मुंबईची पलटनच लई भारी!

0
137
  •  धीरज गंगाराम म्हांबरे

मुंबईच्या विजयाचे दोन प्रमुख शिलेदार म्हणून जसप्रीत बुमराह व हार्दिक पंड्या या दुकलीला श्रेय दिल्यास वावगे ठरणार नाही. करणच्या कॉफीमुळे मान खाली घालावी लागल्यानंतर हार्दिकने एका फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत आपल्या कामगिरीने टीकाकारांची तोंडे बंद केली. तर मधल्या षटकांत धावा आटवून दबाव टाकणे व डेथ ओव्हर्समध्ये अचूक दिशा व टप्पा राखून प्रतिस्पर्धी खेळाडूस धोका पत्करण्यास भाग पाडण्याचे काम करणारा जसप्रीत बुमराह नावाचा अवलिया मुंबईसाठी तारणहार ठरला.

थरारक लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचा एका धावेने पराभव करत मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या आवृत्तीचे अजिंक्यपद पटकावले. टी-ट्वेंटी क्रिकेटमधील सर्वांत भव्यदिव्य स्पर्धा म्हणून नावलौकिक मिळविलेली ही स्पर्धा चौथ्यांदा जिंकणारा पहिला संघ म्हणून मुंबईने आपली नवी ओळख निमार्र्ण केली. महाराष्ट्र व गोव्यात सर्वाधिक पाठीराखे या संघाला लाभले आहेत. सोशल जगताचा विचार केल्यास फेसबुकवर तब्बल १ कोटी ३० लाख लाईक्स, इन्स्टाग्रामवर ३२ लाख व ट्विटरवर ५१ लाखाहून जास्त फॉलोअर्स या संघाची कमाई म्हणता येईल. यशस्वीतेच्या बाबतीत चेन्नईला मागे टाकल्यानंतर मुंबईने लोकप्रियतेच्या बाबतीतही चेन्नई सुपरकिंग्सला पिछाडीवर टाकले आहे.
कर्णधार रोहित शर्माची कामगिरी त्याच्या ‘हिटमॅन’ या टोपणनावाला समर्पक झाली नसली तरी सांघिक प्रदर्शनामुळे त्याच्या सुमार कामगिरीची फारशी चर्चा झाली नाही. विशेषकरून सूर्यकुमार, क्विंटन डी कॉक यांच्या छोटेखानी, परंतु उपयुक्त खेळ्या रोहितचे अपयश झाकण्यास पुरेशा ठरल्या. त्याची बॅट तळपली नसली तरी त्याच्या नेतृत्वगुणांचा मात्र प्रभाव पडला. संघात केलेले समर्पक बदल, बुमराहसारख्या गोलंदाजाचा खुबीने केलेला वापर त्याच्या अनुभवाची जाणीव करून देत होता. २००९ सालच्या आयपीएल विजेत्या डेक्कन चार्जर्स संघातील नवोदित खेळाडू ते मुंबईला चारवेळा आयपीएल जिंकून देणारा कर्णधार हा रोहितचा प्रवास थक्क करणारा असाच ठरला.
मुंबईच्या विजयाचे दोन प्रमुख शिलेदार म्हणून जसप्रीत बुमराह व हार्दिक पंड्या या दुकलीला श्रेय दिल्यास वावगे ठरणार नाही. करणच्या कॉफीमुळे मान खाली घालावी लागल्यानंतर हार्दिकने एका फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत आपल्या कामगिरीने टीकाकारांची तोंडे बंद केली. हार्दिकने चौकारांपेक्षा अधिक षटकार लगावले. यावरून त्याच्या दाहक खेळाची प्रचिती येते. १९१ पेक्षा अधिक स्ट्राईकरेटने चारशेपेक्षा जास्त धावा करण्याचा कारनामा त्याने करून दाखवला. बंधू कृणाल, विंडीजचा आडदांड कायरन पोलार्डसारखे स्फोटक फलंदाज संघात असताना किरकोळ शरीरयष्टी असलेला हार्दिक कामगिरीत उजवा ठरला. प्रतिस्पर्धी संघात एखादी मोठी भागीदारी फुलत असताना ‘जोडी ब्रेकर’ बनून हार्दिकने कर्णधार रोहितचे काम सोपे केले. संघात गोलंदाजांचे विविध पर्याय उपलब्ध असताना १४ बळी घेत हार्दिकने आपले अष्टपैलूत्व पुन्हा