मूत्रसंस्थानची काळजी

0
1199

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

 

मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी पाण्याची फार आवश्यकता असते. जर तुम्ही पुरेसे पाणी नाही प्यायलात तर विषारी द्रव्य, जी वाहून जाऊ शकत नाही ती युटीआयचा त्रास निर्माण करतात. म्हणून पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. दररोज अडीच ते तीन लीटर पाणी प्यावे.

रोजच्या जीवनात सर्दी – खोकल्याइतकाच त्रास बर्‍याच जणांना ‘यु.टी.आय.’- (युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन)चा होत असतो. स्त्रियांना हा त्रास जास्त प्रमाणात सतावतो. आयुर्वेदामध्ये यालाच ‘मूत्रवह स्रोतस दुष्टी’ असे म्हणतात. वरचे वर हा त्रास होत असल्यास योग्य वेळी योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून चिकित्सा करून घ्यावी. कारण माणसाला जगण्यासाठी हृदय, मेंदू, यकृत, आतड्यांबरोबर मूत्रपिंडेही स्वस्थ, रोगरहित असणे खूप महत्त्वाचे आहे. दैनंदिन घडामोडींत शरीरात असे काही पदार्थ निर्माण होतात ज्याची शरीराला अजिबात गरज नसते. असे पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे कार्य मूत्रसंस्था करते. अशुद्ध झालेले रक्त शुद्ध करण्याचे काम फुफ्फुसाबरोबर मूत्रपिंड करत असतात. मूत्रपिंड म्हणजे आपल्या शरीरातील अतिशय परिणामकारक अशा चाळण्या आहेत. हे कार्य करण्यासाठी ईश्‍वराने माणसाला दोन मूत्रपिंडं दिली आहेत.
प्रत्येक मूत्रपिंडात दहा लाख छोट्या छोट्या चाळण्या असतात. या चाळण्यांना ग्लोमेरुलर ऍपरेटस असे म्हणतात. २४ तासांमध्ये या दोन्ही मूत्रपिंडातील वीस लाख ग्लोमेरुलरमध्ये १७ लीटर पाणी चाळले जाते. सर्वसाधारण १५०० सीसी. पाणी रोज लघवीवाटे बाहेर पडते. जेव्हा आपण म्हणतो मूत्रवह स्रोतस दुष्टी झाली म्हणजेच मूत्रपिंडं काम करत नाही, त्यांचे कार्य बिघडते. त्यावेळी या चाळण्याही काम करेनाशा होतात. सतत मूत्रवह स्रोतस दुष्टी होत राहिल्यास त्याचा थेट परिणाम मूत्रपिंडावर होतो व मूत्रपिंडं निकामी होऊ शकतात.
मूत्रवह स्रोतस दुष्टीची कारणे ः-
आधुनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे ‘ई-कोलाय बॅक्टेरिया’ हे युटीआयचे मुख्य कारण आहे. पण आयुर्वेदामध्ये जंतुसंसर्गाबरोबर इतरही कारणे सांगितलेली आहेत.
‘मूत्रितोदक भक्ष्यस्त्रीसेवनान्मूत्रनिग्रहात |
मूत्रवाहिनी दुष्यंति क्षीणस्याभिक्षतस्य च ॥
* मूत्रवेग विधारण करणे हे युटीआयचे प्रमुख कारण आहे. व्यवहारात अनेक वेळा वेळेच्या अभावी, कामात व्यस्त असता, लाजेमुळे, लघवीचा वेग अडवून धरला जातो. त्याचा दुष्परिणाम शरीरावर झाल्याशिवाय राहात नाही. मूत्र हे जरी मल असला व बाहेर काढून टाकला जात असला तरी त्याचे क्लेदवहन हे महत्त्वाचे कार्य आहे. संपूर्ण शरीरातील अनावश्यक ओलावा, द्रवभाग मूत्ररूपाने बस्तीत एकत्र घेऊन शरीराबाहेर टाकला जातो. पण मूत्रवेग अडवल्यास मूत्राचे प्राकृत कार्य बिघडते. वातदोष वाढतो. परिणामी अंग दुखणे, डोके दुखणे, मूतखडा होणे, मूत्राशयात वेदना होणे इ. त्रास होऊ शकतात.
* लघवीची संवेदना जाणवत असतानाही जेवल्यास, पाणी प्यायल्यास किंवा मैथुन केल्यास मूत्रवह स्रोतस बिघडते. लघवीचा वेग जबरदस्तीने अडवून धरणे ही गोष्ट आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. याने अनेक रोगांना आमंत्रण देण्यासारखेच आहे.
* त्याचप्रमाणे पाणी कमी पिणे हेही महत्त्वाचे कारण आहे. बर्‍याच वेळा शारीरिक कामाने शरीरातून स्वेदावाटे बरेच पाणी जात असते पण त्या मानाने पाणी अथवा द्रवपदार्थ पिण्याचे प्रमाण अगदीच कमी असते. आपल्या शरीरातील विषारी घटक मूत्राद्वारे फेकले जाण्यासाठी दोन ते तीन लीटर पाणी पिण्याची गरज असते.
* तीक्ष्ण औषधांचे सेवन – यामध्ये मुख्यत्वे वेदनाशामक औषधे व काही प्रतिजैविक औषधे मोडतात. काही लोकांना या औषधाची इतकी सवय लागते की व्यसनाप्रमाणे ते त्यांच्या आधीन होतात. सर्वच वैदनाशामक औषधे सतत घेणे मूत्रपिंडासाठी मारक ठरतात. या औषधांच्या सतत सेवनाने चाळण्यांचे आयुष्यच संपून जाते.
* अति व्यायाम
* मद्यपान
* वाहनातून विशेषतः दोन चाकी वाहनातून सतत प्रवास करणे
* अति प्रमाणात मासे खाणे
* दलदलीच्या प्रदेशात राहणे
* अंतर्वस्त्रे व्यवस्थित वाळलेली नसताना तसेच नायलॉनसारख्या कपड्याची वापरणे.
मूत्रवह स्रोतसात बिघाड झाला असता खालील लक्षणे दिसू लागतात…
* लघवीला वारंवार पण प्रत्येक वेळेस थोडी थोडी होणे.
* लघवीला खूप प्रमाणात होणे किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे.
* लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे.
* लघवी दाट होणे.
* लघवी करताना जोर करावा लागणे. लघवी झाली तरी समाधान न होणे, लघवीची धार बारीक असणे.
* लघवीची संवेदना झाली की फार वेळ अडवून धरता न येणे, हसले-खोकलले तरी थोडीशी मूत्रप्रवृत्ती होणे.
* कधी कधी थंडी वाजून ताप येतो. अंग दुखते. थकवा आल्यासारखे वाटते.
मूत्रसंस्थानची काळजी व उपचार ः-
– मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी पाण्याची फार आवश्यकता असते. जर तुम्ही पुरेसे पाणी नाही प्यायलात तर विषारी द्रव्य, जी वाहून जाऊ शकत नाही ती युटीआयचा त्रास निर्माण करतात. म्हणून पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. दररोज अडीच ते तीन लीटर पाणी प्यावे. पाणी शक्यतो बाटलीत घेऊन प्यावे म्हणजे आपल्याला आपण किती पाणी प्यायलो.. याचे प्रमाण समजते.
– लघवी कधीही धरवून, अडवून ठेवू नये. लघवीची संवेदना झाल्यावर लगेच लघवीला जावे.
– आहारात प्रथिने, नायट्रोजन, सोडीयम यांचे प्रमाण कमीत कमी असावे. मीठ शरीराची गरज आहे. मात्र त्याचे प्रमाण नियंत्रित असले पाहिजे. सर्वसाधारणपणे आपल्या भाज्यांमधून, आमटीमधून जाणेरे मीठ शरीरास पुरेसे आहे. मीठाचा अतिरेकी वापर रक्तदाब वाढवू शकतो व त्याचा अतिरिक्त दाब मूत्रपिंडावर पडतो.
– रात्री झोपल्यानंतर मूत्रपिंडाच्या पेशींचे नूतनीकरण होते. मात्र अशांत चाळवणारी झोप मूत्रपिंडांना त्रासदायक होऊ शकते.
– शीतपेयांचा मोह टाळावा.
– ‘क’ जीवनसत्वयुक्त पदार्थ जास्त खाऊ नयेत.
– पालक, टोमॅटो, वांगे, तांदूळ, उडीद, सुका मेवा, चॉकलेट, चहा, मद्यपान, मांसाहार असा पित्तकर आहार टाळावा.
– आयुर्वेदानुसार पित्तशामक असा आहार घ्यावा. पाण्याबरोबर द्रव पदार्थ अति मात्रेत घ्यावे. शहाळ्याचे पाणी तसेच डाळिंबाचा रस यु.टी.आय.मध्ये लाभदायक ठरतो.
– सैलसर कॉटनचे कपडे वापरावेत. घट्ट अंतर्वस्त्रं वापरू नयेत.
– आंघोळीनंतर, पोहून आल्यावर कमरेखालील भाग पूर्ण कोरडा करावा.
– मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅड्‌सचा वापर करावा व दर दोन तासांनी पॅड बदलावे.
– महिला वर्गात युरीन इन्फेक्शनचा त्रास जास्त असल्याने महिलांनी आपल्या जननेंद्रियांची स्वच्छता पुढून मागे अशी करावी.
– सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्राणायाम, ध्यानासारखे उपक्रम मनःशांती देतात व मानसिक तणावही कमी करतात.
युरीन इन्फेक्शनसाठी काही घरगुती उपाय ः-
* शहाळ्याचे पाणी, तांदळाची पेज, कुळथाचे सूप लघवी शुद्ध होण्यासाठी उत्तम आहेत.
* ऊसाचा रसही मूत्रप्रवृत्ती वाढवणारा आहे.
* धने-जिर्‍याचे पाणी लघवीतील जळजळ कमी करून मूत्रप्रवृत्तीही वाढवते.
* पळसाच्या फुलांचा काढा तसेच पुनर्नवाचा काढा मूत्रातील बॅक्टेरिया धुवून बाहेर काढतात.
* लघवी कमी प्रमाणात होत असल्यास ओटीपोटावर एरंडेल तेल लावून पळसाच्या फुलांचा शेक करावा.
* साळीच्या लाह्या चार-पाच तास पाण्यात भिजवून त्याचे पाणी प्यायल्यास लघवी स्वच्छ होते व जळजळ होत नाही.
* गरम पाण्याने कटीस्वेद घेण्यानेही ओटीपोटी दुखणे, कंबर दुखणे यांसारखे त्रास कमी होतात.
* मूत्रवह स्रोतस दुष्टीवर कार्य करणारी आयुर्वेदीय वनौषधी गोखरू, पुनर्नवा, पाषाणभेद, वरुण, यवक्षार, लसूण, दालचिनी त्याचप्रमाणे गोक्षुरादि वटी, चंद्रप्रभावटी, चंद्रकला रस, शतावरी घृत, वरुणादि काढा, पुनर्नवासव ही मूत्रवहसंस्थानावर कार्य करणारी प्रभावी औषधे आहेत.
पथ्यापथ्य ः-
जीर्ण तांदूळ, मुगाचे कढण, पडवळ, तांदुळजा, भुईकोहळा, खजूर, मनुका, नारळ, आवळा, गोड ताजे ताक, गाईचे दूध-तूप, विविध प्रकारचे फळरस व लिंबूपानक हे विशेष पथ्यकर.
विरुद्धाशन, विषमाशन, विदाही-अम्ल असे अन्न, तळलेले पदार्थ, मद्य, मत्स्य, खारट, तीक्ष्ण पदार्थ, भक्षिण्यादि पदार्थ अपथ्यकर
अतिश्रम, दोन तासांपेक्षा जास्त एकाच आसनावर बसून राहणे तसेच वेग अडवून धरणे अपथ्यकर आहे.