मुक्त स्वराच्या गळचेपीविरुद्ध एल्गार

0
152

एडिटर्स चॉइस

  • परेश प्रभू

ग्रेग ब्रुनो यांचे ‘ब्लेसिंग्ज फ्रॉम बीजिंग’ आणि नुकताच मॅगसेसे पुरस्कार मिळालेले टीव्ही पत्रकार रवीशकुमार यांचे ‘द फ्री व्हॉईस’ ही दोन्ही पुस्तके दोन वेगळ्या विषयांवरची जरूर आहेत, परंतु त्यांच्यात समान सूत्र शोधायचे तर ते आहे मुक्त स्वराची गळचेपी आणि त्याविरुद्ध लढण्याचा निर्धार. ‘स्पीकिंग टायगर’ च्या दोन नव्याने पुनःप्रकाशित पुस्तकांची ही ओळख –

पाच वर्षांपूर्वीच स्थापन झाली असली तरीही देशातील एक अग्रगण्य प्रकाशनसंस्था म्हणून नाव कमावलेली इंग्रजी पुस्तक प्रकाशन संस्था म्हणजे ‘स्पीकिंग टायगर.’ वेगळ्या विषयांवरील पुस्तकांसाठी तिचा लौकीक आहे. यावेळी या प्रकाशनसंस्थेच्या दोन पुस्तकांचा परिचय येथे घडवू इच्छितो. ही दोन्ही पुस्तके पुनःप्रकाशित आहेत, परंतु त्यांमधून हाताळले गेलेले विषय वर्तमानाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. दोन्हींचे विषय जरी वेगळे असले, तरी त्यामध्ये एक समान सूत्र काढायचे झाले तर ते आहे, मुक्त स्वराची चाललेली गळचेपी.

यातले एक वेगळे पुस्तक आहे, ग्रेग ब्रुनो यांचे ‘ब्लेसिंग्ज फ्रॉम बीजिंग ः इनसाइड चायनाज् सॉफ्ट पॉवर वॉर ऑन तिबेट’. म्हटले तर हे प्रवासवर्णन आहे, म्हटले तर वार्तांकन, परंतु त्यामधून एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचा मूलगामी वेध लेखकाने घेतला आहे. चीनची दिसामासांनी वाढत चाललेली प्रचंड आर्थिक ताकद आणि त्याचा उपखंडातील वाढता प्रभाव, जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये त्याने कमावलेले प्रमुख स्थान यामुळे तिबेटी निर्वासितांवर कसकशी राजकीय, सामाजिक, आर्थिक दडपणे वाढत आहेत आणि त्याची परिणती म्हणून तिबेटी निर्वासितांच्या स्वातंत्र्याकांक्षा कशा क्षीण होत चालल्या आहेत, चीन त्यासाठी कशा प्रकारे छुपे युद्ध खेळत आहे, त्याची ही सारी कहाणी आहे.

पन्नासच्या दशकामध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले. चौदाव्या दलाई लामांना व त्यांच्या अनुयायांना देश सोडून परागंदा व्हावे लागले. त्यांनी भारतात आश्रय घेतला. आजही तिबेटी निर्वासितांच्या मोठ्या वसाहती भारतभर विखुरलेल्या आहेत. खुद्द दलाई लामांचे वास्तव्य हिमाचल प्रदेशात धरमशालेमध्ये आहे, तर तिबेटी निर्वासितांच्या आपल्या जवळच्या वसाहती कर्नाटकात यल्लापूरजवळचे मुंडगोड किंवा गुरुपुरा, बयलाकुप्पे आदी भागांत आहेत. गेली कित्येक वर्षे तिबेटी निर्वासित तेथे राहात आले आहेत. एक वेगळेच जग तेथे पाहायला मिळते. मात्र, कधीतरी आपण आपल्या मायदेशी परत जाऊ शकू ही आशा त्यांनी मनामध्ये बाळगलेली आहे. मात्र, जसजसा काळ लोटतो आहे आणि चीन अधिकाधिक प्रभावशाली बनत चालला आहे, तसतशी ही आशाही क्षीण होत चाललेली आहे. त्याची कारणमीमांसा लेखकाने या पुस्तकामध्ये केलेली आहे.

