मुंबई सिटीला गारद करीत एफसी गोवा आघाडीवर

0
133

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमातील महत्त्वाच्या सामन्यात संभाव्य विजेत्या एफसी गोवा संघाने मुंबई सिटी एफसीचा ५-२ असा धुव्वा उडवित गुणतक्त्यात आघाडीच्या स्थानावर मुसंडी मारली. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर स्पेनचा शैलीदार स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने दोन, तर ह्युगो बौमौस व जॅकीचंद सिंग यांनी प्रत्येकी एका गोलचे योगदान दिले. याशिवाय गोव्याला स्वयंगोलचाही लाभ झाला. दरम्यान, या निकालामुळे गतविजेत्या बेंगळुरू एफसीचा बाद फेरीतील प्रवेश नक्की झाला आहे.
बाद फेरीतील स्थान यापूर्वीच नक्की झालेल्या गोव्याने १७ सामन्यांत ११वा विजय मिळविला असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे ३६ गुण झाले. एटीके एफसीला त्यांनी मागे टाकले, पण एटीकेचा एक सामना कमी असूनही गोलफरकही सरस आहे. एटीकेने १६ सामन्यांत दहा विजय, तीन पराभव व तीन बरोबरी अशा कामगिरीसह ३३ गुण मिळविले आहेत. गोव्याचा गोलफरक १८ (४१-२३), तर एटीकेचा १९ (३०-११) असा आहे.
आजच्या निकालामुळे गतविजेत्या बेंगळुरू एफसीचे बाद फेरीतील स्थान नक्की झाले. बेंगळुरू १६ सामन्यांतून आठ विजय, पाच बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. मुंबई सिटीला १७ सामन्यांत पाचवा पराभव पत्करावा लागला असून सात विजय व पाच बरोबरी अशा कामगिरीसह २६ गुण व चौथे स्थान त्यांनी कायम राखले. चेन्नईन एफसी (१५ सामन्यांतून २२) पाचव्या, तर ओडिशा एफसी (१६ सामन्यांतू २१) सहाव्या क्रमांकावर आहे. आता बाद फेरीतील चौथ्या स्थानासाठी मुंबई-चेन्नईन-ओडिशा अशी तिरंगी लढत असेल.

रॉलीन बोर्जेसने मुंबईचे खाते १८व्या मिनिटास उघडले. त्यानंतर गोव्याने फेरॅन कोरोमीनास याच्या गोलमुळे दोन मिनिटांत बरोबरी साधली. मग दोन मिनिटांत दोन गोल करीत गोव्याने प्रतीआक्रमण रचले.

मध्यंतराच्या १-३ अशा पिछाडीनंतर मुंबईने दुसर्‍या सत्रात २-३ अशी पिछाडी एकपर्यंत आणली होती, पण त्यानंतर गोव्याचा चौथा व वैयक्तिक गोल कोरोमीनासने केला. त्यानंतर महंमद रफीकच्या स्वयंगोलमुळे मुंबईला धक्का बसला.

गोवा घरच्या मैदानावर खेळत असला तरी खाते उघडण्याची कमाल मुंबई सिटीने केली. १८व्या मिनिटाला मुंबईच्या बचाव फळीतील शुभाशिष बोस याने चेंडूवर ताबा मिळवित अंदाज घेतला. मध्य फळीतील बोर्जेसची धाव लक्षात येताच त्याने पास दिला. मग बोर्जेसने नेटच्या मध्यभागी चेंडू मारताना गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझला रोखले.

गोव्याने दोन मिनिटांत बरोबरी साधली. २०व्या मिनिटाला जॅकीचंदने गोलक्षेत्रालगत उजवीकडे चेंडूवर ताबा मिळविला. त्याने मारलेला चेंडू ह्युगो बौमौसने छातीवर नियंत्रीत केला. हा चेंडू मिळताच कोरोमीनासने सफाईदार फिनिशींग केले.

त्यानंतर मुंबईला कॉर्नरवर फटका बसला. ब्रँडन फर्नांडीसने घेतलेल्या कॉर्नरला कार्लोस पेनाने दिशा दिली. त्यावेळी मुंबईचा स्ट्रायकर मोडोऊ सौगौ चेंडू रोखू शकला नाही. यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेत बौमौसने हेडिंगवर लक्ष्य साधले. मग कोरोमीनासच्या चालीवर जॅकीचंदने लक्ष्य साधले.