मासिकपाळीत हस्तक्षेप (?)

0
622
  • डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

पाळी जरी नैसर्गिक प्रक्रिया आहे असे सर्व सुशिक्षित – अशिक्षित लोकांना पटलेले असले तरी देशांतील लाखो कुटुंबं ‘मासिक धर्माला’ अजूनही अशुभ मानतात. पाळीच्या पाच दिवसांत स्वयंपाकघर, मंदिरे, इ.मध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करतात. मग अशा अवस्थेत सणा-समारंभांच्या वेळी देवादिकांचे कार्य करताना मासिक पाळी आली तर?

पी.सी.ओ.एस. (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) सध्या महिलांमध्ये आढळणारा सर्वांत चर्चित व्याधी… जो अनियमित पाळी, सकष्ट पाळी, अत्यार्तव, कष्टार्तव, उदर-कटी शूळ, लठ्ठपणा, निद्रानाश अशी सर्व लक्षणे घेऊन येतो. त्याचे मुख्य कारण संप्रेरक (हार्मोनल) औषधांचा अतिवापर व अयोग्य वापर.

गोळी घेणे बंद केल्यावर साधारण तीन ते चार दिवसांनी पाळी येते. या गोळ्या गर्भनिरोधकाचे कार्य करत नाही, हे लक्षात घ्यावे. गोळ्या बंद केल्यावरही पाळी आली नाही तर प्रेग्नंसी टेस्ट करावी.

बारीक-सारीक दुखण्याखुपण्यांना महिला वर्ग तशी दाद देत नाही. सर्दी-खोकला-ताप तर आरोग्यातीलच एक बदल असल्यासारखा घेतात. कंबरदुखी तर महिलांच्या पाचवीलाच पुजलेली. जोपर्यंत एखादी व्याधी अंगात मुरत नाही तोपर्यंत डॉक्टरांकडे येणे नाही. पण याच महिला वर्षातून एकदा मात्र दवाखान्याला नक्की भेट देतात, तेही आरोग्याची कोणतीही तक्रार नसताना. तो महिना म्हणजे श्रावण-भाद्रपद. व्रत-वैकल्ये, उपास-तापासाचा महिना. कुणाची मंगळागौर असते तर कुणाचे शुक्रवारचे व्रत तर कुणाचे रविवारचे व्रत. या व्रतांच्या काळात कोणालाच पाळी आलेली नको असते. पुढे चतुर्थी सणाची चिंता आहेच. चतुर्थीच्या सणावेळी तर महिलावर्ग पाळीशी काय-काय खेळ खेळतात कुणाला माहीत! अगदी आत्ताच्या आत्ता पाळी यायला पाहिजे, तर कुणाला पाळी पुढे ढकलायला पाहिजे असते. पाळी जरी नैसर्गिक प्रक्रिया आहे असे सर्व सुशिक्षित – अशिक्षित लोकांना पटलेले असले तरी देशांतील लाखो कुटुंबं ‘मासिक धर्माला’ अजूनही अशुभ मानतात. पाळीच्या पाच दिवसांत स्वयंपाकघर, मंदिरे, इ.मध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करतात. मग अशा अवस्थेत सणा-समारंभांच्या वेळी देवादिकांचे कार्य करताना मासिक पाळी आली तर? मग मासिक पाळी लांबविण्याचा प्रयत्न तरी करतात किंवा लवकर आणण्याचा तरी प्रयत्न करतात. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने काही हार्मोनल पिल्स घेतात तर बरेच (प्रिमोलिट-एन)सारख्या गोळ्या.. ओटीसी प्रॉडक्ट.. स्वतःच मेडिकलमधून घेऊन जातात.