एकदा सिद्ध केले. दुसरा शिलेदार म्हणजे जसप्रीत बुमराह. नव्या चेंडूने झटपट विकेट मिळविणे, मधल्या षटकांत धावा आटवून दबाव टाकणे व डेथ ओव्हर्समध्ये अचूक दिशा व टप्पा राखून प्रतिस्पर्धी खेळाडूस धोका पत्करण्यास भाग पाडण्याचे काम करणारा जसप्रीत बुमराह नावाचा अवलिया मुंबईसाठी तारणहार ठरला. फलंदाज फटकेबाजीसाठी आसुसलेले असताना सलग दुसर्‍या मोसमात सातपेक्षा कमी इकॉनॉमी राखण्याचे ‘पुण्य’ त्याने केले. मुंबईच्या स्पर्धेतील प्रदर्शनाप्रमाणेच त्यांची स्पर्धापूर्व तयारीदेखील जेतेपदामागील अनेक कारणांमागील एक कारण ठरले. इशान किशन, आदित्य तरेसारखे खेळाडू संघात असतानादेखील मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून क्विंटन डी कॉक या दक्षिण आफ्रिकेच्या यष्टिरक्षक फलंदाजाला आपल्या संघात घेतले. वेगवान गोलंदाजांना खेळण्यात हातखंडा असलेल्या क्विंटनची बंगलोरमधील संथ खेळपट्टींवर खेळताना गोची होतानाचे चित्र क्रिकेटरसिकांसाठी नवे नव्हते. परंतु, मुंबईतील फलंदाजीस पोषक व वेगवान खेळपट्टीवर क्विंटनचे नवे व प्रगत रूप मुंबईच्या चाहत्यांना पाहायला मिळाले. नव्या फ्रेंचायझीकडून खेळताना ५२९ धावा कुटून तो मुंबईचा मोसमातील सर्वांत यशस्वी फलंदाज ठरला.
मुंबईने खेळविलेला अजून एक मास्टरस्ट्रोक म्हणजे जयंत यादव. प्रत्येक फ्रेंचायझी ‘मिस्टरी’, विविधता या पैलूंवऱ अधिक लक्ष केंद्रित करून गोलंदाजांची निवड करत असताना मुंबईने मात्र पारंपरिक ऑफस्पिन गोलंदाजी करणार्‍या जयंतला दिल्लीकडून आपल्या संघात घेतले. जयंतने दिल्ली व चेन्नईत असे केवळ दोनच सामने खेळले असले तरी या दोन्ही सामन्यांत मुंबईला विजयी करण्यातील त्याचे योगदान विसरून चालणारे नक्कीच नव्हते. चेपॉक येथे झालेल्या पहिल्या क्वॉलिफायर लढतीत सुरेश रैना या कसलेल्या खेळाडूला बाद करत जयंतने मुंबईची वाट मोकळी केली होती.
फिरकी विभागात तर किशोरवयीन राहुल चहरने दाखवलेला खेळ डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. मागील मोसमात मयंक मार्कंडेच्या प्रभावी कामगिरीमुळे राहुलला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. जवळपास दोन कोटी रुपये मोजून मुंबईने राहुलमध्ये गुंतवणूक करत २० लाख रुपये देऊन घेतलेल्या मयंक मार्कंडेला प्रथम पसंती दिली होती. यावेळी मात्र मार्कंडेचा ढासळलेला फॉर्म राहुलसाठी संघाचे दार उघडून गेला. पॉवरप्ले व मधल्या षटकांत आपल्या नियंत्रित लेगब्रेक व गुगलीने चहरने प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याचे काम केले. चेन्नईविरुद्धच्या अंतिम लढतीत बुमराहच्या तोडीस तोड कामगिरी करत राहुलने आपल्या चार षटकांत केवळ १४ धावा देत सुरेख मारा केला होता हे विसरून चालणार नाही. अंतिम सामन्यात धावांची खैरात केल्यानंतर शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकूरला पायचीत केलेला श्रीलंकेचा स्टार लसिथ मलिंगा, ऑस्ट्रेलियाचा जेसन बेहरेनडॉर्फ, न्यूझीलंडचा मिचेल मॅकलेनाघन, विंडीजचा इविन लुईस, भारतीय अनुकूल रॉय, युवराज सिंग, इशान किशन यांची कामगिरीदेखील मुंबईला हातभार लावणारी ठरली.