स्वतः ग्रेग ब्रुनो अमेरिका, युरोप, नेपाळ व भारतातील तिबेटी निर्वासितांच्या वसाहतींमध्ये फिरला, त्यांचे प्रश्न समजून घेतले, चीनच्या दडपशाहीच्या कहाण्या ऐकल्या. या प्रश्नाचा सर्वांगीण वेध घेण्याचा या पुस्तकातून त्याने प्रयत्न केला आहे.
दलाई लामा आता वृद्धत्वाकडे चालले आहेत. ते सोबत नसतील तेव्हा आपले काय होईल या प्रश्नाने तिबेटी निर्वासितांना सध्या घेरलेेले आहे. दुसरीकडे, चीन तिबेटींमध्ये दलाई लामांविरोधी दुहीचे राजकारण पेरत चालला आहे. त्यासाठी काही तिबेटी विद्वानांना त्याने हाताशी धरले आहे, दलाई लामांविरोधी भूमिका घेणार्‍या लामांवर आर्थिक आमिषांची खैरात चालवली आहे, तिबेटमधून नेपाळमधील पारंपरिक मार्गांनी होणारी निर्वासितांची स्थलांतरे रोखण्यासाठी नेपाळवरील राजकीय प्रभावाचा वापर त्याने चालवला आहे, इतकेच कशाला तिबेटी निर्वासितांना नेपाळमध्ये आश्रय मिळू नये यासाठी चीनचे हस्तक नेपाळी नागरिकांना पैसे वाटत आहेत. तिबेटी निर्वासितांमधील घसरलेला जन्मदर, रिकाम्या होत चाललेल्या मॉनेस्ट्री या सार्‍या प्रतिकूल परिस्थितीतही तिबेटींच्या स्वातंत्र्याकांक्षेची धुनी धगधगती ठेवण्यासाठी चाललेली धडपणही लेखकाने अधोरेखित केलेली आहे.

तिबेटींमध्ये दुहीचे चीनने चालवलेले प्रयत्न, खोट्या माहितीचा चालवलेला प्रसार, दलाई लामांच्या व तिबेटच्या स्वायत्ततेच्या समर्थकांना आर्थिक आमिषे दाखवण्याचा, नव्या पिढीच्या मतपरिवर्तनाचा चालवलेला आटोकाट प्रयत्न, तिबेटी वसाहतींमध्ये चालणारी हेरगिरी या सार्‍याचा तिबेटच्या लढ्यावर होत असलेला विदारक परिणाम लेखकाने या पुस्तकामध्ये फार चांगल्या रीतीने चित्रांकित केलेला आहे. चीन दलाई लामांचे नेतृत्व मान्य करायला तयार नाही. तो त्यांच्याविरुद्धच्या राजकारणाला खतपाणी घालत आहे. दलाई लामांचे ‘शांततापूर्ण मध्यममार्गी’ नेतृत्व अमान्य असलेल्या तिबेटींना आर्थिक पाठबळ पुरवतो आहे. त्यातून तिबेटी लढा कमकुवत होत जावा असा चीनचा प्रयत्न आहे. त्याविषयी भीती व्यक्त करतानाच चीनचे हे ‘युद्धाविना विजय’ मिळवण्याचे तंत्र यशस्वी होऊ न देण्यासाठी धडपडणार्‍या तिबेटी तरुणांबाबतचा आशावादही लेखक व्यक्त करतो. तिबेटी निर्वासितांवरील हे सारे राजकीय, सामाजिक, आर्थिक दबाव व दडपणे आणि त्याचा एकूणच तिबेटी स्वातंत्र्याकांक्षेवर होत चाललेला परिणाम अशा एका दुर्लक्षित परंतु तितक्याच महत्त्वाच्या विषयावरील एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणून हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

