मुंबईत इमारत कोसळून ७ जण मृत्यूमुखी

0
108

मुंबई येथील डोंगरी भागातील एक अत्यंत जुनी चार मजली इमारत काल सकाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. ढासळलेल्या इमारतीच्या ढिगार्‍याखाली सुमारे ४० जण अडकल्याचे वृत्त आहे. मदतकार्य सुरू केल्यानंतर दोन बालकांसह एका महिलेला ढिगार्‍यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १२ जण ढिगार्‍याखाली मरण पावल्याची माहिती दिली आहे. मात्र अधिकृत माहितीनुसार ७ जण मरण पावले आहेत. दुर्घटनाग्रस्त इमारत शंभर वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात आले.
इमारतीच्या ढिगार्‍याखाली गाडलेल्यांमध्ये बहुतेक महिला व बालकांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सदर इमारत असलेला भाग अरुंद असल्याने बचाव कार्यात अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.