वर्ल्डकपपूर्वी डोकेदुखी
मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल विजेतेपद पटकावले असले तरी या स्पर्धेत खेळलेल्या व भारताचे विश्‍वचषक स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या खेळाडूंची खराब कामगिरी चिंतेचा विषय ठरली आहे. टी-ट्वेंटी व एकदिवसीय क्रिकेट यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक असला तरी वर्ल्डकपसाठी निवडलेले बहुतेक सर्व खेळाडू भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर या दोन्ही प्रकारात प्रतिनिधित्व करतात हे विसरून चालणार नाही. बुमराह, धवन, राहुल व हार्दिकचा अपवाद वगळता इतरांनी डोकेदुखी वाढवली आहे. चायनामन कुलदीप यादव व अष्टपैलू केदार जाधवची कामगिरी तर खुपणारी आहे. त्यातच केदार दुखापतग्रस्त झाल्याने विश्‍वचषकाला मुकण्याची दाट शक्यता आहे. टीम इंडियाचे प्रमुख फिरकी अस्त्र असलेल्या कुलदीपला केकेआरने केवळ ९ सामन्यांत खेळविले. त्याची गोलंदाजीतील ७१.५०ची सरासरी व ८.६६ची इकॉनॉमी भारतासाठी धोक्याची घंटा मानण्यात येत आहे. टीम इंडियातील त्याचा फिरकी सहकारी चहलने २१ बळी घेतले असले तरी धावा रोखण्यातील त्याची लोप पावत असलेली क्षमता टीम इंडियासाठी संकेत मानला जात आहे. विजय शंकर, दिनेश कार्तिक यांनादेखील आपल्या क्षमतेला न्याय देता आला नाही.

परावलंबिता ठरली मारक
कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या आघाडीच्या फ्रेंचायझींना एक-दोन खेळाडूंवर अतिअवलंबून राहण्याची किंमत मोजावी लागली. केकेआरने केवळ रसेलच्या भरवशावर अजिंक्यपदाचे स्वप्न पाहिले तर आरसीबीने कोहली-डीव्हिलियर्स यांच्यात गुंतवणूक करत गोलंदाजीकडे कानाडोळा केला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथमच उत्कृष्ट कामगिरी करत युवा खेळाडूंमधील गुंतवणुकीचा परतावा नक्कीच मिळतो हे दाखवून दिले. वॉर्नर-बॅअरस्टोव या सलामी जोडीच्या तडाखेबंद कामगिरीनंतरही मधल्या फळीने अनेकवेळा पत्करलेली शरणागती हैदराबादच्या पतनाचे कारण ठरली. संघात घाऊक बदल करत खेळाडूंना सतत दबावाखाली ठेवण्याची मोठी किंमत राजस्थान रॉयल्स व किंग्स इलेव्हन पंजाब या संघांना मोजावी लागली. ज्येष्ठांचा संघ म्हणून सुपरिचित चेन्नईने खेळाला वय लागत नाही तर जिद्द व कठोर मेहनतीच्या जोरावर ‘टॅलेंट’वर मात करता येते हे पुन्हा एकदा संपूर्ण विश्‍वाला दाखवून दिले.

