मुथ्थुट फायनान्सच्या कार्यालयात युवकाचा व्यवस्थापकावर हल्ला

0
265
कुंकळ्ळी येथे मुथ्युट फायनान्सच्या कार्यालयात मारहाण झाल्यानंतर हॉस्पिसियू इस्पितळात दाखल केलेल्या या संस्थेच्या व्यवस्थापक दिव्या नाईक यांच्याकडून जबाब नोंेदविताना पोलीस. (छाया : गणादीप शेल्डेकर)

कुंकळ्ळीतील आरोपीसह तिघे जखमी
कुंकळ्ळी येथील मुथ्थूट फायनान्स या वित्तीय संस्थेच्या शाखेत रेमंड बार्रेटो याने हातात दंडुके घेऊन बळजबरीने घुसून व्यवस्थापक व सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना काल दुपारी पावणेतीन वाजता घडली. या घटनेत व्यवस्थापक व सुरक्षा रक्षक तसेच आरोपी रेमंड बार्रेटो गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत वृत्त असे, काल दुपारी पावणेतीन वाजता रेमंड बार्रेटो हा मास्कोनी कुंकळ्ळी येथील तरुण हातात दंडुका घेऊन बळजबरीने शाखा कार्यालयात घुसला व वित्त व्यवस्थापक दिव्या नाईक यांच्याजवळ जावून डोक्यावर दंडुक्याचा प्रहार केला. घाबरलेल्या दिव्या यांनी बँकेतील संकटकालीन भोंगा वाजविला. त्याबरोबर सुरक्षा रक्षक दत्तराज शेट्टी याने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करताच रेमंडने दत्तराजवर दंडुक्याने हल्ला केला. त्यात दत्तराज गंभीर झाला. तरी त्याने रेमंडला पकडण्याचा प्रयत्न केला. नंतर इतर कर्मचारी व बाजारातील लोक धावत कार्यालयात गेले. त्यांना पाहून रेमंडने पहिल्या मजल्यावरून व्हेंटिलेटरमधून खाली उडी मारली व त्यात त्याचा पाय मोडल्याने तो तेथेच पडून राहिला. लोकांनी तात्काळ त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
कुंकळ्ळी पोलिसांनी दिव्या नाईक, दत्तराज शेट्टी व रेमंडला हॉस्पिसियु इस्पितळात दाखल केले. दिव्या यांच्या डोक्याला मार लागला आहे. पोलिसांनी चोरी, बळजबरीने आत घुसणे, प्राणघातक हल्ला करणे या आरोपांखाली गुन्हा नोंद केला आहे. उपअधीक्षक मोहन नाईक यांनी कुंकळ्ळी व इस्पितळात जावून पहाणी केली.