मिचेल सेंटनरच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

0
95

न्यूझीलंडचा अष्टपैलू मिचेल सेंटनर याला क्रिकेटपासून ९ महिने दूर रहावे लागणार आहे. गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्याला इंग्लंडविरुद्धची आगामी कसोटी मालिका, इंडियन प्रीमियर लीग व इंग्लिश कौंटी मोसमाला मुकावे लागणार आहे.

इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात २२ मार्चपासून ईडन पार्कवर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. प्रामुख्याने गोलंदाजीसाठी संघात असलेल्या सेंटनरने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतके झळकावून फलंदाजीत चमक दाखवली होती. त्यामुळे २६ वर्षीय सेंटरनविना न्यूझीलंड संघाचा समतोल बिघडणार आहे. कसोटी स्पेशलिस्ट यष्टिरक्षक बीजे वॉटलिंग कमरेच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरल्याने पहिल्या कसोटीसाठी १२ सदस्यीय संघात त्याला स्थान मिळाले आहे. जांघेच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्याला मुकलेला अनुभवी रॉस टेलरदेखील संघात परतला आहे. न्यूझीलंडने संघ जाहीर करताना फिरकीपटूच्या जागेसाठी ईश सोधीऐवजी टॉड ऍस्टल याला पसंती दर्शवली आहे.

न्यूझीलंड संघ ः जीत रावल, टॉम लेथम, केन विल्यमसन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, कॉलिन डी ग्रँडहोम, बीजे वॉटलिंग, टॉड ऍस्टल, टिम साऊथी, नील वॅगनर, मॅट हेन्री व ट्रेंट बोल्ट.