आपण हे जे काही गोळ्या घेऊन नैसर्गिक ऋतुचक्रामध्ये हस्तक्षेप करतो, त्याचा शरीरावर काहीच दुष्परिणाम घेणार नाही का? याचा कधीतरी महिला वर्गाने विचार केला आहे का?
क्लिनिकमध्ये पाळी मागे-पुढे करण्यासाठी (गोळ्या मागण्यासाठी) येणार्‍या प्रत्येक महिलेकडे जर एखाद्या डॉक्टरने अभ्यास म्हणून चौकशी करण्यास जर सुरुवात केली, तर तुम्हाला अचंबित करणारी माहिती मिळेल. जसे की या प्रि-पोन (पाळी अगोदर येण्यासाठी) किंवा पोस्ट-पोन (पाळी पुढे ढकलण्यासाठी)च्या गोळ्या घेतल्यावर तुम्हाला काहीच त्रास होत नाही का?
वरील प्रश्‍नावर क्वचितच ‘नाही’ असे उत्तर येईल. पण प्रत्यक्षात मात्र….
– हार्मोन्सच्या असंतुलनाबरोबर पाळी बिघडते.
– काहींना मासिक स्राव अधिक मात्रेत होतो तर काहींना कमी मात्रेत.
– चेहर्‍यावर मुरुमं, पुटकुळ्या येतात किंवा वाढतात.
– पाळीच्या आधी अंग जड होणे, विशेषतः स्तनामध्ये जडपणा वा सूज जाणवणे अधिक मात्रेत दिसते.
– योनीच्या परिसरात खाज येणे.
– मळमळणे, उलट्या होणे
– पाळीमधील अनियमितता.
अशाप्रकारची माहिती महिला वर्गाकडून मिळते. पण तरीसुद्धा विशेष सण-समारंभावेळी या गोळ्यांचा अट्टहास मात्र सगळ्यांनाच असतो, अगदी किशोरवयीन मुलीपासून ते चाळीशीतल्या महिलांपर्यंत. एवढे हे माहीत असलेले त्रास सहन करूनसुद्धा गोळ्या घेण्याचा का हा अट्टहास?
रुग्णांनी स्वतः अनुभवलेले दुष्परिणाम आहेतच पण त्यांना माहीत नसलेलेही काही दुष्परिणाम असतात. पी.सी.ओ.एस. (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) सध्या महिलांमध्ये आढळणारा सर्वांत चर्चित व्याधी… जो अनियमित पाळी, सकष्ट पाळी, अत्यार्तव, कष्टार्तव, उदर-कटी शूळ, लठ्ठपणा, निद्रानाश अशी सर्व लक्षणे घेऊन येतो. त्याचे मुख्य कारण संप्रेरक (हार्मोनल) औषधांचा अतिवापर व अयोग्य वापर. दीर्घ काळाने व्यक्त होणारा स्तनाचा कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर यांमध्ये संप्रेरकांचा वेळोवेळी वापर हे एक कारण सांगितलेले आहे.
मासिक पाळीचे सामान्य चक्र ः
संपूर्ण मासिक पाळीचे चक्र हे स्त्री हॉर्मोन्सवर सुरळीत चाललेले असते व हेच चक्र आपण कृत्रिमरीत्या आपल्या सोयीनुसार बदलण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या कार्यात व्यत्यय आणतो. या प्रि-पोन व पोस्ट-पोनसाठी वापरले जाणारेही हॉर्मोन्सच असतात. पण त्याच्या योग्य वापराने उपकारक ठरतात व अयोग्य वापराने अपायकारक ठरतात.

प्रत्येक स्त्रीच्या प्रजननक्षम काळात सर्वसाधारणपणे तीनशे ते चारशे स्त्रीबीजे परिपक्व होतात. प्रत्येक मासिक पाळीत त्यापैकी एका बीजकोषाची वाढ होऊन ते स्त्रीबीज कोषातून बाहेर पडते. गर्भाशयातून ते गर्भाशयनलिकेच्या झालरीसारख्या तोंडाच्या भागातून गर्भनलिकेत ओढले जाते. ही प्रक्रिया पिट्युटरी ग्लँडमधून स्रवणार्‍या ‘ल्युटिनायझिंग हॉर्मोन’द्वारे होते. अंडाशयातून बीज बाहेर पडल्यावर आत राहिलेल्या पिवळ्या पेशीसमूहातून ‘प्रोजेस्टेरॉन’ हॉर्मोन स्रवते. या हार्मोनमुळे गर्भाशयाच्या आंतर आवरणाची वाढ होत असते. योग्य काळात पुरुषाच्या वीर्यातील पुरुषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग झाला तर गर्भधारणा झाली, तर ती टिकून राहण्यासाठी प्रोजेस्टेरॉन उपयुक्त ठरते. स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचा संयोग झाला नाही तर फलित न झालेल्या स्त्रीबीजासह आच्छादनही योनिमार्गाद्वारे रक्ताच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते. त्यावेळी प्रोजेस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी झालेली असते.