दर्जेदार स्पर्धेतील सुमार पंचगिरी
स्पर्धेतील पंचगिरीचा दर्जा मात्र सुमारच होता. आयसीसीच्या एलिट पथकात असलेले विदेशी तसेच भारतात देशांतर्गंत क्रिकेटमध्ये सातत्याने पंचगिरीकरून अनुभवसंपन्न झालेल्या दर्जेदार पंचांकडून उच्च दर्जाची नसली तरी ठिकठाक कामगिरीची अपेक्षा होती. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात एखादी चूक लगेचच कॅमेर्‍यामध्ये टिपण्यात आलेली असताना पंचांचा फ्लॉप शो अनेक संघांसाठी डोकेदुखीचे कारण ठरला. याचा सर्वाधिक फटका तापट विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला बसला. मुंबईविरुद्ध साखळी फेरीत आरसीबीला विजयासाठी एका चेंडूंत ७ धावांची आवश्यकता असताना मलिंगाने केवळ एक धाव देत मुंबईला विजयी केले. परंतु, मुंबईला विजयी केलेला ‘तो’ चेंडू नो बॉल असल्याचे सामना संपल्यानंतर स्पष्ट झाले. पंच सुंदरम रवी यांच्या या घोडचुकीमुळे आरसीबीला संभाव्य विजयापासून वंचित रहावे लागले तसेच मुंबईने एक पाऊल अजून पुढे टाकत दोन गुणांची कमाई केली. अपेक्षेप्रमाणे कोहलीने पंचांच्या या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली. सनरायझर्सविरुद्धच्या आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात उमेश यादवचा पाय क्रीझमध्ये असताना पंच नायजेल लॉंग यांनी नो बॉलची खूण केली. या निर्णयानंतर लॉंग यांनी ड्रेसिंग रुममध्ये केलेली मोडतोडदेखील चर्चेचा विषय ठरली.
संयमाचा महामेरू असलेला महेंद्रसिंग धोनी चिडण्याची घटना पाहायला मिळाली तीसुद्धा पंचांमुळेच. राजस्थान रॉयल्सविरुद्ध ही घटना घडली. कमरेवरील नो बॉलचा इशारा केल्यानंतर मैदानी पंच उल्हा गंधे यांनी लगेचच स्क्वेअर लेगवरील पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांच्याशी सल्लामसलत करत आपला निर्णय बदलला. यामुळे धोनीने तंबूतून मैदानात धाव घेतली. धोनीची ही कृत्ती त्याच्या व्यक्तित्वाला धरून नसली तरी संपूर्ण जगाला पंचांच्या अपरिपक्वतेचे व धोनीच्या चिडण्याचे दर्शन घडले. सामना अटीतटीचा होत असताना पंचांचा हा निर्णय चेन्नईच्या पराभवाचे कारण ठरला असता. अंतिम सामन्यात ‘न दिलेला वाईड’, धोनीला धावबाद ठरवण्याचा निर्णय काही प्रमाणात वादग्रस्त ठरले असले तरी हे निर्णय चुकीचे होते असे म्हणता येणार नाहीत.

अश्‍विनकडून नियमांचे पालन
किंग्स पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्‍विन याने ‘मांकडिंग’ करत राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर याला बाद केले. अश्‍विनच्या या कृतीबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त करत खिलाडूवृत्तीचे अस्त्र पुढे केले असले तरी माजी पंच सायमन टॉफेल यांनी अश्‍विनची कृती नियमाला धरूनच असून यात खिलाडूवृत्तीचा प्रश्‍न नसल्याचे सांगत नियमांचा आधार घेतला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच दिल्लीचा अमित मिश्रा क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याप्रकरणी बाद देण्याचा प्रकार घडला. क्रिकेटचे हे फार दुर्मीळ बादप्रकार आयपीएलच्या एकाच मोसमात क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाले.