मुस्लीम उदारमतवादाचा सखोल परामर्ष

0
333

एडिटर्स चॉइस

  • परेश प्रभू

काही दिवसांपूर्वी याच स्तंभातून इस्लाम संदर्भातील दोन नव्या पुस्तकांची चर्चा केली होती. एक होते सलमान खुर्शीद यांचे ‘व्हिजिबल मुस्लीम, इनव्हिजिबल सिटिझन’, तर दुसरे होते रक्षंदा जलील यांचे ‘बट यू डोन्ट लूक लाइक अ मुस्लीम’. बर्‍याच वाचकांच्या त्यावर प्रतिक्रिया आल्या. विशेषतः रक्षंदा जलील यांच्या पुस्तकाबाबत अनेकांना कुतूहल दिसले. आज अशाच एका नव्या, परंतु संबंधित विषयावरील पुस्तकाची ओळख आपल्याला घडवणार आहे. हे पुस्तक आहे ‘रूपा’ प्रकाशित, हसन सुरूर यांचे ‘हू किल्ड लिबरल इस्लाम?’
आजच्या संदर्भातील एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घालण्याचा धाडसी प्रयत्न लेखकाने या पुस्तकामध्ये केला आहे. आपल्या धर्मासंबंधी कोणी बोलायचे नाही, खुलेपणाने काही चर्चा करायची नाही असा एक नकारात्मक पवित्रा अनेकदा कर्मठांकडून घेतला जातो. ‘आम्ही सांगू तो धर्म आणि आम्ही सांगू तेच त्याचे नीतीनियम’ असा त्यांचा एकंदर आव असतो. सगळ्याच धर्मांच्या बाबतीत हे घडताना दिसते. या पार्श्वभूमीवर धर्माची, त्याच्या तत्त्वज्ञानाची, त्यातून मानवाजातीला दिल्या गेलेल्या विचाराची खुलेपणाने, तटस्थपणाने चर्चा करायला सहसा कोणी धजावत नाही. अशा विषयावर न बोललेलेच बरे असा सावध पवित्रा लेखक मंडळीही घेत असतात. परंतु हसन सुरूर यांनी या पुस्तकामध्ये इस्लाममधील उदारमतवादी प्रवाहांचा कसा अस्त होत चालला आहे, त्याची गांभीर्याने चर्चा केली आहे. जागतिक पातळीवर अल कायदा, आयसिससारख्या दहशतवादी संघटना इस्लामच्या नावे रक्तपात घडवत असल्याने एकूणच मुसलमान समाजाबद्दल जगामध्ये जी नकारात्मक भावना वाढत चालली आहे, त्याची झळ एकीकडे आणि इस्लाममधील उदारमतवादी विचारप्रवाहाचा र्‍हास दुसरीकडे अशा दुहेरी गर्तेमध्ये भारतीय मुसलमान सापडल्याची खंत सुरूर यांनी यात व्यक्त केली आहे.

सातव्या शतकात प्रेषित महंमदांनी इस्लामची प्रस्थापना केली. मक्का आणि मदिनेतून हा धर्म आधी अरबस्तानात आणि नंतर जगभरात पसरला व जगातला अनुयायांच्या संख्येच्या दृष्टीने जगामध्ये दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला. कसे वागावे, कसा व्यवहार करावा त्याचे नीतीनियम त्याने घालून दिले, ते म्हणजे शरीया. शरीया याचा अर्थ ‘पाण्याकडे जाण्याचा मार्ग’. इस्लामचा जन्म अरबस्तानाच्या वाळवंटामध्ये झाला, त्यामुळे वाळवंटातून तहानलेल्याला पाण्याकडे जाण्याचा मार्ग दाखवणे म्हणजे शरीया असा त्याचा अर्थ असल्याचे लेखक सांगतो. बाह्य जगताच्या ‘सेक्युलर’ प्रभावाने शरीया त्या त्या देशांमध्ये मुस्लीम व्यक्तिगत कायद्यापुरता सीमित राहिला. त्याची पूर्णत्वाने कार्यवाही व्हावी ही आयसिस, अल कायदा वगैरेंची मागणी असते, परंतु इस्लाममध्ये केवळ मुल्ला मौलवी किंवा धर्मनिष्ठ, कर्मठ शक्तीच नाहीत. उदारमतवादाचा एक मोठा प्रवाहही या धर्मामध्ये निर्माण झालेला आहे याकडे लेखक या पुस्तकात लक्ष वेधतो.
उदारमतवाद म्हणजे नेमके काय? तर मानवी हक्कांप्रती आदर, मुक्त अभिव्यक्तीचा व व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार, विरोधी मतप्रकटन करण्याचे स्वातंत्र्य, सहिष्णुता, जीवनशैली निवडीचे स्वातंत्र्य, स्त्री पुरूष समानतेचा स्वीकार अशी त्याची काही वैशिष्ट्ये सांगता येतात. परंतु आजकाल मुसलमान समाज म्हटले की त्याचे कर्मठ, धर्मनिष्ठ चित्रच रंगवले जाते, परंतु या समाजामध्येही उदारमतवादी संत, विचारवंत होऊ गेले आहेत याकडे लेखकाने लक्ष वेधले आहे. मात्र, आजच्या युगामध्ये या उदारमतवादाचा र्‍हास होत चालला आहे ही लेखकाची खंत आहे आणि याच र्‍हासाची कारणे शोधणे हे या पुस्तकाचे प्रयोजन आहे.
आज एकूण भारतीय मुसलमान समुदायामध्ये उदारमतवाद्यांचे प्रमाण किती आहे, ते समुदायाचे कितपत प्रतिनिधित्व करीत आहेत, त्यांच्या मताला त्यांच्या समाजात काही किंमत उरली आहे का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा लेखकाने या पुस्तकामध्ये परखडपणे केलेली आहे.

