मेरशीत मिनीबस कलंडून १५ जखमी

0
111

पणजी ते चिंबल मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी मिनीबस (जीए ०१ झेड ५६५५) मेरशी जंक्शनजवळ बस चालकाचा ताबा सुटल्याने कलंडून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. हा अपघात काल संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास झाला.

प्रवासी मिनीबस पणजी येथून रायबंदरमार्गे चिंबल येथे जात होती. मेरशी जंक्शनजवळ मुख्य रस्त्यावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानंतर माती तसेच कचर्‍याच्या ढिगार्‍याला धडक देऊन मिनीबस रस्त्यावरच कलंडली. या बसगाडीत महिला, शालेय मुलांचा भरणा अधिक होता.
जखमींना बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अपघातात कुणीही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही, बर्‍याच जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. रक्षदा कुंकळ्येकर, ऊर्मीला देवी, चंदा कुंकळ्येकर, दिव्या नाईक, शांती नाईक, दादापीर सोनूर अशी काही जखमींची नावे आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

अपघातानंतर बसचालक व कंडक्टर गायब झाले. बसगाडीवर एका दिवसासाठी नवीन चालकाची नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आशिष शिरोडकर व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अग्निशामक दलाच्या जवांनानी मदतकार्यात सहभाग घेतला. या प्रकरणी हवालदार दशरथ वायंगणकर तपास करीत आहेत.