मुख्यमंत्री पर्रीकर लवकरच भेटणार पंतप्रधान मोदींना

0
217

>> खाण बंदीप्रश्‍नी मोदींशी चर्चा करणार

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढील आठवड्यात नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

पर्वरी येथील मंत्रालयात पर्रीकर यांनी खाण बंदीच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी काल आयोजित केलेली खाण पट्‌ट्यातील आमदार व अधिकार्‍याची संयुक्त बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. या बैठकीनंतर बोलताना आमदार पाऊसकर यांनी वरील माहिती दिली.

खाण पट्‌ट्यातील बहुतांश आमदार अनुपलब्ध असल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊसकर यांनी पर्रीकर यांना सावर्डे मतदारसंघात खाण बंदीनंतर निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. खाण बंदी प्रश्‍नी लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे, असे पाऊसकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आमदारांना समस्या, तक्रारी मांडण्यासाठी वेळ दिला आहे. आमदारांशी खाण बंदीच्या प्रश्‍नावर ते वैयक्तिक चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री पुढील आठवड्यात नवी दिल्लीला जाणार असून पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन खाण बंदीच्या प्रश्‍नी तोडगा काढण्यावर चर्चा करणार आहेत, असेही पाऊसकर यांनी सांगितले.

खाण बंदीमुळे खनिज ट्रक मालक, कामगार वर्ग, व्यावसायिक यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. खाण बंदीमुळे ट्रक मालकांना दिलासा देण्यासाठी आर्थिक साहाय्य योजना राबविण्याची विनंती केली आहे. खाण बंदीच्या काळातील रस्ता कर माफ करण्याची विनंती केली आहे. खाण कंपन्यांकडून कामगार कपात केली जात आहे. कामगार कपातीच्या प्रश्‍नावर खाण मालकांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन पर्रीकर यांनी दिले आहे, असेही पाऊसकर यांनी सांगितले.
खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी महामंडळ स्थापन करणे, खाण लिजांचा लिलाव करणे किंवा राज्यातील खाणी २०३७ पर्यंत सुरू ठेवण्यात याव्यात, असे तीन प्रस्ताव आहेत. राज्यातील खाण मालक मुख्यमंत्री पर्रीकर यांची वैयक्तिक भेट घेऊन खाण बंदीच्या प्रश्‍नावर चर्चा करीत आहेत, असेही पाऊसकर यांनी सांगितले.

खाण अवलंबितांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली भेटीसाठी वेळ

गोवा मायनिंग पीपल फ्रंटच्या झेंड्याखाली खाण अवलंबितांनी राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी गेले अकरा दिवस येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार्‍यांची सरकारी यंत्रणेने अद्याप दखल घेतलेली नाही. दरम्यान, बुधवारी खाण अवलंबितानी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना एक निवेदन सादर करून खाण बंदीप्रश्‍नी चर्चेसाठी वेळ देण्याची विनंती केली आहे. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनाही एक निवेदन पाठविण्यात आले आहे.
सरकारने धरणे आंदोलन मागे घेण्यासाठी फ्रंटच्या समितीशी चर्चा करावी. खाण बंदी उठविण्याबाबत ठोस आश्‍वासन दिल्यास आंदोलन मागे घेण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे निमंत्रिक पुती गावकर यांनी सांगितले.

पणजीतील आझाद मैदानावर गेल्या ११ जूनपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ यावेळेत धरणे धरण्यात येत आहे. तसेच खाण अवलंबितानी साखळी, सावर्डे आणि धारबांदोडा या तीन ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा निघेपर्यंत धरणे धरण्यात येणार आहे, अशी माहिती धरणे आंदोलनात सहभागी खाण अवलंबितानी दिली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे खाण बंदीचा प्रश्‍न मांडण्यात आला आहे. शहा यांनी न्यायालयाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. परंतु, न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळालेली नाही.