मुख्यमंत्र्यांनी घेतली मंत्र्यांबरोबर आढावा बैठक

0
161

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल आपल्या मंत्र्यांबरोबर एक आढावा बैठक घेतली. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने बैठकीत कोणत्याही विकास कामांवर चर्चा करता आली नाही, असे पत्रकारांशी बोलताना मंत्र्यांनी सांगितले.
निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठक घेता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व मंत्री यांची भेट होऊ शकली नव्हती. या पार्श्‍वभूमीवर काल ही अनौपचारिक अशी बैठक घेण्यात आल्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळ बैठक झालेली नाही. त्यामुळे काल मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी साधनबाधक अशी चर्चा केल्याचे खंवटे म्हणाले.
मंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले की बैठकीत भावी कामांविषयी चर्चा करण्यात आली. आम्हांला वेगवेगळी कामे हाती घ्यायची आहेत व ती घेताना कोणत्या अडचणी येऊ शकतात यावर चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

मंत्री पावस्कर म्हणाले, की रस्ते, पाणीपुरवठा व अन्य विषय आहेत. आचारसंहिता असल्याने कामे करता येत नाहीत. त्यामुळे आम्ही फक्त चर्चा केली. मंत्री काब्राल म्हणाले, की या बैठकीत विकासकामांविषयी कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही निवडणुकीविषयी चर्चा केल्याचे ते म्हणाले.