मासळी तपासणीचे सर्व अहवाल जाहीर

0
112

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी अन्न व औषध प्रशासनाला फॉर्मेलीनशी संबंधीत मासळीच्या तपासणीचे सर्व अहवाल जाहीर करण्याची सूचना केली असून अन्न व औषध प्रशासनाने मडगाव व पणजी येथील मासळीच्या तपासणीच्या एकूण २० अहवालाचे तपशील जनतेसाठी काल जाहीर केले आहेत.

परराज्यातून आणण्यात आलेल्या मासळीमध्ये आढळून आलेल्या फॉर्मेलीनच्या अहवालाच्या प्रश्‍नावरून काही नागरिक सोमवार १६ जुलै रोजी बांबोळी येथील अन्न आणि औषध संचालनालयाच्या प्रयोगशाळेला भेट देण्याच्या शक्यतेने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने मासळीचे तपासणी अहवाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रयोगशाळेच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तेथे पोलीस तैनात केले जाणार आहेत. आगशी पोलिसांकडून प्रयोगशाळेच्या परिसरात सध्या गस्त घालण्याचे काम सुरू आहे.

एफडीएने मडगाव येथून मासळीचे १७ नमुने घेतले होते. तर पणजी येथून ३ नमुने घेतले होते. मासळीमध्ये फॉर्मेलीनचे प्रमाण मर्यादेत (पर्मिसिबल लिमिट) असल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्यातील मासळीची तपासणी सुरूच राहणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राणे यांनी दिली. मासळीमध्ये फॉर्मेलीन हे रसायन आढळून आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. एफडीएने मासळीच्या तपासणीचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध केलेला नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अहवालाच्या प्रश्‍नावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. राजकीय दबावामुळे अहवाल बदलण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.