पिट्युटरी ग्लँडमधून निर्माण होणारे ‘एफएसएच’ आणि ‘एलएच’ हे दोन स्राव अंडाशयाला उत्तेजित करतात. त्यामुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन हे दोन हॉर्मोन्स स्रवतात. या हॉर्मोन्समुळे गर्भाशयातील एन्डोमेट्रियममध्ये बदल होऊन मासिक पाळीचे चक्र सुरू होते. संपूर्ण पाळीच ज्या हॉर्मोन्सवर अवलंबून आहे त्याच हॉर्मोन्सची छेडछाड झाली की दुष्परिणाम होणार की नाही?
पाळी लांबवण्यासाठी सर्रास वापरली जाणारी गोळी म्हणजे प्रिमोल्यूट-एन् जी एक ओ.टि.सी. उत्पादन आहे. अशा प्रकारच्या काही इतर ब्रँडच्या गोळ्याही उपलब्ध आहेत, जे डॉक्टरांच्या सल्ल्याने काही जणी घेतात. आज याच प्रकारच्या गोळ्यांबद्दल पाहू या व नंतर तुम्हीच विचार करा पाळी लांबवणं किंवा लवकर आणणं या गोळ्यांच्या उपयोगाने गरजेचे म्हणण्यापेक्षा सुरक्षित आहे का?
नॉरेथिस्टिरोन म्हणजे काय?
नॉरेथीस्टिरोन हे महिन्यामध्ये आढळणार्‍या प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोनशी साधर्म्य असलेले हॉर्मोन होय. याचा उपयोग वेदनादायी व अल्पार्तवसारख्या पाळीमध्ये करतात. तसेच काही प्रकारच्या महिलांमधील कॅन्सरमध्ये होतो. अनियमित पाळीमध्ये या गोळीचा उपयोग होतो. याच गोळ्या आपण मात्र पाळी पुढे-मागे करण्यासाठी सर्रास वापरतो.
या प्रकारच्या गोळ्यांचा वापर अगदी १७ दिवसपर्यंत पाळी लांबवण्यासाठी करतात. या गोळ्यांमध्ये नॉरेथिस्टिरोन असते जे प्रोजेस्टेरॉनचे एक मानवनिर्मित व्हर्जन आहे- मादी सेक्स हॉर्मोन. जर डिंब फर्टाइल नसेल तर आपल्या शरीराची प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते आणि ओव्ह्युलेशन होत नाही आणि गर्भाशयाचा अस्तर डिस्चार्ज होतो पण नॉरेथिस्टिरोन घेतल्याने हे घडण्यापासून रोखले जाते कारण प्रोजेस्टेरॉनची पातळी कृत्रिमरीत्या उच्च राहते. म्हणून आपली पाळी लांबवता येते.

थोड्या कालावधीसाठी व योग्य मात्रेत घेतल्यास या गोळ्यांचा सहसा जास्त दुष्परिणाम नसतो. तसेच वारंवार घेण्याने मात्र तीव्र दुष्परिणाम दिसतात. चक्कर येणे, डोकेदुखी, अंगावर पांढरे जाणे, पोटदुखी, मूड्‌समधील बदल आणि सेक्स ड्राईव्ह, मळमळ यांचा समावेश होतो. वेगवेगळ्या रुग्णांमध्ये औषधांचा वेगवेगळा परिणाम दिसू शकतो. नॉरेथिस्टिरोनचा प्रभावदेखील स्त्रीपरत्वे बदलू शकतो.
पाळी लांबविण्यासाठी शक्यतो गोळ्या पाळीच्या तारखेच्या पाच दिवस आधी सुरू करावी व दिवसाला दोन याप्रमाणे पाळी जोपर्यंत पुढे ढकलायची आहे तोपर्यंत घ्यावी. गोळी घेणे बंद केल्यावर साधारण तीन ते चार दिवसांनी पाळी येते. या गोळ्या गर्भनिरोधकाचे कार्य करत नाही, हे लक्षात घ्यावे. गोळ्या बंद केल्यावरही पाळी आली नाही तर प्रेग्नंसी टेस्ट करावी.

काही महिलावर्ग घरगुती उपायांच्या नावाखाली पपई, चॉकलेट, गाजराचा रस, डाळींबाचा रस, खजूर, अननसाचा रस, दुधीचा रस, आल्याचा रस, तीळाचा काढा असे वेगवेगळे पदार्थ सेवन करतात, जेणे करून पाळी लवकर येईल. हे पदार्थ उष्ण गुण वाढवतात. तसेच शरीराचे पोषणही करतात. त्यामुळे अनियमित पाळीची तक्रार असलेल्या रुग्णांमध्ये यांचा उपयोग होतो. पण नियमित पाळी येणार्‍या रुग्णांमध्ये पाळी लवकर यायला याचा काहीही उपयोग होत नाही.
एकूण काय, धार्मिक – सांस्कृतिक भावनांनी घरातल्या बाईचे पोट करकचून बांधलेले आहे. ‘चार दिवस’ संपूर्ण विश्रांती मिळावी म्हणून आरोग्यशास्त्राने ‘बाहेर बसण्याची’ प्रथा पाडली, पण अज्ञान, अंधश्रद्धा व धार्मिकतेचे लेबल लावून ही प्रथा कुठल्याकुठे चिरडून गेली. या चार दिवसात विश्रांती मिळण्याऐवजी बाहेरची – कष्टांची कामे करी पडतात नाहीतर चतुर्थी आहे… मग पाळी लांबवण्याच्या गोळ्या आहेतच!!