मिश्र दुहेरीत बोपण्णा अंतिम फेरीत

0
121

भारताच्या रोहन बोपण्णा याला आपल्या दुसर्‍या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ एका विजयाची गरज असून काल शुक्रवारी त्याने आपली हंगेरीची जोडीदार टिमिया बाबोस हिच्यासह खेळताना मिश्र दुहेरी गटातून ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बोपण्णाच्या सर्व्हिसला बाबोस हिच्या परतीच्या तडाखेबंद फटक्यांची साथ लाभल्याने या जोडीचा विजय सुकर झाला. त्यांनी उपांत्य फेरीत ब्राझिलच्या मार्सेलो डेमोलिनेर व स्पेनच्या मारिया जुझे मार्टिनेझ यांचा ७-५, ५-७, १०-६ असा पराभव केला. मागील वर्षी कॅनडाच्या गेब्रिएला दाब्रोवस्कीसह खेळताना बोपण्णाने लाल मातीवरील फ्रेंच ओपन जिंकून आपले पहिलेवहिले ग्रँडस्लॅम पटकावले होते. विशेष म्हणजे बोपण्णाला आपल्या दुसर्‍या जेतेपदासाठी दाब्रोवस्की हिला नमवावे लागणार आहे. तिने दुसर्‍या उपांत्य फेरीत क्रोएशियाच्या मेट पाविच याच्यासह खेळताना ब्रुनो सुवारिस व इकतारिना माकारोवा जोडीला ६-१, ६-४ असे हरवून अंतिम फेरी गाठली.

पुरुष एकेरीत द्वितीय मानांकित रॉजर फेडरर व बिगरमानांकित हियोन चुंग यांच्यातील सामना रंगला नाही. चुंगने दुखापतीच्या कारणास्तव सामन्यातून अर्ध्यावरच माघार घेतली तरी यावेळी फेडरर ६-१, ५-२ असा आघाडीवर होता. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा फेडरर हा १९७२ सालानंतरचा सर्वांत वयस्क खेळाडू ठरला आहे.

बाबोस-म्लादेनोविच अजिंक्य
महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत हंगेरीच्या टिमिया बाबोस व फ्रान्सच्या क्रिस्टिना म्लादेनोविच या पाचव्या मानांकित जोडीने इलिना वेस्निना व इकतारिना माकारोवा या रशियन जोडीला १ तास २० मिनिटे चाललेल्या लढतीत ६-४, ६-३ अशी धूळ चारत जेतेपदाचा झळाळता करंडक पटकावला. एकत्रित खेळताना या जोडीचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. म्लादेनोविचने २०१६ साली कॅरोलिन गार्सियासह खेळताना फ्रेंच ओपन जिंकली होती.