‘मी, माझ्या आईची मैत्रीण!’

0
141
  • प्रमोद ग. गणपुले

हे सगळं ऐकल्यावर माधुरीची आई विचारात पडली. तिला स्वतःचं तरुणपण आठवलं. त्यावेळी माझ्या वाट्याला आलेल्या मुक्या वेदना मी माझ्या माधुरीच्या वाट्याला येऊ देणार नाही… असा मनाशी निश्‍चय करून ती घरी जायला निघाली.

माधुरी आणि तिची आई आमच्या शेजारीच राहतात. माधुरीचे बाबा गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात असतात. दुबईला कुठल्याशा हॉटेलमध्ये काम करतात. अर्थात वर्षातून एकदा एका महिन्याची रजा घेऊन दरवर्षी घरी येतात. त्यामुळे माधुरीचा सर्व सांभाळ तिच्या आईनेच केलाय. दहावीचा रिझल्ट लागल्यावर माधुरीची आई पेढे घेऊन आली तेव्हा कळलं की माधुरी एक हुशार मुलगी आहे. दहावीच्या परिक्षेत तिला चांगले ८७% गुण मिळाले होते. नंतर तिनं शहरातल्या एका प्रतिष्ठित उच्च माध्य. विद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश मिळवला.

दहावीपर्यंत गावात राहणारी, खाली मान घालून चालणारी, गावातल्याच शाळेत शिकणारी, शाळेच्या त्या टिपिकल ढगळ गणवेशात वावरणारी माधुरी शहरातल्या शाळेत जाऊ लागली आणि एकदम बदलली.
पूर्वी खाली मान घालून नाकासमोर चालणारी, पाठीवर रुळणार्‍या दोन घट्ट वेण्या घालणारी माधुरी, आता वर मान करून मोकळे सोडलेले केस सावरण्यासाठी मानेला अधूनमधून झटके देत चालू लागली. आता तिच्या हातात मोबाइल आणि कानात लोंबणारी बूचवाली पांढरी वायर आली. पाठीवर पुस्तकांची सॅक आणि त्यात न मावणारी एक फुलसाईज, जाडजूड नोटबूक हातात. शाळेत जाताना कॅनव्हॉसचे खाकी रंगाचे बूट वापरणारी माधुरी आता टाक् टाक् आवाज करणार्‍या किंचित हाय हिल्सच्या चपला वापरू लागली. केवळ महिनाभराच्या कालावधीत तिनं या सार्‍या गोष्टींचा पुरेसा सराव करून घेतला होता.

गावातली शाळा सोडून शहरातल्या शाळेत जायला लागल्यावर मुलामुलींमध्ये होणारा हा बदल मी गेली अनेक वर्षे पाहात आलोय. अर्थात त्यांची यामध्ये काही चूक आहे असं मुळीच नाही. गावातली बंदिस्त शाळा, गावातलेच नेहमीचे परिचित शिक्षक, शिस्तीची सर्व बंधनं पाळणारं शाळेतलं वातावरण. त्यातून बाहेर पडल्यावर नुकतेच पंख फुटलेल्या पाखरासारखी त्यांची अवस्था होते. उंच आकाशात मुक्तपणे भरारी घेण्याच्या त्यांच्या दबून राहिलेल्या वृत्ती-प्रवृत्तींना आकाश अगदी ठेंगणं होऊन जातं.
कॉलेजमधलं मुक्त वातावरण, हसणं-खिदळणं, मुलामुलींचं एकमेकात मिसळणं, थट्टा-मस्करी करणं, नवे परीचय, नव्या ओळखी, नवे शिक्षक, नवे वर्ग… सारंच कसं नवं नवं. हळूहळू या नवलाईची लवकरच सवय होऊन जाते. आता त्यात मोबाइलची भर पडली आहे. गंमत म्हणून केलेला फोन, पाठवलेला मेसेज, त्याला आलेलं गंमतीशीर उत्तर, यांतली गंमत हळुहळू वाढतच जाते. माधुरीच्याही हे सगळं लवकरच अंगवळणी पडलं होतं.

आपली माधुरी आता पूर्वीसारखी लाजाळू, भिडस्त आणि बावळट राहिली नाही, याचा तिच्या आईला आनंदच होता. परंतु त्याचबरोबर तिला एक चिंताही होती. आपली मुलगी गरीबीत वाढलेली, वडील परदेशात असल्याने त्यांचा सहवास तसा कमीच मिळालेला. आपणच सार्‍या खस्ता खाऊन तिला वाढवलेलं. त्यामुळे जबाबदारी अशी तिला केव्हाच कळली नाही. त्यामुळे या नव्या नवलाईत आपली मुलगी वहावत तर जाणार नाही ना! गावांतून निघालेली ही भोळीभाबडी बाहुली त्या शहरी आणि श्रीमंती भुलभुलैय्यामध्ये फसणार तर नाही ना? अशी शंका आता तिला सतावू लागली होती.
पुढे पाच-सहा महिने असेच निघून गेले. मध्यंतरी एकदा माधुरीची आई आमच्या सौ.शी गप्पा मारत होती. विषय माझ्याही कानावर पडत होता. माधुरीची आई म्हणाली, ‘‘माधुरी, हल्ली सारखी फोनवर बोलत असते. कुणाशी बोलते, एवढं काय बोलते… काहीच कळत नाही. मध्येत हसते काय, थट्टामस्करी काय करते. पूर्वी ती अशी फार बोलत नसे. आता जणू तिला नव्यानेच भरभरून वाचा फुटलीय. परवा एकदा ती फोन घेऊन गच्चीवर जाऊन बसली. बराच वेळ कुणाशी तरी बोलत होती. मी तिला जेवायला हाक मारली तर म्हणते, ‘‘आई, तू जेऊन घे. मी जेवेन नंतर.’’ मला तिची आता काळजी वाटायला लागलीय.

