मुलांवर दगडफेक

0
160

काश्मीरच्या शोपियॉंमध्ये काल एका शाळेच्या बसवर झालेल्या दगडफेकीत दोन मुले गंभीर जखमी झाली. वर वर पाहता हिंसाचारग्रस्त काश्मीरमधील ही एक छोटीशीच घटना, परंतु अशा प्रकारची घटना खोर्‍यात प्रथमच घडली आहे आणि त्यामागील इरादे लक्षात घेता ती अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. काश्मीरमध्ये गेली अनेक वर्षे हिंसाचार आहे, परंतु दहशतवाद्यांकडून पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांना सहसा आजवर लक्ष केले जात नसे. त्यांच्या हिटलिस्टवर असत ते लष्कर, निमलष्करांचे जवान आणि पोलीस. त्यामुळे काश्मीर खोरे पेटलेले असतानाही पर्यटक आजवर मुक्तपणे खोर्‍यात फिरून पर्यटनाचा आनंद लुटू शकत असत. काही वर्षांपूर्वी एका सहल कंपनीच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता, परंतु पर्यटकांवर हल्ला म्हणजे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर हल्ला ठरतो आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिकांना ते रुचणारे नाही हे लक्षात आल्याने पुन्हा असा प्रकार कधी घडला नाही. मध्यंतरी अमरनाथ यात्रींच्या बसवर एक हल्ला झाला, परंतु त्या विरोधात काश्मीर खोर्‍यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे त्यानंतर पर्यटकांना दहशतवाद्यांकडून कुठलाही त्रास आजवर तरी झालेला नव्हता. स्थानिक नागरिक, त्यांची शाळकरी मुले यांनाही खोर्‍यातील हिंसाचाराचा प्रत्यक्ष त्रास नसे. बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोर्‍यात निदर्शनांची लाट उसळली आणि त्यात मात्र स्थानिक शाळाही होरपळून निघाल्या. खोर्‍यातील जवळजवळ दोन डझन शाळा त्या आंदोलनाचे निमित्त करून दहशतवादी शक्तींनी जाळून टाकल्या. पण आम काश्मिरी नागरिकांना हे मुळीच आवडले नाही. शाळा जाळणे म्हणजे काश्मिरी मुलांना शिक्षणापासून वंचित करणे ठरेल हे त्यांनी ओळखले आणि त्याविरुद्ध ते प्रतिक्रिया व्यक्त करू लागले. काश्मिरी मुलांच्या शाळा जाळणे म्हणजे त्यांना शिक्षणापासून वंचित करणे आणि या मुलांना शिक्षणापासून वंचित करणे म्हणजे अर्थातच त्यांना मुख्य प्रवाहापासून तोडून गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या वाममार्गावर खेचून नेणे हे न कळण्याइतकी काश्मिरी जनता दूधखुळी नाही. त्यामुळे शाळांच्या जाळपोळीच्या सत्रालाही जनसमर्थन लाभले नाही. शिवाय उच्च न्यायालयाने त्याची स्वेच्छा दखल घेत राज्य सरकारला शाळांच्या सुरक्षेचे निर्देश दिले आणि ते वादळ एकदाचे थांबले. मध्यंतरी शाळा आणि महाविद्यालयांच्या कँपसपर्यंत निदर्शनांचे लोण नेण्याचा पद्धतशीर प्रयत्न देशद्रोही शक्तींनी करून पाहिला. शाळांतील मुले – मुली त्यात सहभागी होतील हे पाहिले गेले. सैन्यदलांवर दगडफेक हा काश्मीर खोर्‍यात काहींचा व्यवसायच बनलेला आहे. पाकिस्तानमधून त्यासाठी पैसा येतो. शालेय मुलामुलींना त्यात ओढून घेऊन त्यांना त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भवितव्यापासून वंचित करण्याचा प्रयत्न म्हणूनच या देशद्रोही शक्तींनी करून पाहिला, परंतु तो तात्कालिक ठरला. आता शोपियॉंमध्ये शाळकरी मुलांना घेऊन जाणार्‍या बसवर झालेली दगडफेक म्हणजे काश्मिरी मुले चांगल्या शाळांत जात आहेत, शिक्षणाची आस बाळगत आहेत, या वैफल्यापोटी झालेला प्रकार आहे. काश्मिरी हे मुळातच अत्यंत बुद्धीमान असतात. त्यांना योग्य संधी मिळाली तर ते नाव कमावतात. काश्मिरी तरुणांनी हाती दगड घेण्याऐवजी संगणक घ्यावा असे आवाहन पंतप्रधानांनी मध्यंतरी केले होते. लष्कराने ‘सुपर ४०’ सारख्या काही योजना राबवल्या आहेत, ज्यात अशा हुशार मुलांच्या राहण्या – जेवण्याचा, शिक्षणाचा सर्व खर्च लष्करातर्फे केला जातो व त्यांना स्पर्धा परीक्षा देण्यास उद्युक्त केले जाते. अशा उपक्रमांना यशही येताना दिसते आहे. नुकत्याच झालेल्या जेईई परीक्षेत काश्मिरी मुलांनी यश संपादन केले आहे. यूपीएससीच्या परीक्षेत तर शाह फैसल हा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. अनेक काश्मिरी तरुण तरुणी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी ठरल्या आहेत, काहींनी क्रीडाकौशल्यात नैपुण्य दाखविले आहे. अशा चमक दाखवणार्‍या मुला मुलींना राष्ट्रीय प्रवाहामध्ये अलगद सामावून घेतले जाते हे खोर्‍यातील देशद्रोही शक्तींना डोळ्यांत खुपत असते. म्हणूनच त्यांच्या शिक्षणात अडथळे आणण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांना मुख्य प्रवाहापासून तोडायचे, त्यांच्या शिक्षणाच्या संधींपासून वंचित करायचे, रोजगाराच्या संधींपासून वंचित ठेवायचे म्हणजे ते दहशतवादाच्या मार्गाकडे निरुपाय होऊन वळतील अशा अपेक्षेने हे सगळे कारस्थान केले जाते. काश्मिरी तरुण तरुणींची हीच तर व्यथा आहे. योग्य सोयीसुविधांचा अभाव, संधींची अनुपलब्धता, मोकळ्या वातावरणाची वानवा आणि त्यात पाचवीलाच पुजलेला हिंसाचार या सगळ्या अत्यंत प्रतिकूल वातावरणातून पुढे येऊन आपले आयुष्य घडविण्याची आणि उराशी बाळगलेली स्वप्ने साकारायची धडपड ही मुले करीत असतात. शाळा जाळणे, शाळेच्या बसवर दगडफेक करणे असे प्रकार होतात ते त्यांना निरुत्साही करण्यासाठी. म्हणूनच शोपियॉंसारख्या घटनांना महत्त्व आहे. काट्याचा नायटा होण्याआधीच त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.