मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञा भाजपमध्ये

0
114
Bhopal: BJP candidate for Bhopal Lok Sabha seat Sadhvi Pragya Singh Thakur, with BJP vice president Shivraj Singh Chouhan, addresses a press conference at the party's state headquarters in Bhopal, Wednesday, April 17, 2019. BJP has fielded Thakur, an accused in the 2008 Malegaon blasts, as its candidate against Congress leader Digvijay Singh. (PTI Photo) (PTI4_17_2019_000160B)

>> भोपाळमधून कॉंग्रेसच्या दिग्विजय सिंहांविरोधात लढणार

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून त्या लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. भोपाळमध्ये त्यांचा मुकाबला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवराज सिंह चौहान, रामलाल आणि प्रभात झा हे भाजपचे बडे नेते साध्वी प्रज्ञा यांच्या संपर्कात होते. अखेर त्यांच्यात झालेल्या दीर्घ चर्चेनंतर साध्वी प्रज्ञा यांनी भाजपमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. भाजप प्रवेशानंतर साध्वी प्रज्ञा यांना भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील हायप्रोफाइल मतदारसंघ असलेल्या भोपाळमधून कॉंग्रेसने ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथे भाजपचा उमेदवार कोण असणार याविषयी जोरदार तर्कवितर्क सुरू होते. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, नरेंद्रसिंह तोमर आणि उमा भारती यांची नावे येथून चर्चेत होती. मात्र, कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब होत नव्हते. आता साध्वी प्रज्ञा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे नाव या मतदारसंघासाठी निश्चित केले असून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

साध्वी प्रज्ञा यांनी त्या भोपाळमधून लढणार असल्याचे संकेत दिले होते. मी निवडणूक लढणार आणि जिंकणारही. मला शिवराज सिंह यांचा पाठिंबा आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होते. साध्वी यांनी यावेळी दिग्विजय यांच्यावरही हल्ला चढवला. शत्रूचा पराभव करण्यासाठी मी पूर्ण सज्ज आहे. मला सध्या अनेक आरोग्यविषयक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दिग्विजय सिंह हेच त्याला जबाबदार आहेत. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यावर जे डाग लागले आहेत, ते मी कधीच विसरू शकत नाही, असेही त्या भाजप प्रवेशानंतर म्हणाल्या होत्या.

कोण आहेत साध्वी प्रज्ञा?
साध्वी प्रज्ञा यांचा जन्म मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील कछवाहा गावात झाला होता. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेलली आहे. सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा उजव्या विचारांकडे होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्या सक्रिय सदस्य होत्या. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात त्या आरोपी आहेत. एनआयए कोर्टाने २०१६ मध्ये साध्वीसह अन्य आरोपींना ‘मोक्का’ कायद्याखालील आरोपांतून मुक्त केले, मात्र त्याचवेळी ‘युएपीए’खालील आरोप कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोर्टाने या कायद्याखाली आरोपही निश्चित केले आहेत आणि त्यानुसार सध्या खटला सुरू आहे.