मुंबईत आग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू

0
123

लोअर परळ येथील कमला मील कम्पाऊंडला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेतील पाच दोषी अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. या अधिकार्‍यांनी नियमांचे उल्लंघन करून रेस्टॉंरंटला परवानगी दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या अग्नितांडवाप्रकरणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.

गुरुवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास ‘वन अबव्ह पब’ला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर हॉटेल मोजेस ब्रिस्ट्रोला आणि लंडन टॅक्सी रेस्टॉंपबमध्ये आग वेगाने पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. कुलिंग ऑपरेशन करून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. जवळपास अडीच ते तीन तासांनी आग आटोक्यात आली. या दुर्घटनेवेळी हॉटेलातील कर्मचारी लोकांना वाचवण्याऐवजी स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी पळून गेल्याचे समोर आले आहे. आग लागल्यानंतर नेमके कसे बाहेर पडायचे हे माहीत नसल्याने पबमध्ये असलेल्या तरुणींनी बचावासाठी बाथरूममध्ये स्वत:ला बंद करून घेतले. त्यामुळे मृत सर्वच्या सर्व महिलांचा बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्नितांडवात बहुतेकांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे केईएम इस्पितळाचे डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले. मृतांमध्ये ३ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे. त्यांपैकी ८ मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी वन अबव्ह मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढदिनीच तिला मृत्यूने गाठले..

खुशबू बन्सल हिचा २८ रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजो ब्रिस्टो रेस्तॉं अँड पबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. दुर्दैवाने खुशबूला वाढदिवशीच मृत्यूने गाठले. पार्टीला तिचे मित्र व नातेवाईकही उपस्थित होते. मोठ्या थाटात वाढदिवस साजरा झाला. पण त्यानंतर आग लागली आणि पाहता पाहता हॉटेलचा सगळा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.

सुुरक्षा रक्षकांमुळे वाचले
२०० जणांचे प्राण

या दुर्घटनेवेळी दोघा सुरक्षा रक्षकांनी संटकाच्यावेळी केलेल्या मदतीमुळे पबमधील सुमारे २०० जणांचे प्राण वाचले. महेश साबळे व सूरज गिरी अशी त्यांची नावे आहेत. कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये ते सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. आग लागली तेव्हा या दोघांनी लोकांना तातडीने इमारतीमधून बाहेर काढायला सुरुवात केली. त्यामुळे सुमारे २०० जणांचा जीव वाचला.