एखादी मुसलमान व्यक्ती उदारमतवादी असणे म्हणजे ती धर्मनिष्ठ नाही किंवा सच्ची मुसलमान नाही असा अर्थ अनेकदा घेतला जातो, परंतु उदारमतवादी असायला आपण धर्माचे अनुसरण सोडायलाच हवे असे नाही. आपण धर्मनिष्ठ राहूनही उदारमतवादी दृष्टिकोन बाळगू शकतो असे लेखकाचे एकूण प्रतिपादन आहे. परंतु आजकाल उदारमतवादी म्हणजे शहरी, फाडफाड इंग्रजी बोलणारे, उच्च वर्गातले, इस्लामचे पालन न करणारे, बहुधा डाव्या विचारांचे लोक असतात व त्यांची इस्लामविषयीची समज कमी असते असे चित्र निर्माण झाल्याने एकूण मुसलमान समाज त्यांच्याकडे संशयाने पाहतो. त्याला त्यांच्याविषयी प्रेम वाटत नाही. टीव्हीवरील चर्चांमध्ये स्वतःला उदारमतवादी मुसलमान म्हणवत मिरवणार्‍या, परंतु इस्लामचे अल्प ज्ञान असलेल्या या उच्चभ्रू, डाव्या विचारांच्या विद्वानांनी मुसलमान समाजामध्ये उदारमतवाद रुजवण्याऐवजी त्याचे जास्त नुकसानच केले आहे, अशी फटकार लेखकाने लगावली आहे.

उदारमतवाद म्हणजे नेमके काय? मनाचा खुलेपणा, सहनशक्ती, विचारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार, बुद्धिप्रामाण्यवाद, समावेशकता, कायद्याचे पालन, स्त्रीपुरुष समानतेचा पुरस्कार, बहुविधता, लोकशाही तत्त्वांचा आदर, धर्मनिरपेक्षता या सार्‍या ज्या गोष्टी त्यामध्ये अभिप्रेत आहेत, त्या आपल्या वैयक्तिक धर्माचे पालन करूनही अनुसरल्या जाऊ शकतात. ऑक्सफर्ड शब्दकोशात अशा व्यक्तींना ‘थिऑलॉजिकल लिबरल’ असा शब्द आहे.

मुसलमान समुदायाकडे नकारात्मक नजरेतून पाहिले जाते, परंतु प्रत्यक्षामध्ये भारतीय मुसलमान समाज हा बहुतांशी ज्याला इंग्रजीत ‘मॉडरेट’ म्हटले जाते अशा स्वरूपाचा म्हणजे नेमस्त आहे, असा लेखकाचा दावा आहे. म्हणजे हा समाज सश्रद्ध आहे, परंतु आपला समाज आधुनिक बनावा असेही त्याला वाटते. म्हणजेच या धर्माचे खरे ‘लिबरल’ किंवा उदारमतवादी अनुयायी हे धर्माचे अनुसरण न करणारे नसून बाह्यांगाने दाढीधारी वा हिजाबयुक्त जरी असले, तरी अंतरंगाने आधुनिक विचारांचे, खुल्या मनाचे व सेक्युलर असू शकतात असे लेखकाचे प्रतिपादन आहे.

