मुंबईचे लक्ष्य अंतिम फेरी

0
112

>> चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध आज ‘क्लॉलिफायर १’

विद्यमान विजेता चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स यांच्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १२व्या मोसमातील पहिला प्ले ऑफ सामना आज मंगळवारी खेळविला जाणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार असल्याने उभय संघ आपला सर्वोत्तम खेळ दाखवणार आहेत.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मुरलेल्या दोन संघांमधील ही लढत क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. चेन्नईचा मागील काही सामन्यांतील ढासळलेला फॉर्म त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. सुमार कामगिरीनंतर केवळ एका सामन्यात तळपलेली शेन वॉटसनची बॅट, दुखापतग्रस्त झाल्यामुळे केदार जाधवची जागा घेण्यासाठी दुसर्‍या खेळाडूची निवड चेन्नईसाठी डोकेदुखी ठरू शकते. परंतु, प्रतिकुल परिस्थितीतही ‘कूल’ राहून खेळ करण्याची क्षमता चेन्नई संघात आहे.

साखळीतील दोन्ही लढतीत चेन्नईला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३ एप्रिलला हे दोन संघ पहिल्यांदा या स्पर्धेत आमने सामने आले होते. त्यावेळी जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पंड्याने केलेल्या मार्‍याच्या जोरावर मुंबईने घरच्या मैदानावर विजयाची नोंद केली होती. इतकेच नव्हे तर चेन्नई सुपरकिंग्सवर ३७ धावांनी मात करत मुंबईने चेन्नईची विजयाची मालिका खंडीत केली होती. घरच्या प्रेक्षकांच्या जोरावर मुंबईला नमविण्याचे चेन्नईचे मनसुबे असले तरी आकडेवारी मात्र त्यांच्या विरोधात जात आहे. चेन्नईच्या मैदानावर मुंबईने सात पैकी पाच सामने जिंकले आहेत तर चेन्नईला केवळ दोन सामन्यांत विजय प्राप्त करता आला आहे. चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे प्रभावी फिरकी मारा करणारा संघच आज विजय मिळविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई इंडियन्स संभाव्य ः रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इविन लुईस, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड, राहुल चहर, लसिथ मलिंगा व मिचेल मॅकेलनाघन.

चेन्नई सुपरकिंग्स ः शेन वॉटसन, फाफ ड्युप्लेसी, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायडू, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, दीपक चहर व शार्दुल ठाकूर.