माविन यांनी राजीनामा द्यावा ः सुदिन ढवळीकर

0
146

मेरशीचे माजी सरपंच, पंच सदस्य प्रकाश नाईक संशयास्पद मृत्यू प्रकरण हे आत्महत्या नसून खुनाचा प्रकार असल्याचा संशय येत आहे. प्रकाश याचा जमीन माफियांनी बळी घेतला आहे. या मृत्यू प्रकरणी वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो याचे बंधूचे विल्सन याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाच्या निःपक्षपाती तपासासाठी मंत्री गुदिन्हो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची गरज आहे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री, मगोपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रकाश नाईक मृत्यू प्रकरणाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. या मृत्यू प्रकरणात दोघांच्या व्यतिरिक्त आणखीन कुणाचा सहभाग आहे का ? याची चौकशी करण्याची गरज आहे. राज्यात मोठमोठ्या जमीन घेतलेल्या जमीन माफियांची चौकशी करण्याची गरज आहे. रस्ता नसलेल्या भागात जमीन माफियांनी जमिनी घेतलेल्या आहेत. या जमिनीचे रूपांतर, रस्ते तयार करण्यासाठी इतरांना धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप आमदार ढवळीकर यांनी केला.
राज्यातील पक्षांतर केलेल्या १२ आमदारांची चौकशी होण्याची गरज आहे. आमदारांना पक्षांतर करण्यासाठी अनेक ऑफर्स दिलेल्या आहेत. असे आमदार ढवळीकर यांनी सांगितले.

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना जमीन प्रश्‍नावरून त्रास दिला जात आहे. शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर यांना जमीन प्रकरणात भरपूर त्रास देण्यात आलेला आहे. जमीन प्रकरणी त्रास दिल्या जाणार्‍या प्रकरणांची कसून चौकशी करून प्रकरणे निकालात काढण्याची गरज आहे. अन्यथा, पुढील काळात या प्रकारात वाढ होण्याचा इशारा ढवळीकर यांनी दिला.