मिरामारला ‘रेरा’वर १८-१९ रोजी परिषद

0
110

भारतीय अभियंते संस्थेच्या गोवा शाखेतर्फे येत्या १८ व १९ ऑगस्ट रोजी मिरामार येथील विज्ञान केंद्रात ‘रेरा’ या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती संस्थेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष गुरूनाथ नाईक पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्यात रेरा कायद्याचा प्रभाव आणि अंमलबजावणीवर परिषदेत चर्चा केली जाणार आहे. गोवा रेरा आणि क्रेडायच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी दोन वेळा रेरा कायद्याबाबत माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमासाठी वेळ कमी असल्याने रेराबाबत सविस्तर माहिती देणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे आता दोन दिवसांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी परराज्यातील तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, असेही नाईक पर्रीकर यांनी सांगितले.
या परिषदेत सुमारे १५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यात सिव्हिल अभियंते, विविध सरकारी खात्यातील अभियंते, रेरा क्षेत्रातील सल्लागार आदी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील रेरा क्षेत्रातील तज्ज्ञ चार्टर अकाउंटंट आश्‍विन शहा, अशित शहा, डॉ. संजय चतुर्वेदी, ऍड. शिवन देसाई, ऍड. तन्मय फडके परिषदेत मार्गदर्शन करतील.

या कार्यक्रमातून बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होत नाहीत. या परिषदेमध्ये नागरिकांचा जास्त सहभाग असावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. कायदा, अभियांत्रिकी, वाणिज्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या परिषदेत सामावून घेतले जाणार आहे. नागरिक या परिषदेला उपस्थिती राहून शंकांचे निरसन करून घेऊ शकतात, असेही नाईक – पर्रीकर यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे सचिव दीपक करमलकर, दत्ता कारे यांची उपस्थिती होती.