माविन-एलिना यांच्यात दुभाजक प्रश्‍नावरून तेढ

0
105

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या निर्देशानुसार दाबोळीतील चौपदरी मार्गावरील हटविलेला दुभाजक त्वरित पुन्हा घालण्याची सूचना कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संचालकांना केल्यामुळे एलिना साल्ढाणा व माविन गुदिन्हो यांच्यात वाद निर्माण झाला आहे. दोन दिवसांत पुन्हा दुभाजक उभारून रस्ता बंद करण्याचे आश्‍वासन संचालकांनी आमदारांना दिले आहे. यामुळे दोन्ही आमदारांच्या कचाट्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक प्रेमानंद दोड्डामणी सापडले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पंचायत मंत्र्यांच्या सूचनेवरून आल्त दाबोळी येथील नौदलाच्या डेपोपासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या झुआरी कंपनीच्या गेटसमोरच्या मार्गावरील दुभाजक हटवून रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता खुला केला होता. मात्र, हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे स्थानिक आमदार एलिना साल्ढाणा यांच्या नजरेस आल्याने त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक दोड्डामणी यांना त्वरित पाचारण करून आपल्या मतदारसंघातील बेकायदेशीरपणे हटविलेल्या दुभाजकाबद्दल जाब विचारला. हटवण्यात आलेला रस्ता दुभाजक पुन्हा उभारून धोका दूर करण्याची सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केली. त्यानुसार दोड्डामणी यांनी सदर दुभाजक पूर्वरत करण्याचे आश्‍वासन आमदार साल्ढाणा यांना दिले. स्थानिक आमदार एलिना साल्ढाणा यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मतदारसंघातील हटवलेला दुभाजक बेकायदेशीर असून त्यामुळे चार अपघात घडले आहेत. अपघात टाळण्यासाठी एमईएस कॉलेज नाक्यावर सिग्नल यंत्रणा उभारली जाणार असून या मागणीचा पाठपुरावा करत असल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांनी दुभाजक लोकांच्या मागणीनुसारच तात्पुरता हटवण्यात आल्याचे सांगितले. एमईस कॉलेज नाक्यावर सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतर हा दुभाजक बंद करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.