मिरामार कॉंक्रिट रस्त्याचा चौकशी अहवाल जाहीर करा ः कॉंग्रेस

0
125

मिरामार ते दोनापावल या सिमेंट क्रॉंक्रीटच्या रस्त्याला तडे गेल्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रस्त्याची पाहणी करून तत्कालीन मुख्य सचिवांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. या रस्त्याच्या कामाची चौकशी झाली की नाही ? सरकारने चौकशी अहवाल जाहीर करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते ऍड. यतीश नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल केली.

मिरामार ते दोनापावल हा चांगला डांबरी रस्ता होता. परंतु, भाजप सरकारने गोवा साधन सुविधा विकास महामंडळाच्यामार्फत कोट्यवधी रूपये खर्चून हा रस्ता क्रॉंक्रीटच्या साहाय्याने बांधण्यात आला आहे. सरकारने एका चांगल्या रस्त्याची दुरवस्था करून टाकली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहन चालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, असा दावा ऍड. नाईक यांनी केला.

रस्त्याच्या कामाच्या चौकशीचा अहवाल मुख्य सचिवांनी सादर केला की नाही? याबाबत काहीच माहिती जारी करण्यात आलेली नाही. या रस्त्याच्या बांधकामासंबंधी मुख्य सचिवांनी अहवाल सादर केलेला असल्यास जनतेसाठी जाहीर करावा, अशी मागणी ऍड. नाईक यांनी केली.