मुक्तीचा आनंद आजही अवीट

0
95

– कीर्तनकार उदयबुवा फडके
पहाटे साडे चार – पाचचा सुमार असेल. मोठ्ठा धडाम असाआवाज झाला. आम्ही सगळी मुले घाबरूनच उठलो. काय झालं कळेचना. चतुर्थीत आम्ही मुले फटाके फोडत असू. भुईनळ्या, चंद्रज्योती लावत असू. फटाके लावताना थोडी भीती वाटे, पण मजा येई. ऍटमबॉम्ब लावताना मात्र आम्ही हात कानावर धरायचो, कारण त्याचा आवाज खूप मोठ्ठा होत असे. पण आजचा हा आवाज मात्र त्याहून वेगळा होता. आम्ही सगळी भावंडे दचकून उठलो. मी तर अप्पांना (वडिलांना) बिलगलो, कारण आपले वडील हे जगातले सर्वांत मोठे शूर, वीर, ज्ञानी, हुषार, ताकदवान आहेत अशी प्रत्येक लहान मुलाची जी भावना असते, तीच माझीही भावना होती. मी अप्पांना विचारलं, ‘अप्पा, हा आवाज कसला हो? काय झालं?’ अप्पा म्हणाले, ‘काही नाही रे. कोणीतरी ऍटमबॉम्ब फोडला!’ ‘पण चतुर्थी तर मागेच झाली ना?’ ‘अरे, हा गणपती आणल्याच्या आनंदासाठी नव्हे, तर राक्षस बुडवल्याचा आनंद साजरा करण्यासाठी!’ वडिलांच्या शब्दांचा अर्थ तेव्हा समजला नाही. खरं कारण वेगळंच होतं. पोर्तुगीज लष्कराने भारतीय सैन्याला अटकाव व्हावा म्हणून अस्नोड्याचा पूल स्फोटाद्वारे उडवून दिला होता. तो आवाज एवढा प्रचंड होता की, त्या स्फोटाच्या तीव्रतेने मुळगावच्या आमच्या घराच्या एक मीटर रुंदीच्या मातीच्या भिंतीला भेगा पडल्या होत्या. अस्नोड्याच्या पुलाजवळची अनेक घरे कोसळली होती. अनेक घरांची कौले उडाली होती. काही लोकांच्या घरांच्या दारातले झावळ्यांचे मंडप पार जमीनदोस्त झाले होते.त्याच्या आधल्या दिवशी म्हणजे १८ डिसेंबर १९६१ रोजी संध्याकाळी विमानांची घरघर ऐकू येत होती. आम्ही अंगणात उभे राहून येणारी विमाने पाहात होतो. आज अशी खूप विमाने कशी आली? आम्हाला माहिती असलेली विमाने म्हणजे लोकांना घेऊन जाणारी मोठी विमाने. पण वर फिरणारा पंखा लावून फिरणारी छोटी छोटी विमाने पाहणे म्हणजे एखादा पतंग (आपल्या भाषेत भिरमुट्या) फिरताहेत असे वाटे. मी अप्पांना विचारलं, ‘हे कसलं हो विमान?’ ते म्हणाले ‘अरे ही मोठ्या विमानाची पोरे. ती मोठी झाली की वरचा तुरा गळून पडतो!’ ह्या अगाध ज्ञानाने आम्ही मात्र तेव्हा सुखावलो. खरंच वाटलं तेव्हा. पण खरा प्रकार असा होता, हेलिकॉप्टर फिरून पत्रके फेकत होते. त्यावर मराठी, इंग्रजी मजकूर छापलेला असे, तो चार पाच वाक्यांचा. ‘‘घाबरू नका. भारतीय सैन्य येत आहे. गोवा मुक्त करण्यासाठी. शांतता पाळा. आम्ही आपल्याला मदत करण्यासाठी येत आहोत. जय हिंद, जय गोमंतक’ आमच्या अंगणातसुद्धा पत्रकांचा एक गठ्ठा पडला होता, पण आम्ही मात्र घाबरलो व भीतीने घरात पळालो होतो. आमच्या मातोश्रींनी तर आम्हा मुलांना घरातच बसवले. त्या भीतीने मनात घर केलेले, त्यामुळे शरीरात ताप भरला.
लोकांची बाहेर धावपळ चालली होती. लोक इतक्या पहाटे का बरे उठले आहेत हा प्रश्न तेव्हा बालमनाला पडला होता.
साडेपाच – सहाचा सुमार झाला आणि रस्त्यावरून एकामागोमाग एक जीपगाड्या येऊ लागल्या. काही गाड्या मोठ्या होत्या. रंग मात्र तसाच. हिरवागार. दोन तीन गाड्या आमच्याजवळ थांबल्या. त्यातून भराभर लोक उतरू लागले. उंच, सुदृढ, धडधाकट व एकसारखेच. प्रत्येकाच्या हातात बंदुका. आम्हाला सुरवातीला भीती वाटली, पण गाड्या, लोक येतच होते. ते आम्हाला काही करीत नाहीत, उलट हात दाखवतात, हसतात, अभिवादन करतात हे पाहून भीतीची जागा औत्सुक्याने घेतली. ओळखदेख नसतानासुद्धा आलेल्या त्या पाहुण्यांना साखर दे, पाणी दे असे अप्पांचे चालू होते. आमच्या अंगणात पडलेल्या कागदावरचे वाचून आमची बहीण ‘जय हिंद’ म्हणाली आणि काय सांगू! आलेल्या सगळ्या पाहुण्यांनी ‘जय हिंद’ म्हटले! त्या सैनिकांत एक – दोन मराठी जाणणारे होते. त्यांनी आमच्या आईवडिलांना बरीच माहिती दिली. अप्पांना कोण आनंद! अप्पा म्हणाले, चला रे मुलांनो, या, सैन्य दाखवतो! आम्हाला घेऊन ते रस्त्यावर आले. गावचे लोक दुतर्फा गर्दी करून उभे होते. आम्ही मुले मारुतीच्या पारावर उंचावर उभे राहून ही सगळी मजा पाहात होतो. कोणीतरी मध्येच ‘जय हिंद’ म्हणे आणि मग येणार्‍या जीपगाड्यांतले सैनिक पुन्हा ‘जयहिंद’ म्हणून प्रतिसाद देत. काही उत्साही सैनिकांनी आमच्या बाजूने बिस्किटांचे पुडे फेकले. या सार्‍या आनंदात अंगातला ताप केव्हा गेला कळलंच नाही. आमच्या घरात अप्पांनी देवीला अभिषेक केला. गोड खिरीचा नैवेद्य दाखवला. आम्ही आईला विचारलं, ‘‘आज काय ग? कसलाही सण नसताना गोडधोड का?’’ ती हसली. म्हणाली, ‘‘आपण हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून पाळायचा आहे बरं!’’ आणि खरंच, त्या वर्षापासून आमच्या घरात तो दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा होऊ लागला. आमचं मातोश्री, पिताश्रींचं छत्र गेलं, पण त्यांच्या सुना म्हणजे माझी व बंधूराजांची बायको आजही सासूबाईंनी घालून दिलेली ती रीत पुढे चालवताहेत. आजही या १९ डिसेंबरला आमच्या घरी गोडधोड करून देवाला नैवेद्य होतो. गोवा मुक्तीचा आनंद आजही तेवढाच अवीट आहे.