भारताला मुसलमान सुधारकांची मोठी परंपरा आहे. सर सय्यद अहमद, झाकीर हुसेन, अबुल कलाम आझाद हे विचारवंत सुधारकी विचारांचे होते. प्रगतीच्या आड धर्माला येऊ देता कामा नये अशी त्यांची भूमिका होती. हिंदू भक्ती चळवळीचा सुफी पंथावर पडलेला प्रभाव व परिणाम उदाहरणादाखल सांगत त्यातून ‘शुद्ध’ धर्मतत्त्वांकडे वळवणार्‍या (किंवा तसा दावा करणार्‍या) चळवळी देशात निर्माण झाल्या. त्यातून कर्मठपणाकडे कल वळला.

चाळीसच्या दशकामध्ये भारतात उदारमतवादी विचारप्रवाह होते. देशाची फाळणी झाली तेव्हा असंख्य मुसलमान कुटुंबांनी धर्माच्या आधारे बनलेल्या पाकिस्तानात न जाता भारतातच राहण्याची जाणीवपूर्वक निवड केली. त्यांनी मुस्लीम अस्मितेचे राजकारण धाडसाने नाकारले आणि सर्वसमावेशकता स्वीकारली. त्यासाठी आपल्या नात्यागोत्यांच्या माणसांचा दुरावाही पत्करला. चाळीसच्या त्या दशकामध्ये भारतीय मुसलमान समाजात अनेक उदारमतवादी लेखक, पत्रकार, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार, राजकीय कार्यकर्ते होते, परंतु काळ बदलत चालला तस तशी त्यांची संख्या घटत चालली आहे आणि त्याला कारण देशाच्या राजकारणामध्ये जात आणि धर्माला आलेले महत्त्व आणि अस्मितांनी वर काढलेला फणा हे आहे असे लेखकाला वाटते. प्रागतिक राजकीय शक्तींचा र्‍हास हे त्याचे कारण असल्याचे लेखकाचे म्हणणे आहे. येथे प्रागतिक म्हणत असताना त्याचा कल तत्कालीन कॉंग्रेस आणि डाव्यांकडे आहे. त्यांची पीछेहाट होत गेली आणि देशामध्ये हिंदू राष्ट्रवादाचा उदय झाला, त्यातून मुस्लीम उदारमतवादाची हानी होत गेली असे लेखकाला वाटते.

या पुस्तकातील एक वेधक प्रकरण आहे, ‘द आयडेंटिटी ट्रॅप’. स्वतःच्या अस्मितेच्या शोधात मुसलमान समाज अडकलेला आहे. सतत नमाज, हज, रमझानच्या निमित्ताने एकत्र येण्यातून जी एकत्वाची भावना निर्माण होते, त्यातून असे एकत्रित राहणे हीच आपली गरज व तीच आपली अस्मिता मानण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे एका विभागात राहणे, एका कोशात जगणे, यालाच अस्मिता समजले जाते. आपल्या अस्मितेवर घाला घातला जाईल या भीतीखाली वावरण्यामुळेच ‘उम्मा’ किंवा जमात एका सूत्रात बांधून राहतेे, परंतु या उम्माबाहेरील एखादी समस्या ही आपली समस्या नव्हे असेही त्यांना वाटू लागते, असे लेखकाचे मत आहे.

मुसलमान समाजातील साक्षरतेचे प्रमाण, वाचनाविषयीचा निरुत्साह आदींविषयी लेखकाने खंत व्यक्त केली आहे. हिरा पर्वतावर गॅब्रिएलने प्रेषितांना पहिला शब्द सांगितला तो ‘वाचन करा’ असा होता याचे स्मरण लेखक करून देतो. पुस्तकाच्या दुसर्‍या भागामध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मुस्लीम उदारमतवादावरील केलेले मतप्रकटन, उदारमतवादी मुस्लीम विचारवंतांचा परिचय आदी पूरक मजकूर आहे. पुस्तकाची परिशिष्टेही वाचनीय आहेत. ‘बियॉंड मुल्लाहज् अँड मार्क्सिस्टस्’ , ‘इस्लाम अँड इट्‌स इंटरप्रीटेशन्स’ हे लेखकाचे दोन चिंतनीय लेख त्यात आहेत. शेवटी पूरक वाचनासाठी ग्रंथांची यादीही आहे.

हसन सुरूर यांनी मुस्लीम उदारमतवादाची ज्योत तेवती राहावी यासाठी केलेला हा प्रयास निश्‍चितच महत्त्वाचा आहे आणि भारतातील विद्यमान परिस्थितीत तर त्यांनी हे एक राष्ट्रीय कर्तव्य बजावलेले आहे असेच म्हणावे लागेल!