माशेलमधील ‘त्या’ कुमारी मातेला न्याय मिळवून देण्याचे आयोगाचे आश्‍वासन

0
100

माशेल येथील कुमारी माता आणि तिच्या चार महिन्यांच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसने गोवा महिला आयोगाकडे काल केली. आयोगाने संबंधितांना सहकार्याचे आश्‍वासन दिले आहे.
महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली महिला कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कुमारी माता आणि तिच्या निकटवर्तीयांनी गोवा महिला आयोगाच्या अध्यक्ष ऍड. शुभलक्ष्मी नाईक यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कुमारी माता आणि तिच्या मुलीची कैफियत मांडली.

मद्यपानास भाग पाडून घेतला गैरफायदा
म्हार्दोळ येथील एका युवकाने माशेल येथील युवतीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाल्यानंतर एका पार्टीचे आयोजन केले. या पार्टीमध्ये युवतीला मद्यपान करण्यास भाग पाडले. त्यानंतर सदर युवकाने तिचा गैरफायदा घेतला. यातून सदर युवतीला चार महिन्यापूर्वी मुलगी झाली. कुमारी माता व तिच्या मुलीचा स्वीकार करण्यास युवकाने नकार दिला आहे. सदर कुमारी माता आणि तिच्या मुलीच्या पालनाची जबाबदारी सध्या एका निकटवर्तीय महिला बजावत आहे, असे ऍड. कुतिन्हो यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांना सांगितले.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ततेची सूचना
कुमारी माता आणि तिच्या मुलीला न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन महिला आयोगाच्या अध्यक्ष ऍड. नाईक यांनी दिले. राज्यात अशा प्रकारच्या घटना घडतात. या ठिकाणी युवतीने मुलीला जन्म देण्याचे धाडस दाखविले आहे. इतर प्रकरणांमध्ये युवती गर्भपात करून घेतात. त्यामुळे अशा युवतींना न्याय मिळून देणे कठीण बनते. या प्रकरणात माता व तिच्या मुलीची बाजू भक्कम आहे असे सांगून महिला आयोगाच्या अध्यक्ष ऍड. नाईक यांनी यासंबंधी प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली.

कुठल्याही प्रकारच्या राजकीय लाभापोटी हे प्रकरण हाती घेतलेले नाही. तर हतबल बनलेल्या कुमारी माता आणि तिच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून हे प्रकरण हाती घेतले आहे. त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष कुतिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.