kom (in blue) fights Sri Lanka's Anusha Dilrukshi Koddithuwakku (in red) during their women's 45-48kg category semi-final boxing match during their 2018 Gold Coast Commonwealth Games at the Oxenford Studios venue in Gold Coast on April 11, 2018. / AFP PHOTO / YE AUNG THU

पाचवेळच्या विश्‍वविजेत्या मेरी कोमने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४५-४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ३५ वर्षीय मेरीने काल झालेल्या उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या ३९ वर्षीय अनुशा दिलरुक्षी कोड्डीथूवाक्कू हिला ५-० असे पराजित केले. १४ एप्रिल रोजी सुवर्णपदकासाठी तिचा सामना नॉर्दन आयर्लंडच्या क्रिस्टिना ओ हारा हिच्याशी होणार आहे. ओहाराने न्यूझीलंडच्या १९ वर्षीय टास्मिन बेनी हिला पराजित केले. मेरीची प्रतिस्पर्धी अनुशाला आपल्या उंचीचा फायदा उठविता आला नाही. शेवटच्या फेरीत तिने काही ठोसे लगावले. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सर्व पाचही पंचांनी मेरीच्या बाजूने ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७ असा निर्णय दिला. ६० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मात्र सरिता देवीला एकतर्फी पराभव मान्य करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ऍन्या स्ड्रीड्‌समन हिने सरिताला ५-० असे हरविले. पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटात गौरव सोळंकीने पीएनजीच्या चार्ल्स किमा याला ५-० अशा फरकाने पराभूत करत आपले पदक निश्‍चित केले.

त्याने ३०-२४, ३०-२५, ३०-२५, ३०-२७, ३०-२५ असा विजय साकारला. अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी त्याला श्रीलंकेच्या ईशान बंदारा याला पराजित करावे लागणार आहे. ७५ किलो वजनी गटातही भारताने चांगली कामगिरी केली. अनुभवी विकास कृष्णन याने झांबियाच्या बेनी मुझियो याला ३०-२५, ३०-२६, ३०-२७, ३०-२६, ३०-२७ असे पराजित केले. उपांत्य फेरीत त्याच्यासमोर उत्तर आयर्लंडच्या स्टीवन डोनेले याचे आव्हान असेल. पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मनीष कौशिकने चुरशीच्या लढतीत इंग्लंडच्या कॅलम फ्रेंच याला २९-२८, २९-२८, २९-२८, ३०-२७, ३०-२७ असा धक्का देत पदकावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या ५१ किलो गटात मात्र पिंकी राणीला हार स्वीकारावी लागली. इंग्लंडच्या लिसा व्हाईटसाईडच्या बाजूने पंचांनी ३-२ असा निर्णय दिला.