मी अभ्यासाचा विषय काढला की चिडते. म्हणते, ‘‘मला कळतं, माझा अभ्यास झालाय.’’
पुढच्या आठवड्यात तिच्या वर्गातली काही मुलंमुली कुठंतरी पिकनिकला जाणार आहेत. माधुरी परवानगी मागत होती. मी म्हटलं, ‘‘मुळीच जायचं नाही. अभ्यास कर. नसते थेर चालणार नाहीत.’’
तिचं हे संभाषण ऐकून मला राहावलं नाही. मी म्हणालो, ‘‘अहो, तुम्ही तिची किती काळजी करताय? तिच्या या वागण्यात तिची काहीच चूक नाही. हे वातावरण, हे वय असंच असतं. तिला स्वतःच्या मनानं हे जग नव्यानं बघायचंय. अनुभव घ्यायचाय. तसं पाहिलं तर तुमचीही चूक नाही. तुम्ही तिची आई आहात. तुमचं तिच्यावर प्रेम आहे. तिची तुम्हाला काळजी आहे. पण म्हणून तिच्यावर बंधनं घालणं, वेळोवेळी तिला अडवणं हा काही त्याच्यावरचा उपाय नव्हे. खरं सांगू, जगातल्या सगळ्या ‘आई’ अशाच असतात, पण आईच्या पलीकडे पालकत्वाची म्हणून एक भूमिका असते. ती तुम्ही समजून घ्यायला हवी.

आपल्याकडे असं सांगितलं आहे की ‘‘प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रे मित्र वदाचरेत!’’ मुलाला सोळावं वर्ष लागलं की वडिलांनी मुलाशी मित्रत्वाच्या नात्यानं वागलं पाहिजे. आपण असंही म्हणू की, मुलगी सोळा वर्षांची झाली की आईने मुलीशी मैत्रिणीच्या नात्यानं वागलं पाहिजे. तुम्ही आई आहात हे आता विसरा आणि तिची मैत्रीण व्हा. सुरुवातीला कठीण जाईल पण प्रयत्न करा. हळुहळू जमेल.’’
त्यासाठी तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी कशा वागता, कशा बोलता, जीवनातल्या खाजगी गोष्टी कशा तिला सांगता, कधी तिची थट्टा करता, मस्करी करता, कधी तिला चिडवता, कधी तिच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारता, कधी मैत्रिणीबरोबर फिरायला जाता, एकमेकींची गुपितं जाणून घेता, कधी मैत्रिणीचा सल्ला घेता, हे सगळं आता तुमच्या मुलीच्या बाबतीत करा. तुम्हीही केव्हातरी तिच्या वयाच्या होतातच. ते दिवस आठवून पहा. तेव्हाच्या तुमच्या काही आठवणी असतील, प्रसंग असतील ते सर्व तिच्याशी शेअर करा. बघा, तुम्हाला आणि तिलाही कसं मोकळं-मोकळं वाटेल.
कधीतरी तिला म्हणावं, ‘‘एकदा तुझ्या त्या सगळ्या मित्रमैत्रिणींना चहापानासाठी आपल्या घरीच बोलव ना. त्यांना म्हणावं, ‘माझ्या आईला तुम्हा सगळ्यांशी ओळख करून घ्यायचीय. गप्पा करायच्या आहेत. खरंच खूप मज्जा येईल.’ असं सगळं आभाळ मोकळं मोकळं झालं तर आईला फसवून काही करावं, चोरून काही करावं असं तिला वाटणारच नाही. दुसर्‍या कुठल्याही मैत्रिणीपेक्षा माझी आईच माझी चांगली मैत्रीण आहे, असं तिला वाटलं पाहिजे. तिला बदलायला लावण्यापेक्षा तुम्ही स्वतः बदला. तुमची चिंता मिटेल.’’
हे सगळं ऐकल्यावर माधुरीची आई विचारात पडली. तिला स्वतःचं तरुणपण आठवलं. त्यावेळी माझ्या वाट्याला आलेल्या मुक्या वेदना मी माझ्या माधुरीच्या वाट्याला येऊ देणार नाही… असा मनाशी निश्‍चय करून ती घरी जायला निघाली.