‘मूकनायक’ शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने…

0
167
  • शंभू भाऊ बांदेकर

बाबासाहेबांची नियतकालिकाची कल्पना शाहू महाराजांना आवडली. तात्काळ त्यांनी या कामासाठी अडीच हजारांचा धनादेश बाबासाहेबांच्या स्वाधीन केला. त्यानंतर काही दिवसांतच बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ या पक्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. ती तारीख होती ३१ जानेवारी १९२०. म्हणून बाबासाहेबांच्या वैचारिक जागरणाचे औचित्य साधून ‘मूकनायक’चा शताब्दीमहोत्सव अनेक ठिकाणी पार पडला.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दीन-दलित, शोषित-पीडित व वंचितांचे कैवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या समाजाची दुखणी, त्यांची होणारी छळणूक, पिळणूक वेशीवर टांगण्यासाठी, या समाजाला शिक्षणाभिमुख करण्यासाठी आपल्या प्रखर वाणीने सर्वदूर प्रचार व प्रसार केला. पण सर्व समाजापुढे, अपुर्‍या साधनसुविधांमुळे जाणे शक्य नाही, असे त्यांचे जेव्हा ठाम मत झाले, तेव्हा वाणी बरोबर लेखणीचाही उपयोग केला पाहिजे असे त्यांनी पूर्ण विचारांनी ठरविले व त्यादृष्टीने त्यांनी कामास सुरवात केली.

जनजागृतीसाठी आणि सर्वांच्या विचारमंथनासाठी त्यांनी जे पहिले पाऊल उचलले, ते ‘मूकनायक’ या पाक्षिकाचे. नुकताच या ‘मूकनायक’चा शताब्दी महोत्सव मोठ्या थाटात पुणे येथील ‘मूकनायक पत्रकार संघा’तर्फे बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पुणे येथे गेलो असता मलाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आले. या शानदार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘चित्रलेखा’चे संपादक ज्ञानेश महाराज यांनी भूषविले होते. प्रमुख वक्ते म्हणून आचार्य रतनलाल सोनाग्रा हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आंबेडकर चळवळीतील नेते व माजी निवृत्त सनदी अधिकारी आर. के. गायकवाड होते. तर खास निमंत्रित म्हणून प्रा. प्रतिमा परदेशी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाबासाहेबांचा एकूण पत्रकारितेबाबत आणि साहित्याबद्दल जे विचारप्रबोधन झाले, ते जिज्ञासूंपुढे यावे म्हणून या लेखाचा प्रपंच मी मांडला आहे.

गेली अनेक वर्षे ज्याप्रमाणे दलित-शोषित समाज हा सामाजिक विषमतेच्या वर्तुळात गुरफटला गेला होता, तसाच तो आर्थिक विषमतेसाठी सामना करीत होता. ही अडचण अर्थात बाबासाहेबांनाही आली. तसे बाबासाहेबांचे सर्व जातिधर्माचे लोक जवळचे मित्र होते. थोर समाजक्रांतिकारक महात्मा फुले यांच्याप्रमाणेच ते म्हणत की,‘माझा लढा हा ब्राह्मणांविरुद्ध नाही, तर ब्राह्मण्याविरुद्ध आहे.’ तरीही आपल्या मित्रांकडून वर्गणी गोळा करून मूकनायक प्रकाशित करणे, त्यांना प्रशस्त वाटत नव्हते. ही गोष्ट आहे १९१९ सालची. दरम्यान याच कालावधीत कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज मुंबईत आले असता डॉ. आंबेडकरांनी त्यांची भेट घेऊन केवळ दलितांच्या उद्धारासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी स्वतंत्र नियतकालिकाची कशी आवश्यकता आहे, हे शाहू महाराजांना विस्तृतपणे कथन केले. छत्रपती शाहू महराज हे दीन-दलित, शोषित-वंचितांचे आधारस्तंभ म्हणून ख्यातकिर्त पावले होते. या समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या होत्या व त्या योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होते आहे की नाही याकडेही त्यांचा कटाक्ष असयचा. बाबासाहेबांची नियतकालिकाची कल्पना शाहू महाराजांना आवडली. तात्काळ त्यांनी या कामासाठी अडीच हजारांचा धनादेश बाबासाहेबांच्या स्वाधीन केला. त्यानंतर काही दिवसांतच बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ या पक्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. ती तारीख होती ३१ जानेवारी १९२०. म्हणून बाबासाहेबांच्या वैचारिक जागरणाचे औचित्य साधून ‘मूकनायक’चा शताब्दीमहोत्सव अनेक ठिकाणी पार पडला.

‘मूकनायक’ हे नाव पक्षिकाला बाबासाहेबांनी ठेवले. त्यामागे त्यांचा मुख्य उद्देश होता, तो मुखदुर्बल बनलेला शोषित-पीडित समाज मुखसन्मुख व्हावा. आपण परंपरेने ‘मूक’ बनलो, तरी आता आपण शिक्षणाची कास धरून आपल्यावर होणारे जुलूम, जबरदस्ती, अत्याचार यांना वाणीप्रमाणेच लेखणीनेही वाचा फोडली पाहिजे. आपण जोपर्यंत ‘मूक’ आहोत, हे नाकारत नाही, तोपर्यंत आपली मुक्तता होणे कदापि शक्य नाही. ही मुक्तता मिळवण्यासाठी आपण आपल्या वाणी-लेखणीमध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रयींचा जोपर्यंत वापर करत नाही, जोपर्यंत यासाठी संघर्ष करत नाही व हितसंबंधितांसाठी संबंध प्रस्थापित करत नाहीत, तोपर्यंत खर्‍या अर्थाने आपण स्वातंत्र्याचे वारसदार ठरणार नाही, असे बाबासाहेबांनी ठणकावून सांगितले होते.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मोठ्या कष्टाने सुरू केलेल्या ‘मूकनायक’ पक्षिकाचा कालावधी अल्पायुषी ठरला. ३१ जानेवारी १९२० ते २३ ऑक्टोबर १९२० असे एकूण दहा महिने हे पक्षिक चालले. या काळात एकूण २९ अंक प्रकाशित झाले. ‘मूकनायक’ हे पक्षिक आठ पानांचे होते. यापैकी दहावा अंक हा दहा पानांचा होता. छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली ३० आणि ३१ मे व १ जून १९२० दरम्यान नागपूर येथे पार पडलेल्या ‘अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदे’चा संपूर्ण अहवाल या पक्षिकात प्रसिद्ध करण्यात आला होता. हे नियतकालिक फक्त दहाच महिने चालले हे खरे, पण ते दलितांचे एक स्वतंत्र, स्वायत्त, परखड विचारांचे नियतकालिक म्हणून गणले गेले.

फक्त वैचारिक लेखनालाच प्राधान्य देण्यात आलेल्या ‘मूकनायक’ मधून बारा अग्रलेख, सात वैचारिक लेख, विविध विचार आणि ‘क्षेमसमाचार’ या सदरात येणारे चोवीस स्फुटलेख याशिवाय ‘आमची हालचाल’, ‘कळावे की’, ‘कुशल प्रश्‍न’, ‘शेला पागोटे’ अशा सदरांतून अठरा प्रासंगिक विचार असे विपूल लेखन प्रसिद्ध झाले. त्याची उजळणी ‘मूकनायक’च्या शतकमहोत्सवात तर झालीच पण हे विचार इतके परखड, रोखठोक आणि ज्वलंत आहेत की आणखी शतकभर त्याचे पारायण केले तरी त्यातील अविटपणा व ज्वलंतपणा कमी होणार नाही.

‘मूकनायक’ बंद पडला तरी बाबासाहेबांची जनतेच्या उत्थापनाची चळवळ चालूच होती. ही चळवळ ‘मूकनायक’ पासून सुरू झाली, ती ‘प्रबुद्ध महानायक’ पर्यंत आली. ‘बहिष्कृत भारता’ कडून ते ‘प्रबुद्ध भारता’ पर्यंत वाटचाल करू लागले. या सार्‍या कार्यात, जनतेची साथ घेऊन समता प्रस्थापनेसाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत अथक प्रयत्न केले. भारतीय जनतेला ज्याप्रमाणे ‘संविधाना’चे महादान देऊन कृतकृत्य केले, त्याप्रमाणेच आपल्या सुजाण, सुबुद्ध, सुविचारांच्या लेखणीद्वारे ते केवळ भारतातच नव्हे तर जगात एक थोर पत्रकार, थोर ग्रंथकार म्हणून गणले गेले.