मुंबई संकटात

0
71

इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील काल रविवारी झालेल्या ४७व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सकडून ७ गडी व १२ चेंडू राखून दारुण पराभव स्वीकारावा लागला. मुंबईने विजयासाठी ठेवलेले १६९ धावांचे किरकोळ लक्ष्य राजस्थानने १८ षटकांत गाठले. जोस बटलरने ५३ चेंडूंत नाबाद ९३ धावांची तुफानी खेळी करताना यंदाच्या स्पर्धेतील आपले सलग पाचवे अर्धशतक लगावले. पराभवामुळे मुंबईला ‘प्ले ऑफ’मधील आगेकूच करण्यासाठी इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुंबईला सूर्यकुमार यादव (३८) व ईविन लुईस (६०) यांनी ८७ धावांची खणखणीत सलामी दिली. आर्चरने यादव व रोहित (०) यांना बाद करत मुंबईच्या डावाला उतरती कळा लावली. यानंतर मुंबईच्या पुढील फलंदाजांना धावा जमविण्यासाठी संघर्ष करावा लागला. आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सामना होणार आहे.