मुरगाव बंदरात खलाशांच्या तपासणीसाठी वैद्यकीय सुविधा उभारणे सुरू ः आरोग्यमंत्री

0
136

विदेशात असलेल्या गोमंतकीय खलाशांना मुरगाव बंदरातून राज्यात प्रवेश देण्यात येणार असल्याने मुरगाव बंदरात खलाशांच्या कोविड १९ तपासणीसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उभारण्याच्या कामाला  जोरात सुरुवात करण्यात आले आहे. मुरगाव बंदरात नमुन्यांची जलदगतीने तपासणीसाठी खास केंद्र सुरू केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

विदेशातून येणारे सहा ते सात हजार खलाशी हे राज्यासाठी मोठा आव्हानाचा विषय आहेत. खलाशांच्या वैद्यकीय तपासणीसाठी मुरगाव बंदरात अत्याधुनिक वैद्यकीय साधनसुविधा उपलब्ध करण्याचे काम आरोग्य सचिव नीला मोहनन यांच्या मार्गदर्शनालखाली सुरू झाले आहे. कोविड तपासणीसाठी अत्याधुनिक साधन सुविधांचा वापर केला जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

गोव्यात रॅपिड किटचा वापर बंद 

राज्य सरकारने कोविड-१९ तपासणीसाठी रॅपिड टेस्टिंग किटचा वापर करणे बंद केले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी काल दिली.

कोविड-१९ तपासणीसाठी वापरण्यात येणार्‍या रॅपिड टेस्टिंग किट सदोष असल्याने केंद्र सरकारने रॅपिड टेस्टिंग किटवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारकडून सुमारे ४ हजार रॅपिड टेस्टिंग किट उपलब्ध झाल्या आहेत. तथापि, केंद्राच्या निर्देशानुसार या किटचा वापर करणे बंद करण्यात आली आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

 

क्वारंटाईनसाठी हॉटेल्स ताब्यात

विदेशातून येणार्‍या खलाशांना क्वारंटाईऩ करून ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी हॉटेल्स ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. खलाशांना क्वारंटाईन करण्यासाठी सात ते आठ हजार खोल्यांची गरज आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल्स बंद आहेत. हॉटेलच्या व्यवस्थापनाने कामगारांना घरी पाठविले आहेत. हॉटेलमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी परराज्यातील असून ते मूळ गावी परतले आहे. त्यामुळे क्वारंटाईन करून ठेवण्यात येणार्‍या खलाशांना दैनदिन सेवा पुरवण्याची समस्या निर्माण होऊ शकते. या विषयावर प्रशासन गंभीरपणे चर्चा करीत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.