मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत प्रशासन ठप्प

0
107

>> कॉंग्रेसचा पत्रकार परिषदेत आरोप

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारासाठी विदेशात असल्याने व त्यांनी कुणाकडेही ताबा सोपवला नसल्याने राज्यातील प्रशासन पूर्णपणे ठप्प झालेले असून घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झालेला आहे असा दावा काल कॉंग्रेस प्रवक्ते ऍड. रमाकांत खलप व यतीश नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. या पार्श्‍वभूमीवर गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी हस्तक्षेप करण्याची गरज असून त्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने त्यांना पत्र पाठवले असून चर्चेसाठी वेळ देण्याची विनंती केली आहे, असे पुढे बोलताना त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याबरोबरच नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही आजारी असून दोघांवरही अमेरिकेतील इस्पितळात उपचार चालू आहेत. तर वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्यावर मुंबईतील इस्पितळात उपचार चालू आहेत. या तिन्ही जणांकडे मिळून महत्त्वाची खाती असून त्यांच्या गैरहजेरीत प्रशासन ठप्प आहे. त्यांच्या खात्यांचा ताबा कुणाकडेही देण्यात आलेला नसल्याने त्यांच्या खात्यांचा कारभार कसा काय चालेल हे एक प्रश्‍नचिन्ह असल्याचे खलप म्हणाले.
राजघटनेनुसार एखाद्या राज्यात प्रशासन चालवण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ सत्तेवर असायला हवे. पण सध्या ते नसल्याचे खलप म्हणाले.

राष्ट्रपती राजवट लागू करा : खलप
सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवट लागू करणे, सध्याचे सरकार बडतर्फ करणे अथवा विरोधी पक्षाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देणे असे तीनच पर्याय आहेत. अशा स्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करणे उचित ठरेल असे रमाकांत खलप यांनी सांगितले.