स्पीकिंग टायगरचे मी निवडलेले दुसरे पुस्तक आहे रवीश कुमार यांचे ‘द फ्री व्हॉइस.’ हे पुस्तक खरे तर गतवर्षी प्रकाशित झाले होेते, परंतु ते यंदा सुधारित स्वरूपात पुनःप्रकाशित करण्यात आले आहे. रवीश कुमार यांची ओळख करून देण्याची गरज नाही. ते भारतातील एक आघाडीचे टीव्ही पत्रकार आहेत. एनडीटीव्ही हिंदीचे ते व्यवस्थापकीय संपादक आहेत व त्यांचे ‘हम लोग’, ‘रवीश की रिपोर्ट’ हे कार्यक्रम अत्यंत वेगळ्या धाटणीचे आणि प्रचंड लोकप्रियही आहेत. नुकतेच त्यांना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपला देश आपल्या डोळ्यांदेखत कसा बदलत चाललेला आहे, मुक्त स्वराचा गळा कसा घोटला जात आहे, सोशल मीडियावरील निनावी टोळकी कशी झुंडीने शिकार करण्यास टपलेली आहेत, त्याचे अत्यंत विदारक व भयप्रद दर्शन रवीशकुमार आपल्या या पुस्तकात घडवतात. जातीयवादाचे राष्ट्रवादाच्या रूपात उदात्तीकरण चालले असल्याचा त्यांचा आरोप आहे. सोशल मीडियावरील फसव्या माहितीला ‘व्हॉटस्‌ऍप विद्यापीठ’ असे ते संबोधतात.
सत्याची ठाम पाठराखण करणे हा पत्रकाराचा धर्म, परंतु त्यामध्येही कसे अडथळे आणले जात आहेत, आम नागरिकांना खोट्या माहितीद्वारे कसे पदोपदी भ्रमित केले जाते आहे, परिणामी, जनतेचा खुला आवाज कसा दिवसेंदिवस दबला जात आहे, याविषयी अत्यंत भेदक भाष्य रवीशकुमार या पुस्तकामध्ये करतात. आजकालचे टीव्ही अँकर सरकारला एकही प्रश्न विचारत नाहीत ही त्यांची रास्त तक्रार आहे. आजकाल न्यूजरूमवर सरकारची सावळी पडते आहे असे वर्णन ते करतात. लोकही आज नेत्यांवर अति विश्वास टाकत आहेत याची खंत त्यांना वाटते.

रवीशकुमार हे एक उत्तम पत्रकार आहेत. राजकारणाची, समाजकारणाची त्यांची जाण निर्विवाद आहे. वर्तमानावर त्यांची सतत चौकस नजर राहिलेली आहे. त्यामुळे या पुस्तकातील प्रतिपादनाला वर्तमानकाळाचा संदर्भ आहे, ज्यामुळे त्यांच्या निष्कर्षांना अधिकच महत्त्व प्राप्त होते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दडपशाही, संस्थात्मक, व्यक्तिगत व मानसशास्त्रीय हिंसाचार, मुक्त स्वराचा गळा घोटण्याचा प्रयत्न या सार्‍या आजूबाजूच्या बदलत चाललेल्या परिस्थितीचे विदारक दर्शन रवीशकुमार सडेतोड, परखड भाषेमध्ये या पुस्तकामध्ये घडवतात. नाना घटनांचा परस्परसंबंध जोडून त्या सार्‍यामध्ये एक सूत्र असल्याचे ते दाखवतात. त्यांच्या सगळ्याच प्रतिपादनाशी आपली सहमती व्हायला हवी असे नाही; अनेकदा त्याला अवास्तव व अतिरंजित प्रतिपादनाचा व विशिष्ट विचारधाराप्रेरित असल्याचा वासही येतो, परंतु तरीही आपल्या भोवतीच्या बदलत्या सामाजिक जीवनाचा आरसा ते जरूर दाखवतात. नागरिक म्हणून या परिस्थितीमध्ये आपली कर्तव्ये काय आहेत, मुक्त स्वराची पाठराखण आपण करणे कसे जरूरी आहे त्याचे स्मरणही ते या पुस्तकामध्ये करून देतात. देशातील ६८ टक्के विद्यापीठांमधील आणि ९१ टक्के महाविद्यालयांतील शिक्षणाची पातळी सामान्य किंवा त्याहून खालची आहे. अशा सामान्य दर्जाचे शिक्षण घेतलेल्या नव्या पिढीकडून लोकशाही रक्षणाची अपेक्षा करता येईल का, हा रवीशकुमार यांचा सवाल मात्र नक्कीच अस्वस्थ करणारा आहे.
————–