मुसळधार पावसाचे केरळात २६ बळी

0
120
Idukki: People being taken to safer places following a landslide, triggered by heavy rains, in Idukki, Kerala on Thursday, Aug 9, 2018. (PTI Photo) (PTI8_9_2018_000144B)

केरळमध्ये काल पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत किमान २६ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून राज्यभरातील १० हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. दरम्यान, आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी केरळ सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.

आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आलेल्या माहितीनुसार इडुक्की व मलप्पुरम या दोन जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे भूसख्खलन होऊन १७ जणांचा मृत्यू झाला. वायनाडमध्ये ३, कन्नूरमध्ये २ तर कोझिकोडेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे आपत्कालीन कक्षाने म्हटले आहे. इडुक्की येथे दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवेळी पोलीस व स्थानिकांनी ढिगार्‍याखाली गाडलेल्या दोघा जणांना सुखरूप बाहेर काढले.

इडुक्की धरणातील पाणीसाठ्याने २६ वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली असून काल ६०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. यामुळे धरणक्षेत्रातील गावांना पुराचा धोका आहे. जोरदार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे रुळाखालील जमीन खचली असून काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे दळणवळणावर परिणाम झाला आहे.
राज्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन लष्कर, नौदल, तटरक्षक दल आणि एनडीआरएफकडून मदत मागण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिली. एनडीआरएफची तीन पथके तातडीने केरळमध्ये दाखल झाली असून आणखी ८ पथके दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.