मुळगावचे वेताळ मंदिर चोरट्यांनी फोडल

0
112

>> सुवर्णालंकारासह ३ लाखांचा ऐवज लंपास

शिरोडावाडी, मुळगाव येथील प्रसिद्ध वेताळ देवस्थानात काल रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून सुमारे २ लाख ८० हजार रुपयांचे सोने व चांदीच्या वस्तू लंपास केल्या. जवळच असलेल्या वनदेवी देवस्थानचे कार्यालय फोडून चोरट्यांनी कपाटातील रोख ३ हजार तसेच सोन्याची नाणी लंपास केली. दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे ३ लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे साखळीतील श्री दत्त मंदिरात चोरी झाली होती. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून रात्रीच्यावेळी गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.

सदर मंदिराच्या खिडकीला असलेल्या लोखंडी सळ्या तोडून खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश केला व चांदीची तलवार, बाजूच्या देवीची प्रभावळ, सोन्याचे डोळे व इतर किमती सामान लंपास केले. सकाळी साडेदहा वाजता पुजार्‍याने दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. डिचोली पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री हा चोरीचा प्रकार घडला असावा. देवस्थानच्या मागील खिडकीचा गज वाकवून व्हेंन्टीलेटरचे दार वाकवून ही चोरी केली. सीसीटीव्ही कॅमेरात पुसटशी अशी एक वयस्क व्यक्ती दिसत असून किमान चार ते पाच लोकांचे हे कृत्य असावे असे सांगण्यात आले.

या प्रकरणी देवस्थानचे अध्यक्ष कृष्णा मंत्री यांनी तक्रार नोंदविली असून तपास सुरू असल्याचे संजय दळवी यांनी सांगितले. चोरीची माहिती मिळताच पोलीस पथक श्‍वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ञांनाही यावेळी पाचारण करण्यात आले. उपनिरीक्षक हरिष गावस यांनी पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय दळवी व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास जारी आहे.