मेरशीत टोळीयुध्द : चौघे जखमी

0
103

>> आठ जणांना अटक; चौघेजण गोमेकॉत दाखल

मेरशी मार्केट येथील गोवेकर बार ऍण्ड रेस्टॉरंटजवळ शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दोन गटांत पूर्ववैमनस्यातून झालेल्या टोळी युद्धात चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी ओल्ड गोवा पोलिसांनी आत्तापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. तसेच घटनास्थळांवरून २ मोटरसायकली, ५ स्कूटर, २ चाकू ताब्यात घेतले आहेत.

या टोळी युद्धासंबंधी समीर मुल्ला (इंदिरानगर चिंबल) आणि मार्सेलिनो डायस (कुडका) यांनी परस्पर विरोधी तक्रारी ओल्ड गोवा पोलीस स्टेशनवर दाखल केल्या आहेत. पोलिसांनी या टोळी युध्दाप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोन दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत.

मार्सेलिनो डायस याने जोशुआ तलवार, मुबारक मुल्ला, शहानबाज मुल्ला, नियाझ बेग, अख्तर मुल्ला, अब्दुल मालदार, समीर मुल्ला, अतिफ निर्गी, निसार ( सर्व – चिंबल आणि आल्तिनो) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. संशयितांनी बेकायदा जमाव जमवून सुरज शेट्ये याला बंदुकीचा धाक दाखविला. त्यानंतर तक्रारदार मार्सेलिनो, सूरज व अन्य एका मित्राला मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने वार करून जखमी केले, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक अजय धुरी तपास करीत आहेत.

इंदिरानगर चिंबल येथील समीर मुल्ला याने सुरज शेट्ये ऊर्फ बाबू, मार्सेलिनो डायस, विशाल गोलतेकर, गौरीश नाईक आणि इतर पाच जणांच्या विरोधात ( मेरशी – कुडका) तक्रार दाखल केली आहे. संशयितांनी पूर्व वैमनस्यातून बेकायदा जमाव करून आपणाला व मित्रांवर चाकू, चॉपर आणि बियर बॉटलच्या सहाय्याने हल्ला करून जबर मारहाण केली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक नितीन हर्ळणकर तपास करीत आहेत.
या टोळी युध्दात जखमी झालेल्या चार जणांवर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. ओल्ड गोवा पोलिस स्टेशनचा ताबा असलेले निरीक्षक सिध्दांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.